Tuesday, March 8, 2022

आयेशा नदाफ - मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर एक्सपर्ट.

यशवंत - एक प्रेरणास्रोत

आयेशा नदाफ - मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर एक्सपर्ट.

श्री. संदिप पाटील, दुधगांव.9096320023.

जिल्हा परिषद शाळा तुजारपूर, ता.वाळवा येथे कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील आणि तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून परिचित असलेल्या शिक्षिका म्हणजेच आयेशा नदाफ होय. त्या वाळवा तालुक्यातील पेठ या गावच्या रहिवासी. त्यांचे मुळगाव जत तालुक्यातील वाळेखिंडी.


एका सर्वसामान्य कुटुंबातला त्यांचा जन्म. घरची परिस्थिती अगदी गरिबीची. त्यामुळे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी संघर्ष करण्या शिवाय पर्यायच नव्हता. यात्रांमध्ये कटलरी,खेळणी व इतर साहित्य विकण्याचा व्यवसाय करून अगदी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. आष्टा येथील अध्यापक विद्यालयात डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. 


2004 साली कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील कोदे खुर्द येथे त्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. वाळवा तालुक्यातील जि.प.शाळा नंबर 1 वाळवा याठिकाणी त्यांची आठ वर्ष सेवा झाली. सध्या त्या जि.प.शाळा तुजारपूर, ता.वाळवा,जि.सांगली येथे कार्यरत आहेत. ही शाळा त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टर्निंग पॉइंट. येथेच त्यांच्या उपक्रमशीलतेला खऱ्या अर्थाने वाव मिळाला.


विविध स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये नदाफ मॅडम यांनी सहभाग नोंदवला आणि यशही मिळवले. वाळवा तालुक्यातून सलग तीन वर्ष शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेमध्ये यश मिळवले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, शिक्षणाच्या वारी, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला व लक्षणीय कामगिरी केली. 


नदाफ मॅडम यांच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा व वाळवा टॅलेंट सर्च सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, महिला मेळावा, पालकांसाठी विविध स्पर्धा आयोजन आदी विविध उपक्रमात त्या नेहमी आघडीवर असतात. 2019- 20 या साली विज्ञान उत्सव स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवनारी जिल्हा परिषद शाळा तुजारपूर ही एकमेव शाळा ठरली.


एक तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून नदाफ मॅडम यांची ख्याती आहे. शाळेमध्ये ई-लर्निंग साठी त्या नेहमी असतात. कोरोना कालावधीमध्ये ऑनलाइन शिक्षण कशा पद्धतीने द्यावे ? यासाठी शिक्षकांना मार्गदर्शक ठरणारी कार्यशाळा त्यांनी राबवली. याचा वाळवा तालुक्यातीलच नव्हे, तर सांगली जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी लाभ घेतला. वाळवा विद्यादान समूह स्थापन करून, ज्या शिक्षकांना ऑनलाइन शिकवता येत नाही अशा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. 


एकेकाळी त्यांना व्हाट्सअप ची ब्रॉडकास्ट लिस्ट कशी करायची ? हे माहिती नव्हते. परंतु, "नवं ते हवं" या उक्तीप्रमाणे, स्वयंपाक करता करता समोर मोबाईल ठेवून त्यांनी तंत्रज्ञानातील अनेक बारकावे शिकून घेतले आणि मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे आपल्या सहकारी बंधूभगिनींना प्रशिक्षितही केले.


नदाफ मॅडम यांना अवगत असलेल्या तंत्रज्ञान विषयक कौशल्याचा लाभ त्यांच्या शाळेला ही झाला शाळेच्या पटात लक्षणीय वाढ झाली. चार वर्षांपूर्वी 101 पटसंख्या आज 185 पर्यंत पोहोचली आहे. त्यांचे यूट्यूब चैनल आहे आणि त्यांचे हजारोंनी सबस्क्राबर्स आहेत. वाळवा तालुक्याच्या प्रत्येक तंत्रज्ञान विषयक कार्यात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे त्यांची वाळवा तालुका गुणवत्ता कक्षात तंत्रस्नेही शिक्षक म्हणून निवड झाली आहे.


नदाफ मॅडम यांच्या तंत्रज्ञान विषयक कामगिरीमुळे अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. 

स्वामी विवेकानंद फाउंडेशन यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले शिक्षण गौरव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला पेठ यांच्यामार्फत जनजागृती सप्ताह 2019 या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार, परिवर्तनवादी विचारमंच तुजारपूर यांच्यामार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा-वाळवा यांच्यामार्फत गौरव, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आयोजित आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार, ईगल फाउंडेशन रत्नागिरी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक भारती परिवार जिल्हा सांगली यांच्या मार्फत सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच, जिल्हा परिषद सांगली यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2019-20 सालचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे..


नुकतच नदाफ मॅडम यांची निवड "मायक्रोसोफ्ट एज्युकेटर एक्सपर्ट" म्हणून झाली आहे. त्यांना मिळालेलं हे यश आजवर त्यांनी दिलेल्या वेळेचं, त्यागाचं अन् समर्पणाचं फळ आहे. शिक्षक म्हणून असणारी जबाबदारी त्या उत्तमरित्या पार पाडत आहेतच, येत्या काळात "मायक्रोसोफ्ट एज्युकेटर एक्सपर्ट" म्हणून देखील, त्या नेटाने जबाबदारी पार पडतील. असा विश्वास वाटतो. त्यांच्या भावी वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा...!!!


शिक्षण क्षेत्रात अनेक महिला शिक्षिका नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्वतःचा वेगळा ठसा उमटवित आहेत. आयेशा नदाफ मॅडम त्यांपैकीच एक. आज जागतिक महिला दिन. या निमित्ताने महिलांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा गौरव करण्याचा, सन्मान करण्याचा दिन. यानिमित्ताने महिला शिक्षकांचा सन्मान करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...


जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...!!!


धन्यवाद...!!!




No comments: