Wednesday, October 2, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 116


🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 116*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.* 

हाती घेतलेल्या कार्यासाठी संपूर्ण संपत्ती खर्च करून, प्रसंगी सौभाग्याचे प्रतिक गहाण ठेवावे लागलेल्या एका महिलेचा हा प्रेरणादायी प्रवास...

तिचा जन्म वांद्रे, मुंबई येथे झाला. वडील प्रा. रमाकांत सिनारी हे स्वातंत्र्य सेनानी होते. गोव्याला पोर्तुगिजांच्या तावडीतून सोडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे देशसेवेचे बाळकडू तिला लहानपणापासूनच मिळाले. मोठेपणी देशाची सेवा करण्याचं स्वप्नं, ती मनी बाळगून होती. 

लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार. त्यामुळे सहाजिकच डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची संधी तिला मिळाली. तिने डॉक्टर होण्याचा मार्ग निवडला. 

मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच, तिची भेट एका सैन्य डॉक्टर असलेल्या अधिकाऱ्याशी झाली. दोघांच्या भेटी वाढल्या. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करून विवाह केला. लग्न झाले तेंव्हा ती 19 वर्षाची होती.

लग्नाच्या वेळी तिचे पती मेजर डॉ. दिपक हे मार्शल आर्ट शिकत होते. "आपल्या पत्नीने सैन्यात कमांडो व्हावे." ही त्यांची इच्छा. कमांडो होण्यासाठी मार्शल आर्ट आवश्यक असल्यामुळे, त्यांनी तिला मार्शल आर्ट शिकविला. ते तिच्याकडून दिवसभर सराव करून घ्यायचे. तीही सैन्यात भरती व्हायचे. देशसेवा करण्याचे स्वप्नं पूर्ण करायचे म्हणून कठोर मेहनत करायची. तिची कठोर मेहनत पाहून, मैदानावर सरावासाठी येणारे सैन्य आणि सैन्य अधिकारी देखील अवाक् व्ह्यायचे. तिच्या मेहनतीचे त्यांना कौतुक वाटायचे. यामुळे तिला अधिक स्फुरण चढायचे. 

या कठोर मेहनतीचे फळ तिला मिळाले. ती सैन्यात भरती झाली नाही. परंतु, कमांडोंना प्रशिक्षण देण्याची संधी तिच्याकडे चालून आली. उभयंतांनी या संधीचं सोनं करायचं ठरविलं आणि सैन्याला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. ते ही मोफत. गेली 20 वर्षे ती जवानांना मोफत प्रशिक्षण देण्याचे आव्हानात्मक काम करते आहे. ती कणखर महिला म्हणजेच डॉ. सीमा राव होय. 

डॉ. सीमा यांना जवानांना प्रशिक्षण देताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. दररोज होणाऱ्या नव्या जखमांसह त्या प्रशिक्षणासाठी उभ्या राहत होत्या. या कामात त्यांनी स्वतःला इतकं झोकून दिलं की,आई होण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही. आपल्या वडिलांच्या अंत्यविधीला देखील जाता आलं नाही. जवानांना मोफत प्रशिक्षण देत असताना, त्यांची संपत्ती खर्च झाली होती. प्रसंगी आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून, मिळालेल्या पैशातून कमांडोना प्रशिक्षण दिलं. दररोज नवनव्या संकटांना तोंड देत, तब्बल 20 हजाराहून अधिक जवानांना प्रशिक्षित केले आहे. 

एक स्त्री असून देखील शारीरिक क्षमता कमावत, आर्थिक, कौटुंबिक समस्यांवर मात करून हाती घेतलेले कार्य सुरूच ठेवले. त्यांनी चालवलेलं हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. एक स्त्री असून देखील पुरुषी वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात स्वत:च्या यशाचा झेंडा रोवणाऱ्या डॉ. सीमा राव यांचा आदर्श प्रत्येक स्त्री साठी लाखमोलाचा आहे. जवानांना प्रशिक्षण देणाऱ्या, त्या देशातील पहिल्यावहिल्या महिला आहेत. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


इतर लेख वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.








No comments: