Sunday, September 22, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत - भाग - 111

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 111*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

थॉमस अल्वा एडिसन हे नाव आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. परंतु, याच एडिसन यांना एका शास्त्रज्ञाने पराभूत केले. "एडिसन यांना पराभूत करणारा शास्त्रज्ञ" म्हणून त्याचा आजही लौकिक आहे. त्या शास्त्रज्ञाचा हा प्रेरणादायी प्रवास...

जुलै 1856 रोजी ऑस्ट्रियन (सध्याचं क्रोएशिया ) मध्ये, एका सर्बियन (सर्बियन लोक हे दक्षिण स्लाव जमाती मध्ये मोडतात, ही जमात बाल्कन (दक्षिण-पूर्वी यूरोप) प्रदेशामध्ये आढळते.)  दांपत्याच्या पोटी, जन्माला आलेला तो, पाच अपत्यांपैकी चौथा ! 

शाळेतील शिक्षक फळ्यावर गणित लिहून देत असतानाच,तो मनातल्या मनात आकडेमोड करायचा. शिक्षकांचे गणित लिहून पूर्ण होताच, त्याचे उत्तर तयार असायचे. कुठलीही गोष्ट त्याने एकदा पाहिली की, त्याच्या लक्षात एकदम फिट बसायची. इतका तो बुद्धिमान होता. त्याला लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची प्रचंड आवड. मोठं होऊन संशोधक व्हायचं. हे त्याचं स्वप्नं. ते पूर्ण करण्यासाठी, हायस्कूलचे शिक्षण संपल्यानंतर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी, तो ऑस्ट्रीयाला गेला.

१८७५ ला पॉलिटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला असताना, अति हुशारीपणामुळे एका शिक्षकांसोबत त्याचे मतभेद झाले आणि त्या वर्षी तो नापास झाला. त्यातच त्याला जुगार खेळायची सवय लागली. महिन्याला मिळणारा भत्ता आणि ट्युशन फी त्यांनी जुगारात उडवली, अभ्यास झाला नाही आणि तो फायनल परीक्षेत नापास झाला. त्यामुळे त्यांचे युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशनही अपूर्णच राहिले.

घडल्या प्रसंगातून स्वतःला सावरत, इकडे-तिकडे काम केल्यानंतर, त्याला एडिसन यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी त्याला, त्यांनी बनविलेला डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator ) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी त्याला सांगितले की, "जर तो या कामात यशस्वी झाला, तर त्याला 50 हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळतील." मिळणारे बक्षीस ही त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. म्हणून त्याने ते आव्हान स्वीकारले आणि तो कामाला लागला. दिवस रात्र एक करून, 19-19 तास काम करून त्याने डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator ) जास्त प्रभावी करून दाखविला. एडिसन यांना हवे तसे बदल त्याने करून दाखवले. परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. त्यांनी त्याची चेष्टा केली. झालेल्या अपमानामुळे त्याने एडिसनची कंपनी सोडली. 

अपमान सहन करून, एका नव्या जोमाने तो उभा राहिला आणि त्याने काही गुंतवणूकदारांना सोबत घेऊन, एका नवीन कंपनीची सुरुवात केली. पण, इथेही गुंतवणूकदारांशी त्याचे सूत जमले नाही. त्यामुळे, अल्पावधीतच त्याला कंपनीतून बाहेर पडावे लागले. हा काळ त्याच्यासाठी खूप संघर्षात्मक होता. त्याला अतिशय हलाखीत दिवस काढावे लागले. 

परंतु, न डगमगता आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने पुन्हा काही गुंतवणूकदारांना सोबत घेऊन एका कंपनीची सुरुवात केली. इथं त्यांनी मोटर आणि जनरेटर वर काम सुरू केले. याच काळात त्याने Alternative Current (AC ) वर चालणारी Induction Motor बनवली. 

हा तोच काळ होता, जिथं एडिसन चा DC Current आणि त्याचा AC Current ह्यावर मोठं व्यावसाईक युद्ध सुरु झाले. दोघेही आपापले Current कसे चांगले ? आणि दुसऱ्याचे कसे खराब आहे ? हे सिद्ध करून दाखवू लागले, एडिसन ने AC Current चे भय उत्पन्न करण्यासाठी चक्क एका हत्तीला लोकांच्या समोर विजेच्या शॉक देऊन मारले आणि AC ची  शक्ती किती विनाशकारी आहे ? याचं प्रात्यक्षिक लोकांना दाखविले.

परंतु, AC Current चे वैशिष्ट्य असे की, याचे वोल्टेज ट्रांसफोर्मर द्वारा वाढवून खुप दूर पर्यंत पाठवता येऊ शकत होते. DC मध्ये असे करता येत नाही. त्याच बरोबर AC प्रणालीवर चालणारी उपकरणे DC उपकरणांच्या तुलनेत कमी वीज वापरतात. प्रत्येक घरात वीज ही केवळ AC प्रवाहानेच पोहोचू शकत होती. त्यामुळे एडिसन चा पराभव झाला आणि त्याचा विजय झाला. ज्या शास्त्रज्ञांनी एडिसनचा पराभव केला, तो शास्त्रज्ञ म्हणजेच निकोल टेस्ला. 

काही लोक झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, वर्षोंवर्षे खर्च करतात आणि मूळ ध्येयापासून परावृत्त होतात. खरंतर झालेला अपमान विसरून, यशस्वी होणं, स्वप्नं पूर्ण करणं,आपलं ध्येय गाठणं. हाच अपमान करणाऱ्यांचा, एकप्रकारे घेतलेला बदला होऊ शकतो. टेस्ला यांनी नेमकं हेच केलं.

टेस्ला यांच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे आली. परंतु, त्यांनी आपले काम कधीच थांबविले नाही. आपल्या स्वप्नंपूर्तीसाठी त्यांनी दिवसरात्र एक केला. अनेक प्रकारचे लोकोपयोगी शोध लावले. म्हणूनच, अमेरिकेमध्ये 10 जुलै हा टेस्ला दिन म्हणून साजरा केला जातो. चंद्रावर पृथ्वी पासून दूर असलेल्या एका 26 किलोमीटर व्यासाच्या क्रेटर ला टेस्ला नाव देण्यात आले आहे. एका सूक्ष्म ग्रहाचे नाव 2244 टेस्ला ठेवण्यात आले आहे आणि सर्बियाच्या 100 दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!
 


भाग 110 वा वाचण्यासाठी क्लिक करा.

No comments: