Saturday, September 25, 2021

श्री.गणेश तांबे सर यांना 'सातारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार' मिळाल्याच्या निमित्ताने...

यशवंत - एक प्रेरणास्रोत 

श्री.गणेश तांबे सर यांना 'सातारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार' मिळाल्याच्या निमित्ताने...

श्री संदीप पाटील, दुधगाव.9096320023.


"गुणवत्ता हीच मालमत्ता" हे प्रमाण मानून मार्गक्रमण करणारे एक गुणवंत, उपक्रमशील व आदर्श शिक्षक म्हणजेच श्री.गणेश तांबे सर होय. 


वाठार निंबाळकर ता. फलटण जि. सातारा येथील एका गरीब अल्प भूधारक शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शेतीबरोबरच वडील गवंडी कामही करायचे. घरची परिस्थिती बेताची असल्याने, वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच त्यांनी वडीलांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. सुट्टीच्या दिवशीही ते दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायला जायचे. बालपणी सोसाव्या लागलेल्या अपार कष्टामुळे, शिक्षण घेऊन घरची परिस्थिती सुधारण्याचा इरादा त्यांनी पक्का केला. शिक्षक होण्याचं ध्येय निश्चित केलं.


त्यांचा मनोदय पूर्णत्वास आला. डी.एड. ला प्रवेश मिळाला. अथक प्रयत्नांतून, उत्तम गुणांनी ते उत्तीर्णही झाले. ठाणे जिल्ह्यातील डहाणू या आदिवासी तालुक्यात त्यांना नोकरी मिळाली. तेथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. तीन वर्षाच्या उत्कृष्ट कार्यानंतर, त्यांची बदली स्व: जिल्हयात, फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी ( ढवळ) या शाळेत झाली. येथेही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. शिष्यवृत्ती परीक्षा आणि क्रीडास्पर्धामध्ये सरांच्या अनेक विद्यार्थ्यानी जिल्हास्तरावर ठसा उमटविला.


शेरेचीवाडी या शाळेत काही वर्षे सेवा बजावली. नंतर त्यांची बदली सध्या कार्यरत असलेल्या कारंडेवस्ती (मलवडी) येथे झाली. या शाळेत त्यांच्या कामाचा खरा कस लागला. मुळातच ही नव्याने सुरु झालेली शाळा. शालेय इमारत हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशा स्थितीत येथील ग्रामस्थांकडून शाळेसाठी अर्धा एकर जमीन मिळविण्यात व शालेय इमारत उभी करण्यात ते यशस्वी झाले. या शाळेला आय.एस.ओ. दर्जाही मिळवून दिला. शाळेसाठी तब्बल तीन लाखाचे फर्निचर उपलब्ध करण्यात ते यशस्वी झाले. 


फलटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांनी सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातही त्यांची निवड झाली आहे. विविध उपक्रमातून शाळेचा लौकिक वाढविण्यात त्यांना यश आले आहे.


"आई" हा त्यांच्या जिव्हाळ्याचा अन् श्रद्धेचा विषय. आईच्या अकाली निधनाने ते अतिशय गंभीर झाले. तिच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी "आई प्रतिष्ठान" ची स्थापना केली आहे. या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना "आई सन्मान पुरस्कार" ने गोैरविले आहे. गुणवंत विद्यार्थी गोैरव, रक्तदान शिबिर, गरजूंना मदत, निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा, क्रीडास्पर्धा, पूरग्रस्तांना मदत असे नानाविध उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवून समाजाशी असणारी नाळ अधिक घट्ट केली. समाजसेवेचा हा वारसा त्यांना आईकडून वारसाने मिळाला आहे. आईच्या आठवणीत त्यांनी "पाझर मातृत्वाचा..!" हे संपादित केलेले पुस्तक प्रकाशित केले आहे.



श्री.गणेश तांबे सरांच्या आजवरच्या शैक्षणिक अन् सामजिक कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय मानव विकास पुरस्कार (लातूर ), राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार (औरंगाबाद ), फलटण तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, लायन्स क्लब फलटण आदर्श शिक्षक पुरस्कार, स्वामी विवेकानंद व्यसनमुक्ती पुरस्कार, वाचनयात्री पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 


गुरुवर्य श्री.सुनिल शेडगे सर लिखित "दै.सकाळ" च्या "उपक्रमशील शिक्षक" या सदरात त्यांचा समावेश करण्यात आला. माझी व त्यांची ओळख या सदराद्वारेच झाली. अनेकदा फोनवर बोलणं झालं. विचारांची देवाणघेवाण झाली. अनेकदा त्यांनी लेखनाचं कौतुक केलं. प्रेरणा दिली. "यशवंत - एक प्रेरणास्रोत" चे 175 भाग पुर्ण केल्याबद्दल "आई प्रतिष्ठान"कडून ऑनलाईन प्रशस्तीपत्र देऊन गौरवही केला..  


नुकताच, श्री. गणेश तांबे सरांना सातारा जिल्हा परिषदेकडून "आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन गौरविले आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. असे मला वाटते. सरांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!


धन्यवाद...!!!



No comments: