Sunday, March 20, 2022

सौ. राजश्री च्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील यशाच्या निमित्ताने....



नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सौ.राजश्री हिने प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. यानिमित्ताने आजचा लेखन-प्रपंच.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे दरवर्षी शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा आयोजित करते. शिक्षकांच्या नवोपक्रमशीलतेला वाव देणे, त्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. पाच गटात या स्पर्धेचे आयोजन होत असते. माझा वर्गमित्र श्री. निलेश कांबळे व शाळेच्या तत्कालीन वरिष्ठ मुख्याध्यापिका व विद्यमान विस्ताराधिकारी श्रीमती उज्वला रांजणे मॅडम यांच्या प्रेरणेतून, चालू वर्षी सौ.राजश्री ने या स्पर्धेत 'प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक' गटात भाग घेतला. 


तसेच, तिला या याकामी गटशिक्षणाधिकारी श्री.अजिंक्य कुंभार, विस्ताराधिकारी श्री सुनील आंबी, सौ छायादेवी माळी, सौ.ज्योती भोई-भोकरे, केंद्रप्रमुख नजमा पिरजादे व मुख्याध्यापिका सौ.छाया यादव यांचेही सहकार्य लाभले. 


कोरोना कालावधीत जशा शाळा बंद झाल्या, तशा अंगणवाड्याही देखील बंद झाल्या. यामुळे इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा अध्ययन झाल्याचे, पालक भेटींच्या दरम्यान तिच्या लक्षात आले. पूर्व प्राथमिक स्तरावर झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी तिने कृती कार्यक्रम हाती घेतला. इयत्ता पहिलीच्या वर्गातील 18 विद्यार्थ्यांसाठी, 21 दिवसांचा कृती कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पालकांच्या सहकार्याने राबवला. "कोरोनाची महामारी, पालकांच्या सहकार्याने करू, इयत्ता पहिलीची वर्गपूर्वतयारी" असे तिच्या नवोपक्रमाचे नाव. भाषा व गणित विषयातील अध्ययनक्षय भरून काढण्यासाठी, अध्ययन निष्पत्ती व पायाभूत संख्यज्ञान व साक्षरता यावर आधारित नाविन्यपूर्ण कृती इयत्ता पहिलीच्या वर्गात राबवून, पूर्व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययनक्षय भरून काढला. 


सांगली डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र भोई सर यांच्या मार्गदर्शनाखाली नवोपक्रमाचे लेखन केले. तो एस.सी.ई.आर.टी.,पुणे ला सादर केला. सांगली जिल्ह्यातून सहभागी झालेल्या 28 नवोपक्रमांपैकी पहिल्या 7 मध्ये तिच्या नवोपक्रमाची निवड झाली. सांगली डाएट येथे जिल्हास्तरीय सादरीकरण झाले. जिल्हास्तरावर तिने द्वितीय क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र झाली. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेल्या 155 नवोपक्रमांपैकी "सर्वोत्तम दहा" मध्ये तिची निवड झाली. 


"मॅडम,आत्ता सहाव्या क्रमांकावर आहात. काहीही करून पहिल्या पाचमध्ये आलाच पाहिजे." हे डॉ. भोई सरांचे शब्द तिला प्रचंड ऊर्जा देऊन गेले.


"पहिल्या पाच मध्ये स्थान मिळवायचच." या जिद्दीनं ती कामाला लागली. राज्यस्तरीय सादरीकरण ऑनलाइन पद्धतीने होणार होते. सादरीकरणात पी.पी.टी.ची भूमिका फार महत्वाची होती. पी.पी.टी.अधिक प्रभावी, आकर्षक आणि सादरीकरण परिणामकारक व्हावे. यासाठी तिला सांगली डाएटचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.श्रीशैलप्पा कामशेट्टी साहेब यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. सादरीकरणासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. रात्रीचे दोन-अडीच पर्यंत जागून, 15 मिनिटांचे सादरीकरण सात मिनिटांवर आणण्यासाठी राजश्रीने प्रचंड काम केले. अतिशय आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे सादरीकरण केले. परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने समाधानकारक उत्तरे दिली. 


शेवटी निकालाचा दिवस उजाडला. 15 मार्च 2022 रोजी महात्मा फुले सभागृह, एस.सी.ई.आर.टी.,पुणे येथे निकाल आणि बक्षीस वितरण संपन्न होणार होते. "पहिल्या पाच मध्ये आपला नंबर असणारच!" असा ठाम विश्वास राजश्रीला होता. अन् झालंही तिच्या मनासारखंच. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत तिचा राज्यात पहिला क्रमांक घोषित झाला. एस.सी.ई.आर.टी.चे संचालक एम.डी. सिंह, प्राचार्य विकास गरड, प्राचार्या कमलादेवी आवटे, डॉ. अमोल डोंबाळे, ह.ना.जगताप, नेहा बेलसरे,अमोल शिंगारे, यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन तिला सन्मानित करण्यात आलं. 


हा तिच्या आजवरच्या शैक्षणिक वाटचालीतला सर्वोत्तम क्षण होता. तिच्या या यशानं आष्टा नं.17 शाळेचा, आष्टा केंद्राचा, वाळवा तालुक्याचा व सांगली जिल्ह्याचा आणि माझ्या दुधगांव चा नावलौकिक वाढला आहे. 


काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील एका शिक्षक मित्राच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जोडीनं जाणं झालं. कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर मित्रासोबत त्यांची पत्नी बसलेली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मित्राच्या पत्नीचाही सन्मान होत होता. हा सन्मान पाहून राजश्री माझ्या कानात हळूच कुजबुजली, "माझा असा सन्मान कधी होईल ?" "लवकरच" मी म्हणालो. तो "लवकरच" अजून काही उजाडला नाही. परंतु, आज राजश्रीने राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे तिच्या सोबत माझाही सन्मान होतो आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं जसं कौतुक होत आहे, तसं तिच्या यशाबद्दल माझंही होत आहे. ही माझ्यासाठी विलक्षण आनंदाची अन् अभिमानाची बाब आहे. असे प्रसंग पुनःपुन्हा जीवनात यावेत. हीच अपेक्षा. 


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल सौ. राजश्री तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा...!!!


सौ.राजश्री राबविलेल्या नवोपक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/Oq2uG5GvIjg


धन्यवाद...!!!

No comments: