Tuesday, October 1, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 115

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 115*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.* 

" लंडन विमानतळावर एका आजीने तिला ओळखले आणि तिच्या गळ्यात पडून त्या रडू लागल्या. साठ-सत्तर वर्षापासून तुझ्यासारखंच करण्याची माझी इच्छा होती. पण, माझी इच्छा तू पूर्ण केलीस. जगभरातील लोकांना महाराष्ट्रीयन पदार्थ चाखायला दे. हेच आशीर्वाद." असे बोलून ती निघून गेली. हा प्रसंग जिच्या बाबतीत घडला, त्या महिलेच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा....

नागपुरातील एकत्र कुटुंबातील तिचा जन्म. साहजिकच तिच्यावर उत्तम संस्कार झाले. घरात महिलांचे प्रमाण जास्त असल्याने, स्वयंपाक बनविण्यात अगदी तरबेज झाली. जात्याच हुशार असल्याने MCA चे शिक्षण पूर्ण करून, इन्फोसिस सारख्या नामांकित IT कंपनीत तिची निवड झाली. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्रात नोकरी केल्यावर तिची बदली बंगळूरू येथे झाली. 

येथे तिचे मन काही रमेना. अस्सल खवय्यी असल्याने तिला तेथील खानपान, खाद्य संस्कृती रुचली नाही. सदैव महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची आठवण व्हायची. काही कामानिमित्त तिचे परदेशात जाणे झाले. विमानात महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने, तिने 27 तासांचा प्रवासात केवळ ब्रेड खाऊनच केला. या प्रसंगाने तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेलीच, शिवाय तिच्या मनात नव्या संधीची आणि वेगळया विचाराची निर्मिती झाली. 

"मराठमोळे खाद्यपदार्थ न मिळाल्याने मी इतकी बेचैन झाले. तर माझ्यासारखे असंख्य मराठी बांधव जगभरात आहेत. तेही होत असतीलच. माझ्यासाठी आणि या सर्वांसाठी काही करता येईल का ?" या प्रश्नाने तिची विचारचक्रे अधिक तीव्र झाली. "डोमिनोज सारखी परदेशी खाद्य कंपनी, भारतामध्ये हजारोच्या संख्येने शाखा निर्माण करून, आपले खाद्यपदार्थ भारतात लोकप्रिय करू शकते, तर महाराष्ट्रीयन पदार्थही जगभरात लोकप्रिय होऊ शकतील." या विचाराने ती अधिक प्रेरित झाली. आणि तिने 2012 साली इन्फोसिस मधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली. छोट्यासे हॉटेल सुरु केले. सूक्ष्म अभ्यास, परिपूर्ण नियोजन, अविश्रांत परिश्रम आणि आपल्या जवळील उत्तम ते ग्राहकांना देण्याचा प्रयत्न, यामुळे तिचे हॉटेल अमराठी प्रांतातही नावारूपास आले. अमराठी प्रांतात, महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, लोकांच्या पसंतीस उतरवणे. ही सोपी गोष्ट नाही. एवढ्यावरच न थांबता, तिने जगभरात आपल्या हॉटेल च्या शाखा सुरू करण्याची मोहीम उघडली. जगभरात 5000 शाखांचे स्वप्न पाहणारी, ते सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र एक करणारी ती नवदुर्गा म्हणजेच जयंती कठाळे आणि तिचे हॉटेल म्हणजेच पूर्णब्रह्म. 

"लंडन विमानतळावर भेटलेल्या आजीने जयंती कठाळे यांना ओळखले आणि त्या गळ्यात पडून त्या रडू लागल्या. साठ-सत्तर वर्षापासून तुझ्यासारखंच करण्याची माझी इच्छा होती. पण, माझी इच्छा तू पूर्ण केलीस. जगभरातील लोकांना महाराष्ट्रीयन पदार्थ चाखायला दे. हेच आशीर्वाद."असे बोलून ती निघून गेली. वरवर पाहता हा प्रसंग खूप साधा वाटत असेल. परंतु, मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली असेलच की, "आपल्या मनात येणारे विचार पूर्ण करण्यासाठी आपण धडपडलो नाही, तर आपल्या मनातले विचार इतरांच्या माध्यमातून सत्यात येण्यासाठी, मूर्त स्वरूपात येण्यासाठी धडपडत असतात." सत्तर वर्षांपूर्वी त्या आजीने हा विचार सत्यात आणण्यासाठी धडपड केली असती, तर आज जयंती कठाळे यांच्या जागी ती आजी असती. म्हणूनच जयंती कठाळे एक यशवंत आहेत.

व्यवसाय आणि धोका हे समीकरणच आहे. धोका पत्करुनच व्यवसाय करायचा असतो. दृढनिश्चय, सूक्ष्म नियोजन, अविश्रांत मेहनत, प्रत्येक समस्येचे संधीत रूपांतरीत करण्याची क्षमता, सजगता आणि जागरूकता अश्या अनेक गुण-कौशल्ये अंगी असावी लागतात. नसली तरी ती अंगी बाणवावी लागतात. तरच व्यवसाय पूर्णत्वास येतो. व्यवसाय करण्यासाठीचे हे काही गुण, जसे जयंती कठाळे यांच्या आहेत, तसेच प्रत्येक स्त्री मध्येही असतात. स्त्री म्हणून रडत बसण्यापेक्षा, आपल्यातील बेस्ट ओळखून, त्याचा वापर करून, व्यवसाय अगदी डौलाने उभा करता येतो. हे जयंती कठाळे यांच्या जीवन प्रवासातून लक्षात येते. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार.
 धन्यवाद!!!!!  




काही प्रसिद्ध भागांसाठी  खालील फोटोवर क्लिक करा.










No comments: