Monday, January 31, 2022

इलाही जमादार - दुधगांवच्या मातीतला एक कोहिनूर....

🎯 यशवंत - एक प्रेरणास्त्रोत

🎯 इलाही जमादार - दुधगांवच्या मातीतला एक कोहिनूर....

🎯 श्री.संदिप पाटील, दुधगांव. 9096320023


https://mahashalanews.blogspot.com/2022/01/blog-post_30.html


दुधगांव. 

सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं मिरज तालुक्यातील पश्चिमेकडंच शेवटचं गाव.

शिक्षकांचं गाव.

साहित्यिकांचं गाव. 

महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव.

कर्मवीरांना रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची प्रेरणा देणारं अन् वारणेच्या तीरावर वसलेलं माझं गाव, दुधगांव. 

या दुधगांवच्या मातीत अनेक रत्नं जन्माला आली. ज्यांनी आपल्या कर्तुत्वानं गावचं नाव उज्ज्वल केलं. या मातीत जन्माला येऊन, आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्रवर आपली छाप पाडणारा एक कोहिनूर म्हणजेच "ईलाही जमादार" होय. आज 31 जानेवारी. सरांची पुण्यतिथी. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख म्हणजेच "दुधगांवच्या मातीतला कोहिनूर"


एका गरीब, कष्टाळू, शेतकरी कुटुंबात 1 मार्च 1946 साली सरांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव गुलशन तर, वडील युसुफदादा. आठ भावंडात ते सर्वात थोरले. घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं, त्यात कुटुंब मोठं अन् सर थोरले असल्यानं घरची जबाबदारी आपोआप त्यांच्यावर येऊन पडली. आई-वडिलांना शेतीत मदत अन् घरचं पडेल ते काम त्यांना करावं लागलं. पण, अशा आव्हानात्मक परिस्थितीत देखील सरांनी शिक्षण थांबवलं नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर, दहावी पर्यंतचे शिक्षण गावातीलच हायस्कूलमध्ये झाले. 


घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सांगली अथवा आष्ट्याला शिक्षणासाठी प्रवेश घेणं आणि नियमितपणे प्रवास करणं. हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. त्यामुळे सरांचं शिक्षण थांबण्याची चिन्हं निर्माण झाली होती.परंतु, त्यांच्या शिकण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे, त्यांची इचलकरंजी येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षणाची व राहण्याची मोफत सोय झाल्याने, पुढील शिक्षणासाठी इचलकरंजीला गेले. 


इचलकरंजी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठिकाण ठरलं. इथं अनेक चांगले मित्र त्यांना मिळाले. या मित्रांच्या माध्यमातूनच त्यांना पुणे खडकवासला येथील वॉटर पॉवर सेंट्रल रीसर्च सेंटर मध्ये नोकर भरतीची माहिती मिळाली. सरांनी ही संधी साधली आणि मुलाखतीनंतर त्यांना या कंपनीत नोकरी मिळाली. 

 

खडकवासला येथील नोकरीनं त्यांच्या आयुष्याची दशा अन् दिशाच बदलली. आर्थिक विवंचनेतून कुटुंबाला सावरत असतानाच, त्यांच्याही आयुष्यानं आकार घ्यायला सुरूवात केली. रिकाम्या वेळनं पुस्तकांशी मैत्री केली. मिळतील ती पुस्तकं वाचली. 


सर सुट्टीला गावी आले की, सुटकेस मध्ये कपडे कमी अन् पुस्तके जादा असायची. जेवताना एका मांडीवर पुस्तकं घेऊनच बसायचे. घरातली सगळी मंडळी माणसं झोपायची तर, सर उशिरा पर्यंत वाचन करत बसायचे. जेंव्हा सगळी जागी होऊन, कामाला लागायची तेंव्हा सर झोपायचे. ते पुस्तकांना अन् पुस्तकं त्यांना एकटं सोडतं नव्हती. इतकं त्यांचं घनिष्ठ नातं तयार झालं.


पुस्तकांनी सरांच्या मस्तकात विचारांचं वादळ निर्माण केलं आणि त्या वादळांनी प्रत्यक्षात येण्यासाठी लेखणीचा आधार घेतला. यातूनच जन्म झाला "गझलेचा" अन् एका "गझलकाराचा".


ईलाही सरांच्या गझलांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य केले. पुढे ते आकाशवाणी, दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी बनले.अनेक मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून त्यांच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या. अनेक पुस्तके लिहिली.अनेक मालिका, चित्रपटांसाठी त्यांनी गाणी, गझलांचे लेखन केले. शान-ए-गजल, सांगली भूषण, उत्कृष्ट गीतकार सारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांच्या गळ्यात माळ टाकली. त्यांना मराठीतील "कोहिनूर - ए - गझल" म्हणून ओळखंल जाऊ लागलं. या कोहिनूरनं आईवडिलांचं, गावचं नाव त्यांनी उज्वल केलं. म्हणूनच गावानं त्यांना "दुधगांव भूषण" पुरस्कार देऊन सन्मानित केलं. 


सरांना पाहण्याचा योग फक्त एकदाच आला. आमच्या गावातील धनंजय टॉकीजमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलका कुबल आल्या होत्या. त्यावेळी सरांना एकदा पाहिलं होतं. नंतरच्या काळात त्यांचं नाव बऱ्याचदा रेडिओवर ऐकलं. जि.प.शाळा नं.1 दुधगांवच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समारंभासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांना भेटता येईल असं वाटलं होतं. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. ते गावात होते, हे त्यांच्या निधनानंतरच मला कळले. इतक्या महान व्यक्तिमत्वाला प्रत्यक्ष भेटता न आल्याचं शल्य आजही मनात आहे. 


हिऱ्याची किंमत ठरते, ती त्याच्या पैलूंवर. हिऱ्याला मौल्यवान होण्यासाठी, आघात सहन करून घ्यावेच लागतात. तसेच, यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या ईलाही सरांनी अनेक कष्ट सहन केले आहेत. अनेक यातना भोगल्या आहेत. तेंव्हा कुठे ते "कोहिनूर - ए - गझल" होऊ शकले. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. दुधगांवच्या मातीतला या कोहिनूरला मी शतश: अभिवादन करतो.


धन्यवाद...!!!





No comments: