Sunday, May 1, 2022

श्रीमती शोभाराणी दत्तात्रय लोखंडे, वरिष्ठ मुख्याध्यापिका यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने...

श्रीमती शोभाराणी दत्तात्रय लोखंडे, वरिष्ठ मुख्याध्यापिका यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने...

जीवनात आलेल्या अनेक अडथळ्यांवर मात करून, पुढे जाणाऱ्या व्यक्तीचं यशस्वी जीवन जगू शकतात. अशी व्यक्तिमत्व खूपच प्रेरक असतात. अशा प्रेरक व्यक्तिमत्वापैकी एक व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्रीमती शोभाराणी लोखंडे मॅडम...

लोखंडे मॅडम या माझ्या जिल्हा परिषद शाळा बागणी नंबर 2 च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका. तब्बल 33 वर्षे करून, दि.31/05/2022 रोजी नियत वयोमानानुसार आपण सेवानिवृत्त होत आहात.

दिनांक 16 मार्च 1965 रोजी वडील श्री.सदाशिव जाधव व आई विजया यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आईचा संस्कार अन् शिक्षक असलेल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या शिक्षिका बनल्या. 5 जुलै 1987 मांगले नं.2 ता. शिराळा येथून त्यांच्या नोकरीचा श्रीगणेशा झाला. स्वच्छ व सुंदर शाळा" स्पर्धेत, त्यांनी दिलेल्या योगदानामुळे, मांगले नं.2 जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळाला. 

यानंतर जिल्हा परिषद शाळा बावची येथे त्यांना सहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली. येथेही आपण आपल्या कार्याचा ठसा उमटविला. विविध स्पर्धांत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. 

सध्या सेवानिवृत्त होत असलेल्या बागणी नं.2 येथे त्यांना तब्बल सोळा वर्ष शैक्षणिक कार्य करण्याची संधी मिळाली. स्वतःच्या गावात काम करताना कामातील आपला उत्साह मी स्वतः पाहिला आहे. लोकनृत्य व एकांकिका सारख्या स्पर्धांमध्ये सांगली जिल्ह्यात सलग दहा वर्षे त्यांनी शाळेला यश मिळवून दिले. त्यांच्या कार्यकाळात शाळेला वसंतदादा सबलीकरण पुरस्कारही मिळाला. तसेच, "माझी शाळा आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल" साठी शाळेची निवड झाली.

तब्बल 20 महिने त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. या काळात वीस वर्ष होऊनही जास्त अनुभव मला मिळाला. सुरुवातीला सहकारी शिक्षिका आणि नंतर वरिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं. सजगता, अचूकता, निर्णय क्षमता व कार्यतत्परता या नेतृत्वाच्या व प्रभावी व्यक्तिमत्वाच्या पैलूंची ओळख, त्या वरिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून कामकाज पाहत असताना झाली. याचकाळात त्या एक उत्तम शीघ्रकवी व लेखिका असल्याचेही लक्षात आले. 

त्यांनी माझ्यासाठी वेळोवेळी प्रेरकाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी, शाळेच्या विकासासाठी अनेक उपक्रमांत त्यांनी मला प्रेरणा दिली. त्या माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिल्या. अगदी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या असतानाही, त्या शिष्यवृत्ती तासिके घेण्यासाठी साडेनऊ वाजता शाळेत यायच्या. याचं मला प्रचंड अप्रूप वाटायचं. 

एक वर्गशिक्षिका म्हणून त्या आपल्या वर्गाप्रती प्रचंड निष्ठेने काम तर करायच्याच. याचबरोबर एक वरिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून संपूर्ण शाळेचं कामकाज अतिशय जबाबदारीनं पार पाडायच्या. तंत्रज्ञानातील काही बाबी त्यांनी या वयातही आत्मसात करून घेतल्या. त्यामुळे तंत्रज्ञानविषयक शालेय कामकाज करण्यासाठी काही अंशी त्या स्वयंपूर्ण होत्या. 

मॉडेल स्कूलच्या कामकाजात लोकसहभाग जमा करण्यात त्यांची भूमिका फार महत्त्वाची होती. आपल्या परिचयाच्या व्यक्तींकडून लोकसहभाग मिळवून घेण्यात, त्यांनी नेहमी अग्रेसर असायच्या. शाळेसाठी तन - मन - धन अर्पून काम करायच्या. मॅडम च्या अमेरिकास्थित भावाने मॅडमच्या वाढदिनी, "तुला काय हवं ?" असं विचारलं. तेंव्हा क्षणाचाही विचार न करता त्यांनी मॉडेलस्कूल साठी देणगी मागितली. त्यांच्या भावानेही मोठ्या मनाने मॉडेलस्कूल साठी वीस हजार रुपयांची देणगी दिली. इतकंच नव्हे तर, भावाच्या फौंडेशन कडूनही शाळेसाठी मदत मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने भावाकडून स्वतःसाठी काही तरी घेतलं असतं. परंतु, शाळेसाठी देणगी मागणाऱ्या लोखंडे मॅडमच्या या कृतीचं मला प्रचंड कौतुक वाटलं आणि वाटत राहिलंही.

लोखंडे मॅडम यांच्या आजवरच्या आयुष्याची वाटचाल अतिशय संघर्षपूर्ण अशी आहे. अनेक अडचणी, समस्या त्यांच्या जीवनात आल्या. पतीचा मृत्यू, कुटुंबाची जबाबदारी आणि कौटुंबिक कलह यातून निर्माण झालेल्या समस्या यावर मात करत, त्यांनी कुटुंब पुढे नेलेच, याचबरोबर शाळेची ही जबाबदारी अतिशय नेटाने पार पाडली. 

दि.31 मे रोजी लोखंडे मॅडम सेवानिवृत्त होत असल्या तरी, शालेय कामात, अध्यापनात मदत करण्यासाठी त्या नियमित शाळेत येणार असल्याचा शब्द दिला आहे. 

त्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन वाळवा पंचायत समिती, इस्लामपूरने "तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका" पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

धन्यवाद...!!!



No comments: