Sunday, September 29, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 112


🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 112*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते. स्टार बनते. तेंव्हा त्याचं यश सर्वांच्या चर्चेचा विषय बनते. "तो खूपच नशीबवान आहे. म्हणूनच तो यशस्वी झाला." असा सुर चर्चेअंती निघतचं असतो. चर्चा करणारे एका मिनिटात निष्कर्ष काढून मोकळे होतात. परंतु, यशस्वी होण्यासाठी त्या व्यक्तीने केलेल्या संघर्षाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते. "रातोरात झालेली स्टार" म्हणून जिला ओळखले जाते, त्या स्टार चा हा प्रेरणादायी प्रवास

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली ती, केवळ सहा महिन्यांची असतानाच आई वडिलांपासून वेगळी झाली. तिचा सांभाळ तिच्या मोठ्या बहिणीने केला. त्यांच्याकडे घर होते. पण,ते चालवायला माणसं नव्हती. जगण्यासाठीचा तिचा संघर्ष जन्मापासून सुरूच होता. एकाकीपणा काय असतो ? याची जाण तिला लहानपणापासूनच आली होती. शिवाय त्या एकाकीपणाची तिने सवयच करून घेतली होती.

रेडीओवरची गाणी ऐकणं आणि ती गुणगुणणं हा तिचा आवडता छंद. तो तिने लहानपणापासून, प्राणपणाने जपला. पुढे हाच छंद तिचं जगण्याचं साधन बनला.

तिचं लग्न झालं. ती स्वयंपाकी असलेल्या नवऱ्याबरोबर मुंबईला आली. आपल्या नवऱ्याच्या कामात ती मदत करी. काही वर्षे त्यांनी सुखाचा संसार केला. पण, त्यांच्या सुखाला ग्रहण लागले. तिच्या नवऱ्याचे निधन झाले आणि पुन्हा एकाकीपणाने तिला पुन्हा घेरले. निराश होऊन, ती मुंबईहून परत आपल्या गावी निघून आली.

गावी आली खरी. पण, तिच्याजवळ उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. भीक मागण्याखेरीज तिच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. या कामात तिचा छंद तिच्या उपयोगी पडला. गाणे गाणे, लोकांचे मनोरंजन करणे आणि त्यांच्याकडून पैसे किंवा खायला घेवून उदरनिर्वाह करणे. हा तिचा नित्यक्रम अनेक वर्षे सुरू होता.

तिच्या मधुर आवाजाची जादूच निराळी होती. तिचा आवाज सारखा कानी पडत रहावा. म्हणून, काहीजण तिचा आवाज आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घ्यायचे.  सोशल मीडियाच्या आणि कॉपीपेस्ट च्या या जमान्यात तिचा एक विडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर या व्हिडिओ ने धुमाकूळ घातला.  बॉलिवुड मधील एका आघाडीच्या संगीतकाराने तिला गाण्याची संधी दिली. तिने देखील धाडसाने आणि चिकाटीने या संधीचे सोने केले आणि ती रातोरात स्टार बनली. ती स्टार म्हणजेच राणू मंडल.

राणू मंडल स्टार झाल्या खऱ्या ! पण, त्यांचं हे यश नशिबावर अवलंबून होतं किंवा त्या खूप नशीबवान आहेत. असं म्हणणं कितपत योग्य आहे ?? गायनाचा छंद त्यांनी प्राणपणाने जपला. कारण, गायन हा आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे. त्यांच्यातील या क्षमतेची जाणीव त्यांना खूप आधीच झाली होती. फक्त ती वापरायची कशी ?? हे मात्र त्यांना लवकर समजले नाही.

राणु यांनी केलेला संघर्ष, सहन केलेल्या हालअपेष्टा, यातना, एकाकीपणा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वाट्याला आलेल्या एकाकीपणाला कंटाळून, जीवन संपविण्याचा मार्ग निवडण्याऐवजी या परिस्थितीला सामोरे जाण्याचा मार्ग राणु यांनी निवडला. म्हणूनच, त्यांना चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळू शकली. मिळालेल्या संधीचे, सोनं करण्याचे धाडस त्यांनी दाखवलं. 

शेवटी काय ? माणसाकडे क्षमता असल्याशिवाय, त्याने ती सिद्ध केल्याशिवाय, तो नशीबवान(यशस्वी) होऊच शकत नाही. म्हणूनच, राणू मंडल एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!! 






No comments: