Thursday, August 26, 2021

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या फोनच्या निमित्ताने

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या फोनच्या निमित्ताने*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगांव. 9096320023.*


'नवी अर्थक्रांती' या महाराष्ट्रातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'यशवंत - एक प्रेरणास्रोत' या माझ्या प्रेरणादायी लेखमालेचे सोमवारपासून दि.23 ऑगस्टपासून प्रसारण सुरू आहे. यामुळे अनेक अनेक नवे मित्र जोडले जात आहेत. कॉल्स आणि व्हाट्सॲप मेसेज द्वारे पोस्ट आवडल्याच्या कही प्रतिक्रिया येत आहेत. काही प्रकाशक आणि साप्ताहिकांचे संपादकही यानिमित्ताने संपर्क साधत आहे. यामुळे मनस्वी आनंद होत आहे. 


परंतु, कालरात्री घडलेल्या आणखी एका 'गोष्टी'नं मी खुपचं भारावून गेली. रात्रीचे 10 वाजले होते. मी, विद्यासागर आणि सचिन आमच्या 'सॉलिड आइस्क्रीम' मध्ये बसलो होतो. पुढील कामाचं नियोजन सुरू होतं. अशातच 10.05 मिनिटांनी माझा मोबाईल वाजला. नंबर अनोळखी होता. पण, Truecaller नं काम सोप्प केलं होतं. मोबाईलच्या स्क्रीनवर 'तात्याराव लहाने' हे नाव पडलं होतं. नाव वाचताच माझा आनंद गगनात मावेना. 


मी पटकन फोन उचलला. तिकडून आवाज आला, "नमस्ते, मी डॉ.तात्याराव लहाने बोलतोय." क्षणभर मला काही सुचलंच नाही. 'नवी अर्थक्रांती' वर प्रसारित झालेला त्यांच्यावर आधारीत लेख डॉक्टरांच्या वाचनात आला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. लेखनाचं कौतुक केलं. त्याचबरोबर माझी आस्थेवाईकपणे चौकशीही केली. एका खऱ्याखुऱ्या 'यशवंता'शी होत असलेल्या संभाषणाने मी प्रचंड भारवून गेलो होतो. 


माकेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील एका गरीब शेतमजूर कुटुंबात डॉ.लहाने यांचा जन्म झाला. अगदी खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. यासाठी दररोज 14 किमीची पायपीट केली. वेळप्रसंगी पाणी भरण्याचं,मजुरी करण्याचं, जेवण बनविण्याचं काम केलं. पण, परिस्थितीसमोर ते शरण गेले नाहीत. जिद्द न सोडता, चिकाटीनं ते नेत्रतज्ज्ञ बनले. जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता बनले. जन्मत: अंध असलेल्या हजारो रुग्णांच्या आयुष्यात त्यांनी नवचैतन्याचे रंग भरले. शिवाय, एक लाख नेत्रशस्त्रक्रियाही केल्या. त्यांच्या या कार्याचा गौरव केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन केला आहे. 


सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही आपल्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या जोरावर ते यशाच्या शिखरापर्यंत पोचले. त्यांचा हा खडतर प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन 'यशवंत - एक प्रेरणास्रोत' मध्ये त्यांच्या संघर्षावर आधारित लेख लिहिला. हा लेख त्यांच्यापर्यंत पोहचला. खऱ्याखुऱ्या 'यशवंता'शी संभाषण झाल्याने, मनस्वी आनंद झाला.


केवळ दोन मिनिटांचं आमचं संभाषण. मला प्रचंड ऊर्जा आणि चिरकाल टिकणारी आठवण देऊन गेलं. 


पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर लिहिलेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/4.html


धन्यवाद... 





No comments: