Saturday, February 19, 2022

शिवाज्ञा - एक जबाबदारी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने...



सर्वप्रथम छ. शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि सर्व वाचक बंधू भगिनींना शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!!!

पापर्डे. ता. पाटण येथील लेखकमित्र शिवव्याख्याते चि. कृष्णकांत देसाई लिखित *"शिवज्ञा - एक जबाबदारी"* या प्रेरणादायी लेखमालेचे रूपांतर पुस्तकात आहे आणि ते आज 19 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर प्रकाशित होत आहे. याचा मनोमन आनंद होत आहे.


*चि. कृष्णकांत आणि माझा स्नेह खुप जुना. जि.प.शाळा पापर्डे, ता.पाटण या ठिकाणी मी कार्यरत असताना शालेय रंगकामाच्या निमित्ताने,लोक सहभाग जमा करताना त्याच्याशी परिचय झाला. तो एक उत्तम शिवव्याख्याता असल्याचे त्याचवेळी समजले. त्याच्या या वकृत्व कौशल्याचा उपयोग शाळेतील काही विद्यार्थ्यांना झाला आहे. पुढे शाळेचे स्नेहसंमेलन आयोजन करताना वेळोवेळी त्याचा खूप मोठा आधार मिळाला. शिवचरित्रावर आधारित नृत्य बसविताना त्याचा मोठा सहभाग मिळाला. त्याच्या सहकार्याने शाळेची तीन स्नेहसंमेलनं यशस्वी होऊ शकली. माझी बदली झाल्यानंतर ही आमचा स्नेह कमी झाला नाही. पुढे तो "शिवाज्ञा" ने अधिकच वृध्दींगत झाला.* 


चि.कृष्णकांत याची जडणघडण मी अगदी जवळून पाहिली आहे. शिवरायांचा स्वराज्य निर्मितीचा खडतर प्रवास लोकांसमोर आपल्या ओघावत्या वाणीने मांडणाऱ्या कृष्णकांतनेही अतिशय खडतर परिस्थितीतून स्वतःचे 'स्वराज्य' निर्माण केले आहे. वडिलांचे छत्र नसतानाही, कुठल्याही आधाराशिवाय, स्वतः कमवत शिक्षण पूर्ण करून त्याने नोकरीही मिळविली. या साऱ्या खडतर प्रवासात शिवराय नेहमी त्याचे आदर्श आणि प्रेरणास्रोत राहिले आहेत. शिवरायांवर लिहिलेले अनेक ग्रंथ,लेख त्याने अगदी मनापासून वाचले आहेत. केवळ वाचन करून तो थांबला नाही, तर शिवरायांचा प्रत्येक विचार स्वतः मध्ये भिणवला आणि हा भिनलेला विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने धडपड सुरू केली. सुरुवातीला मोडक्या तोडक्या शब्दांत तो व्याख्यान देवू लागला आणि अल्पावधीतच आपल्या ज्ञानाच्या आणि अभ्यासूवृत्तीच्या जोरावर तो जिल्ह्यातील एक नामवंत शिवव्याख्याता बनला आहे. 


"शिवाज्ञा - एक जबाबदारी" ही चि.कृष्णकांत ची  पहिलीवहिली लेखमाला. शंभर भागांची ही लेखमाला चार पर्वात विभागली गेली. हे चारही पर्व व्हॉट्सॲप, फेसबुक सारख्या समाजमाध्यमांमध्ये अतिशय लोकप्रिय आणि वाचकप्रिय ठरली.


छ.शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, त्यांचे आचार, विचार, कृती या अनेक बाबींचा अभ्यास करून, त्याचा सद्यपरिस्थितीशी सहबंध जोडून, काहीवेळा परखड आणि स्पष्ट शिवविचार यात मांडले आहेत. 'महाराजांसारखं दिसण्यापेक्षा, त्यांच्यासारखं असणं आणि वागणं महत्त्वाचं.' ही बाब "शिवाज्ञा - एक जबाबदारी"तून अधोरेखित होते. 


आजच्या तरुणाईला आणि समस्त शिवप्रेमींना प्रेरणादायी असलेलं हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. माझी वाचक मित्रांना विनंती आहे कि, "शिवाज्ञा - एक जबाबदारी" हे पुस्तक खरेदी करून, चि.कृष्णकांत या तरुण अन् होतकरू लेखकाला प्रेरणा द्यावी. 


"शिवाज्ञा - एक जबाबदारी" हे पुस्तक माझ्यासाठी फारच खास आहे. कारण, या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याचं भाग्य मला लाभलं आहे. तेंव्हा पुनश्च एकदा विनंती आहे कि, आपण हे पुस्तक खरेदी करा आणि नक्की वाचा.


चि.कृष्णकांतच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!!


पुस्तकांसाठी संपर्क - 70837 66099


धन्यवाद...!!!




No comments: