Saturday, September 14, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत - भाग - 110

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 110*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

एकेकाळी दहावीत शाळा सोडावी लागलेला एक मुलगा, आज चारशेहून अधिक कंपनींचा मालक आहे. त्याच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा.....

18 जुलै 1950 रोजी दक्षिण लंडनमध्ये एक वकील असलेले वडील आणि वैमानिक असलेल्या आईच्या पोटी त्याचा जन्म झाला. बघायला गेलं, तर कशाचीच कमतरता नव्हती. पण, एका गोष्टीची कमतरता प्रकर्षाने भासायची. ती म्हणजे बुद्धीची. डीसलेक्सिया नामक रोगाने तो पछाडलेला होता. डीसलेक्सिया म्हणजे गतिमंद. शिकण्याची क्षमता कमी असणे. या रोगामुळे त्याला खूप त्रास व्हायचा. शाळेतील शिक्षक त्याला "ढ" आणि मित्र  मुर्ख समजायचे. पण, हाच "ढ" भविष्यात एक यशस्वी व्यावसायिक होऊन, जगातील नवोदित व्यावसायिकांना प्रेरणादायी ठरेल. हे कोणाच्या गावी देखील नव्हते. 

शाळेतील या वागणुकीचा त्याला प्रचंड मानसिक त्रास व्हायचा. पण, त्याच्या घरचे वातावरण अतिशय चांगले होते. त्याच्या या रोगाची जाणीव असलेल्या आईने, त्याला प्रत्येकवेळी समजावून घेतले. त्याच्या प्रत्येक चुका ती समजून घ्यायची आणि त्याला अपेक्षित पाठबळ द्यायची. कुटुंबाच्या पाठबळामुळे त्याचा बराचसा त्रास कमी व्हायचा. त्याला शाळेत शिकण्यात विशेष आनंद नव्हता. सरतेशेवटी कंटाळून दहावीत असतानाच त्याने शाळा सोडली आणि कामाला सुरुवात केली.

या रोगामुळे एक गोष्ट मात्र चांगली घडत होती. त्याला त्याच्यातील 'बेस्ट' चा शोध लागला. ती म्हणजे त्याची काम करण्याची विशिष्ट पद्धत. त्याला जे काम, ज्या गोष्टी करायला आवडायच्या त्या तो मनापासून, जीव लावून करायचा. ते केल्याशिवाय तो स्वस्थ बसायचा नाही. ही त्याची काम करण्याची, झोकून देण्याची विशिष्ट पध्दत त्याला भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फलदायी ठरली.

शाळा सोडल्यानंतर, कामाला सुरुवात केल्यानंतर, त्याचे दोन प्रयत्न अयशस्वी ठरले. पण, त्याने प्रयत्न करणे थांबविले नाहीत. त्याने एक मासिक सुरू केले. जे विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालवले जायचे. त्याचे नाव स्टूडेंट असे होते. त्याचा हा व्यवसाय यशस्वी झाला. अल्पावधीतच तो लक्षाधीश देखील झाला. नंतर त्याने रेकॉर्ड विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातही तो यशस्वी झाला. एकामागोमाग एक अनेक यशाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. त्याने ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकले, त्या त्या क्षेत्रात तो यशस्वी झाला. आज त्याचे नाव जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट आहे. तो यशवंत म्हणजेच वर्जिन ग्रुप चा मालक रिचर्ड ब्रेसनन होय. 

बऱ्याच व्यक्ती आपल्या आजारपणाला, आपल्या ध्येय प्राप्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा समजतात. यामुळेच ते प्रयत्न करण्यापासून लांब पळतात आणि अपयशाच्या अंधारात खितपत पडतात. परंतु, रिचर्ड ने आपल्या आजारपणावर मात करत स्वतःला सिद्ध केले. एकवेळ त्याला नुकसानीमुळे आपली कंपनी देखील विकावी लागली. परंतु, व्यवसायातील नुकसान आणि आजारपणाला त्याने कधीच अडथळा होऊ दिला नाही. म्हणूनच तो यशस्वी होऊ शकला. म्हणूनच तो एक यशवंत आहे. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!

* रिचर्ड यांचे नऊ प्रेरणादायी पाठ.

1. Just Do It!. ( यश प्राप्तीसाठी कामाला लागा.)
2. Have fun. ( जीवनाचा आनंद घ्या.)
3. Be bold. ( धाडसी निर्णय घ्या. )
4. Challenge yourself. ( स्वतःला आव्हान द्या.)
5. Stand on your own feet.( स्वत: च्या पायावर उभे रहा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा.)
6. Live the moment. ( प्रत्येक क्षण आनंदाने जगा. )
7. Value family and friends. ( कुटुंब आणि मित्रांना महत्त्व द्या. त्यांची काळजी घ्या. )
8. Have respect. ( स्वतःविषयी आदर बाळगा. )
9. Do some good. ( काहीतरी चांगले करा.)





No comments: