Sunday, September 12, 2021

जि.प.शाळा थोरातवसाहत (रोझावाडी) शाळेच्या निमित्ताने...

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *जि.प.शाळा थोरातवसाहत (रोझावाडी) शाळेच्या निमित्ताने...*

🎯 *श्री संदीप पाटील, दुधगाव.9096320023.*


दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी जि.प.शाळा थोरातवसाहत (रोझावाडी) येथे पं.स.वाळवा यांच्या माध्यमातून मिळालेला अँड्रॉइड टी.व्ही. तसेच, ग्रामपंचायत रोझावाडी यांच्या माध्यमातून 15 व्या वित्त आयोगातून शाळेला देण्यात आलेल्या एल.ई.डी. टीव्ही, वॉटर प्युरिफायर, लाईट कनेक्शन व फिटिंग चे उद्घाटन,तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ जि.प. सदस्य मा.श्री संभाजी कचरे (आबा) पं.स.सदस्य श्री.जनार्दन पाटील,शिक्षणविस्तार अधिकारी श्री. सुनिल आंबी साहेब सौ. छायादेवी माळी मॅडम, श्रीमती उज्ज्वला रांजणे मॅडम, केंद्रप्रमुख श्रीमती पिरजादे मॅडम तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य व पालक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.


थोरातवसाहत ही बागणी केंद्रातील, रोझावाडी ग्रामपंचायत हद्दीतील, वाळवा आणि मिरज या दोन तालुक्यांच्या सीमेवरील शाळा. जेमतेम पन्नासेक घरांची ही वसाहत. त्यामुळे शाळेचा पटही अगदी जेमतेमच. 2007 साली या शाळेची स्थापना झाली. श्री.बाळासो झगडे गुरुजी हे या शाळेला लाभलेले पहिले आणि श्री.कृष्णनाथ ढोबळे सर दुसरे शिक्षक होय. सध्या श्री. संजय काटे व सौ. मंदाकिनी झाडे हे उपक्रमशील शिक्षक या शाळेला लाभले आहेत.  


श्री.संजय काटे सर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक आणि राजकीय कार्यात ते अग्रेसर असतात. संघटनेत काम करत असतानाही, शाळेकडे, शालेय कामकाजाकडे आजवर जराही दुर्लक्ष त्यांनी केलेले नाही. त्यांच्या माणिकवाडी शाळेतील कामकाजाबाबत अधिकारी-पदाधिकारी नेहमी गौरवोद्गार काढत असतात. सरांच्या मार्गदर्शनाखाली माणिकवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर छाप सोडली आहे. ही बाब कौतुकास्पदच आहे.


सौ.मंदाकिनी झाडे या देखील एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. अनेक नावीन्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्यात त्या नेहमी अग्रेसर असतात. विद्यार्थ्यांना विविध व्यासपीठं मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. केंद्रातील विविध उपक्रमात त्यांचा कृतिशील सहभाग असतो.


या दोन्हीं शिक्षकांनी जि.प.शाळा थोरातवसाहत (रोझावाडी) शाळेला एक वेगळेचं वलय प्राप्त करून दिलं आहे. शाळा भौतिक सुविधांनी सुसज्ज करण्यात त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. शाळेच्या बाह्यांगाबरोबरच अंतरंगही बोलकं केलं आहे. नानाविध शैक्षणिक साहित्य स्वतः तयार केलं आहे. एकंदरीत शाळा हरेक अंगानं सजवली आहे. 


शाळेच्या पट वाढीसाठीही इथल्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. पालकांच्या भेटी घेऊन, त्यांना विश्वास देऊन त्यांचे मन परिवर्तन केले आणि वर्षभरापूर्वी केवळ 5 विद्यार्थी संख्या असणारी ही शाळा आज 25 पर्यंत पोहोचली. ती केवळ आणि केवळ येथील शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळेच...


माझी या शाळेशी जोडलेली एक वेगळीच नाळ आहे. मी या शाळेचा एक माजी विद्यार्थीच. सन 2007-08 साली आंतरवासिता अंतर्गत सहा महिने छात्राध्यापक म्हणून मी या शाळेत कार्यरत होतो. येथेच माझ्यातल्या होऊ घातलेल्या शिक्षकाची पायाभरणी झाली. येथेच माझ्यातल्या होऊ घातलेल्या शिक्षकाला आकार मिळाला. माझ्या आजवरच्या वाटचालीत या शाळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 


या कार्यक्रमाच्या निमित्ताने जि.प.शाळा थोरातवसाहत येथे उपस्थित राहता आलं. शाळेचं वैभव पाहता आलं आणि शाळेला प्राप्त झालेलं वलय पाहून मन प्रसन्न झालं. 


या शाळेच्या, इथल्या विद्यार्थी व शिक्षकांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक...!!!


धन्यवाद...!





No comments: