Monday, September 6, 2021

शिक्षक दिनाचं "अनमोल गिफ्ट"

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *शिक्षक दिनाचं "अनमोल गिफ्ट"*

🎯 *श्री संदीप पाटील, दुधगाव.9096320023.*

5 सप्टेंबर शिक्षक दिन. हा दिवस संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. गावा-गावात, शाळा-शाळांत या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. 

मोठ्या उत्साहानं आमच्या जि. प. शाळा बागणी नं.2 येथे हा दिवस साजरा केला गेला. कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमुळे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात घेता आला नाही. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून, ऑनलाईन बालसभा आयोजित करुन हा दिवस साजरा केला. या दिनाचे औचित्य साधून मी रचना केलेल्या "जि.प.शाळा नं.2 बागणी" या शैक्षणिक ब्लॉगचे अनावरणही केले. शाळेचे विविध उपक्रम कायम स्वरुपी जतन होतील. शिवाय, हे उपक्रम पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहचविता येतील. हा या ब्लॉग निर्मिती मागचा उद्देश. 

सोमवार दि. 6 सप्टेंबर पासून पालकांच्या आग्रहानुसार व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नियमितपणे शाळा सुरू झाली. आज शाळा सुरू झाल्याचा एक वेगळाच आनंद विदयार्थी, पालक आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जसे इतरांचे, तसे माझेही होते. माझ्याही चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. हा आनंद द्विगुणित झाला, तो शिक्षक दिनानिमित्त मिळालेल्या एका अनमोल *"गिफ्ट"* मुळं. 

मी माझ्या पाचवीच्या वर्गात प्रवेश केला. हजेरी घेतली. पहिल्याच दिवशी 35 पैकी 22 विद्यार्थी उपस्थित होते. ही एक आनंदाची बाब. तोच पहिल्या बाकावर बसलेली गौरी काईत माझ्याजवळ आली आणि हातातील वस्तू माझ्या हातात देत म्हणाली, "सर,माझ्याकडून तुम्हांला हे शिक्षकदिनाचं गिफ्ट." तांबड्या चकचकीत कागदानं लपेटलेल्या बॉक्स फाईलवर तीन रंगांचे पेन व्यवस्थित चिकटविलेले होते. मी त्या "गिफ्ट"कडे कौतुकाने पाहत होता. तोवर अस्मिता पाटील या विद्यार्थिनीने एक छानसा बॉलपेन भेट दिला. तोच आमच्या शाळेत यावर्षी प्रवेश घेतलेल्या मिस्बा सुतारनेही गुलाबाचे फूल देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गौरी,अस्मिता आणि मिस्बा या तिन्ही विद्यार्थीनीं सोबत वर्गातील अनेक विद्यार्थीनीं व त्यांचे पालक हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यास इच्छूक होते. पण, सातत्याने प्रयत्न केला. भेटी दिल्या.विश्वास दिल्या. या विद्यार्थीनींचे व त्यांच्या पालकांचे मन वळविले. 

अनपेक्षितपणे मिळालेल्या या "गिफ्ट"मुळे मी प्रचंड भारावून गेलो. माझ्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या या भावना पाहून खूप समाधान वाटले. आजचा दिवस माझ्यासाठी विशेषार्थानं संस्मरणीय दिवस ठरला.

आजच्या या "गिफ्ट"ने शिक्षक म्हणून बागणी नं.2 या शाळेत वर्षभरात केलेल्या कामांनं काही गोष्टी साध्य केल्याचे समाधान लाभलं. तसंच आजचं हे "गिफ्ट" पुरस्कारासम वाटलं. म्हणूनच ते माझ्यासाठी "अनमोल" आहे.

धन्यवाद...!!!



No comments: