Tuesday, April 19, 2022

सौ.ज्योती अरुण होरे (ज्योती जिनगोंडा पाटील) यांच्या बदलीच्या निमित्ताने...

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *सौ.ज्योती अरुण होरे (ज्योती जिनगोंडा पाटील) यांच्या बदलीच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


माझ्या आजवरच्या जडण-घडणीत अनेक व्यक्तींचं योगदान आहे. या व्यक्तींपैकी एक नाव म्हणजे सौ.ज्योती अरुण होरे पूर्वाश्रमीच्या ज्योती जिनगोंडा पाटील मॅडम.

2005 साली मला डी.एड.ला प्रवेश मिळाला आणि माझी पावलं पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळा नं.1 दुधगांवकडे वळली. सुशीला पाटील, सुरगोंडा पाटील, जगदीश नलवडे, शंकर पवार, रघुनाथ अथणीकर या शिक्षकांची नव्याने ओळख झाली आणि ती चिरकाल स्मरणात राहणारी ठरली. या यादीमधील आणखी एक नाव म्हणजे होरे मॅडम होय. 

होरे मॅडम यांचे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक तर आई गृहिणी. वडिलांचा आदर्श घेऊन शिक्षिका होण्याचं ध्येय मनी बाळगून, त्या कामाला लागल्या. कस्तुरबा वालचंद विद्यालय,सांगली येथे डी.एड. साठी प्रवेश मिळविला. 16 डिसेंबर 1996 हा दिवस त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. याच दिवशी जत तालुक्यातील मुचंडी येथे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.

मुचंडी म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीवरील जत तालुक्यातील शेवटचं गाव. सर्व विद्यार्थी कन्नड बोलणारी. त्यामुळे मराठी भाषेत शिकवताना अनेक अडचणी यायच्या. यावरही मात करत शाळेचा पट आणि गुणवत्ता वाढविण्याचं काम त्यांनी केलं. नंतर 2002 साली मिरवाड येथे बदली झाली. मिरवाड मधील त्यांच्या सहकारी शिक्षिका असलेल्या वैशाली कोळी मॅडम सध्या माझ्या स्टाफ मेंबर आहेत. होरे मॅडम यांच्याबद्दल त्या भरभरून बोलत असतात. 

2005 साली त्या मिरवाड ता. जत येथून दुधगांव नं.1 मध्ये हजर झाल्या. या शाळेत त्याचं काम अतिशय प्रभावी असं होतं. श्री.जगदीश नलवडे सर आणि श्री. शंकर पवार सर होरे मॅडम च्या कामाचं कौतुक करत. या दोघांनी माझ्या समोर होरे मॅडम बद्दल अनेकदा गौरवोद्गार काढले आहेत. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांचं काम मी प्रत्यक्ष जवळून पाहिलं आहे. 

दुधगांव नं.1 मधील अकरा वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर, त्यांची दत्तनगर(बामणोली) या शाळेत झाली. तेथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. दत्तनगर ची शाळा तशी कामगारांच्या मुलांची शाळा. तब्बल 80% विद्यार्थी हे उत्तर प्रदेश व बिहारचे. या शाळेत शुभांगी कुंभार मॅडम यांच्या मदतीने ग्रीन एफ.एम. वर सहावी व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम सादर केला. याबद्दल ग्रीन एफ.एम. ने उत्कृष्ट सूत्रसंचालन व कार्यक्रम सादरीकरणाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला. कुपवाड येथील ज्येष्ठ नागरिक संघ यांचेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

2018 साली त्यांची बदली पुन्हा एकदा दुधगांव येथे झाली. मात्र यावेळी शाळा दुधगांव नं.2 होती. इथलं त्यांचं काम नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट राहिलं. एका अपघातात त्याचा मोडला. परंतु, विद्यार्थी हित लक्षात घेऊन, दोनच दिवसांच्या विश्रांतीनंतर त्या पुन्हा शाळेत रूजू झाल्या. यावेळी त्यांच्या व सहकाऱ्यांच्या मेहनतीने इ.7 वी तील दोन विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकल्या. त्यांच्या या कामाची दखल घेऊन ग्रामपंचायत दुधगांव ने "आदर्श शिक्षिका पुरस्कार" देऊन सन्मानित केले. तसेच, प्राथमिक शिक्षक बँकेकडून "सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार" देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

एक शिक्षिका म्हणून त्या ग्रेटच आहेतच. तितक्याच त्या सामाजिक भान असलेली महिला म्हणून परिचित आहेत. डी.एड. च्या द्वितीय वर्षात असताना, घरच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे मी पेपर टाकायचो. त्यावेळी होरे मॅडम गावातच राजू आवटी यांच्या घरी राहायच्या. त्यांच्याही घरी नियमित पेपर टाकायचो. त्यांचा मुलगा सौरभ इयत्ता चौथीत शिकायचा. त्याची चौथी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासंदर्भात मॅडमनी आग्रह केला. द्वितीय वर्षाची परिक्षा संपली होती. त्यामुळे माझ्याकडे वेळ होता. मी लगेच होकार दिला आणि त्याच दिवसापासून सौरभची शिकवणी सुरू झाली. शिकवणीच्या निमित्ताने या कुटुंबीयांना जवळून अनुभवता आलं. श्री.अरूण होरे सर यांनाही जवळून अनुभवता आलं. एकंदरीत त्यांचे विचार अगदी प्रभावी आणि निर्णय प्रक्रिया उत्तम असल्याचं जाणवलं.

2008 साली नोकरीसाठी नेमकं सीईटी परीक्षा जाहीर झाली. अर्ज भरण्यासाठी पैशांची नितांत गरज होती. यावेळी मदतीला होरे मॅडम धावून आल्या. सौरभ ची ट्युशन फी तर दिलीच, शिवाय फॉर्म भरण्यासाठी जादा पैसेही दिले. "तुला फॉर्म भरण्यासाठी हे पैसे उपयोगी पडतील." हे त्यांचे शब्द आजही स्मरणात आहेत. मिळालेल्या पैशातून पुस्तकं खरेदी केली आणि नोकरीचा अर्जही भरला अन् नोकरीही मिळाली. होरे कुटुंबीयांचं माझ्या जीवनातलं स्थान खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकवेळी ते हितचिंतकाच्या भूमिकेत माझ्यासोबत राहिले आहेत. 

आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे होरे मॅडम यांची बदली कवठेपिरान येथे झाली आहे. त्यांची शिल्लक राहिलेली सेवा पाहता, त्या पुन्हा दुधगांवमध्ये परततील. यात शंकाच आहे. दुधगांव शाळेत त्यांची तब्बल 15 वर्षे सेवा झाली आहे. दुधगांवसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मॅडमचे मनःपूर्वक आभार आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!!



No comments: