🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 114*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
चाळीशी पार केलेल्या विवाहित पण, समाजाच्या दृष्टीने वांज असलेल्या एका महिलेच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...
कर्नाटक राज्यातील रामनगर जिल्ह्यातील मगाडी तालुक्यातील हुलिकल या गावात तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिला शिक्षण घेता आले नाही. बालपणापासून मजुरीच करावी लागली.
विसाव्या वर्षी तिचा विवाह गावाशेजारील खेड्यातील गुरे राखणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याशी झाला. जसं अठराविश्वदारिद्र माहेरी होतं, तसं सासरीही. समजूतदार असणारा नवरा हिच तिची संपत्ती. आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी ती आपल्या पतीबरोबर काबाडकष्ट करू लागली.
एक दिवस शेतातून घरी येताना गावातील काही बायका नटूनथटून समारंभाला निघाल्या होत्या. त्या पाहून तिलाही समारंभाला जायची इच्छा झाली. लगबगीने ती घरी आली. घरी असलेल्या सासूला तिने विचारले, "गावातील बायका नटूनथटून समारंभाला निघाल्या आहेत. आपल्याकडे आमंत्रण आहे का ?" तिच्या या प्रश्नावर सासू खेकसली आणि म्हणाली, " त्यांच्या घरी डोहाळजेवणाचा कार्यक्रम आहे आणि तुझ्यासारखी अपशकुनी, वांझ घरात असल्यावर ते आपल्याला का आमंत्रण देतील ? "
तब्बल वीस वर्षे हा अपमान सहन करुन ती जगत होती. पण, आज तिला ते असह्य झालं होतं. जगणं नकोसं झालं होतं. म्हणून, कंटाळून आपलं आयुष्य संपवण्यासाठी ती घराबाहेर पडली. वाट दिसेल तिकडे ती जाऊ लागली. ऊन्हाने अंगाची लाही लाही होत होती. थकून भागून ती रस्त्याकडेला बसली. तिने सभोवताली नजर टाकली. तिला फक्त रुक्ष, ओसाड आणि उजाड झालेली धरणीमाय दिसत होती.
दोघींचीही अवस्था सारखीच. एक लेकरा अभावी वांझ आणि दुसरी झाडाअभावी रुक्ष. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले. "मला लोक त्यांच्या घरी येणाऱ्या बाळासाठी अपशकुनी मानतात. इतकी सुंदर सृष्टी निर्माण करणाऱ्याने मला जन्माला घातले आहे. तर मग मी अपशकुनी कशी?? मी अपशकुनी नाही. मी या जगाला हे सिद्ध करून दाखवेन. भले माझी कुस फुलली नाही. पण, या रुक्ष धरणीची कुस मी फुलवून दाखवेन. या धरतीला सुजलाम् सुफलाम् करणे आणि स्वतःला सिद्ध करणे. हेच माझे ध्येय." असं ठरवून ती माघारी फिरली.
घडल्या प्रसंगाने जगण्याची नवी दिशा तिला प्राप्त झाली होती. मोठ्या आत्मविश्वासाने, उत्साहाने तिने झाडे लावायला सुरुवात केली. रोपं आणण्यासाठी तिच्या कडे पैसे नव्हते. म्हणून ती झाडाच्या फांद्या तोडून त्यांचे कलम लावू लागली. नुसते झाड लावून ती गप्प बसत नव्हती, तर ते जगविण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत होती. ती दररोज पहाटे डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन, गावापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे जगवण्यासाठी जायची. जनावरांपासून झाडांचे रक्षण करण्यासाठी त्याभोवती कुंपण बांधायची. एक ना अनेक प्रकारची संकटे झेलून ती झाडांचे संवर्धन करायची. तिने साठ वर्षांत तब्बल 8000 झाडे लावून जगवली. म्हणून तिला ' वृक्ष माता ' असे म्हणतात. ती वृक्ष माता म्हणजेच थिम्माक्का.
थिम्माक्का या निपुत्रिक असल्या तरीदेखील, त्यांनी तब्बल 8 हजार झाडं लावून, त्यांची आईप्रमाणे काळजी घेवून, त्यांचे संगोपन आणि संवर्धन केले आहे. हुलिकल व कुडूर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र.94 वरील सलग 4 किमी अंतरात 384 वडाची झाडे त्यांनी लावली आहेत. एका रांगेतील झाडे म्हणजे साल्लुमाराडा. ही झाडे सलग एका रांगेत उभी आहेत. म्हणूनच, त्यांना साल्लुमाराडा थिम्माक्का असेही म्हणतात.
अपशकूनी म्हणून ज्या थिम्माक्कांना अनेक समारंभा मधून जाणीवपूर्वक डावलले जायचे, त्याच थिम्माक्का आज जगभरातील लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनल्या आहेत. एखादी गोष्ट आपल्या जीवनाचा भाग कधीच होऊ शकणार नाही. म्हणून, जीवनाची शर्यत अर्ध्यातूनच सोडण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी थिम्माक्का यांचा जीवनप्रवास मार्गदर्शक असा आहे. विपरीत परिस्थितीत देखील सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा थिम्माक्का यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. ज्यावेळी एका संधीचा दरवाजा बंद होत असतो, त्याचवेळी दुसऱ्या संधीचा दरवाजा खुला होत असतो. फक्त तो आपण शोधला पाहिजे. थिम्माक्का यांनी तो शोधला आणि त्या यशस्वी झाल्या.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 1995 मध्ये त्यांना ‘नॅशनल सिटिझन अवॉर्ड’ मिळाला आहे. ‘इंदिरा प्रियदर्शनी सन्मान’ अनेक देशी-परदेशी संस्थांचे पुरस्कार, सन्मान त्यांना मिळाले. भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. शिवाय बीबीसीने जगातील १०० प्रभावशाली महिलांची यादीत त्यांचा समावेश आहे. अमेरिका-कॅलिफॉर्निया येथील लॉस एंजेलिस आणि ओकलँड येथील संस्थेचे नाव आहे ‘थिमक्का रेसोर्ससि फॉर एनव्हार्न्मेंट एज्युकेशन.’ म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!
No comments:
Post a Comment