Tuesday, September 21, 2021

वडिलांच्या स्वप्नासाठी अल्बमची निर्मिती करणारा दुधगांव चा सुपुत्र अभिनेता अभिजीत भोसले.

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *वडिलांच्या स्वप्नासाठी अल्बमची निर्मिती करणारा दुधगांवचा सुपुत्र अभिनेता अभिजीत भोसले.*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगांव. 9096320023.*

प्रत्येकाचं एक स्वप्नं असतं आणि ते स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जो-तो सदैव धडपडत असतो. आपल्या वडिलांचे स्वप्नं पूर्ण करण्याचं स्वप्नं प्रत्येक तरुण पाहत असतो. त्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतो. अशाच काही तरुणांपैकी एक तरुण म्हणजे अभिजीत.. 



अभिजीत चंद्रकांत भोसले हे या तरुणाचं पूर्ण नाव. तो दुधगांव ता. मिरज चा सुपुत्र. अभिजीत माझा गाववालाच. आम्ही एकाच शाळेचे विद्यार्थी. तो माझ्यापेक्षा दोनेक वर्षे पुढच्या वर्गात होता. तो एक हुशार, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. शालेय जीवनात तो खुप छान गायचा. सेवानिवृत्त झालेले आमचे शिक्षक त्याला या गायनामुळे आजही अचूक ओळखतात. "ऐ मेरे वतन के लोगो" हे प्रसिध्द गीत स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी त्यांच्या गोड आवाजात बऱ्याचदा ऐकले आहे. आजही त्याची आठवण ताजी आहे. 

अभिजीतला गायनाचा वारसा मिळाला, तो त्याच्या वडिलांकडून. त्याचे वडील उत्तम गायक. पण, आई वडिलांच्या अकाली निधनाने, घराच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे, श्री.चंद्रकांतजींना गायनाचे धडे गिरवता आले नाहीत. पण,तरीही अशा बिकट परिस्थिती त्यांनी गायनाचा छंद जपलाच. त्यांच्या या गायनाचा प्रभाव अभिजीतवर पडला. वडिलांच्या सानिध्यात तो ही गायक बनला. 

अभिजीतच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, ते भारतीय नौसेनेतील नोकरीमुळे. तो मुंबईत कार्यरत आहे. नौसेनेत आल्यावरच त्याच्यातील कलागुणांची जाणीव त्याला झाली. नेव्हीतील एका कार्यक्रमात त्याने केवळ दोन मिनिटांची एक भूमिका साकारली. या भूमिकेमुळेच त्याला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली. त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. अभिनयाचे धडे गिरवत गिरवत मिळणाऱ्या संधीचं सोनं करू लागला. झपाटलेला 2, कट्टीबट्टी या सारख्या दोन चार चित्रपटात तसेच, झी मराठी, स्टार प्रवाह यासारख्या आघाडीच्या वाहिन्यांवरील कार्यक्रमात त्याला संधी मिळाली. 

थोड्या फार संधी मिळूनही तो समाधानी नव्हता. आपल्या सारख्या नवोदित कलाकारांना अभिनयाचे, ऑडिशनचे प्राथमिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने चंद्रछाया कलामंच स्थापना केली. त्याद्वारे अनेक नवोदित तरुणांना अभिनय क्षेत्रातील मार्ग सुकर करण्यास तो हातभार लावतो आहे. 

अभिजीतचे वडील एक उत्तम गायक. पण, परिस्थितीअभावी कौशल्य दाखविण्याची संधी त्यांना कधीच मिळू शकली नाही. ही सल श्री. चंद्रकांतजींच्या मनात होती. ते अभिजीतला वेळोवेळी जाणवायचं. वडिलांना एखादी संधी मिळावी. यासाठी अभिजीतने धडपड सुरू केली.

चंद्रछाया कलामंचाच्या माध्यमातून एक अल्बम बनवण्याची त्याने तयारी केली. यासाठी पैशांची मोठी आवश्यकता होती. पै पै जमा करून, कर्ज काढून त्याने "मन माझं" या अल्बमची निर्मिती केली. सोमवार दिनांक 20/09/2021 रोजी हे गीत youtube वर प्रदर्शित करण्यात आलं. 

"मन माझं" या अल्बमची ट्रेलर पाहून एका नामांकित मराठी चॅनेलने व एका नामांकित दिग्दर्शकाने हा अल्बम खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु, अभिजीतच्या वडिलांच्याऐवजी, अन्य एखाद्या प्रसिध्द गायकाच्या आवाजात या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्याची अट ठेवली. पण, आपल्या वडिलांचं स्वप्नं पूर्ण करण्याचं स्वप्नं बाळगणाऱ्या अभिजीतने हा प्रस्ताव अमान्य केला. 



अभिजीतचा हा पहिलावहिला प्रयत्न. या प्रयत्नात त्याने जीवापाड मेहनत केल्याचे अल्बम पाहताना लक्षात येते. ज्या वयात अनेक गायकांचे करियर संपुष्टात येते. त्या वयात चंद्रकांतजींच्या करियरची सुरुवात झाली. वयाच्या 64 व्या वर्षीही श्री.चंद्रकांतजींच्या आवाजातील मार्दव त्यांची गायनाप्रती आवड सांगून जाते. 

या पोस्टच्या माध्यमातून माझ्या वाचक मित्रांना विनंती आहे की, आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून "मन माझं" या गाण्याचा आस्वाद घ्यावा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि गाण्याला लाईक करा. ही विनंती. 


गाण्याची लिंक- https://youtu.be/7mvZHG9HiZ4


श्री. संदिप पाटील सर

9096320023.




No comments: