Monday, May 2, 2022

यशवंत - एक प्रेरणास्त्रोत च्या रेडिओ प्रसारणाच्या निमित्ताने...

🎯 यशवंत - एक प्रेरणास्त्रोत
🎯 यशवंत - एक प्रेरणास्त्रोत च्या रेडिओ प्रसारणाच्या निमित्ताने...
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव.9096320023




"यशवंत एक प्रेरणास्त्रोत" चार वर्षापूर्वी सुरू झालेला हा प्रवास आज एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. व्हाट्सअप, फेसबुक च्या असंख्य समूहावर या लेखाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. महाराष्ट्र-कर्नाटक-गुजरात-हैदराबाद सह जगभरातल्या तब्बल वीसहून अधिक देशांत 'यशवंत' पोहोचलं. मध्यंतरीच्या काळात 'नवी अर्थक्रांती' सारख्या एका नावाजलेल्या प्लॅटफॉर्मवरून सलग दोनशे दिवस 'यशवंत' प्रसारीत करण्यात आलं. आजवर तब्बल अडीच लाखाहून अधिक वाचकांनी ब्लॉगला भेटी दिल्या आहेत. ही लेखमाला केवळ वाचकांपर्यंत मर्यादित न राहता, काही संबंधित यशवंतांपर्यंतही पोहोचली. पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट तर, पद्मश्री तात्याराव लहाने यांच्याशी फोनवर संवाद या काही ठळक आठवणी. यासोबतच काही यशवंतांनी, त्यांच्यावर लिहिलेले लेख रिट्विट सुद्धा केले आहेत. ही माझ्यासाठी विलक्षण आनंदाची बाब.

या काही अविस्मरणीय प्रसंगांसोबतच "यशवंत - एक प्रेरणास्रोत" चा एक नवा प्रवास सुरू होत आहे. दिनांक 2 मे 2022 पासून इस्लामपूरचं लोकप्रिय रेडिओ स्टेशन "रेडिओ शुगर 90.8" या कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून सोमवार ते शुक्रवार सकाळी ठीक 7 वाजता "दीपस्तंभ" या कार्यक्रमांतर्गत 'यशवंत' मध्ये लिहिलेल्या प्रेरणादायी कथांचं प्रसारण होणार आहे. 

"रेडिओ शुगर" ही पालकमंत्री मा.जयंतरावजी पाटील यांची संकल्पना. कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून "रेडिओ शुगर" चे कामकाज सुरू आहे. स्वतःचं रेडिओ स्टेशन असणारं राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे एकमेव इंजीनियरिंग कॉलेज आहे. राजारामबापू पाटील उद्योग समूहाने यासाठी प्रायोजकत्व दिलं आहे. श्री.उदय गोडबोले सर हे रेडिओ मॅनेजर म्हणून कामकाज पाहतात.

20 ऑगस्ट 2021 रोजी "रेडिओ शुगर" ची सुरुवात झाली. अगदी वर्षभराच्या कालावधीतच यशाची अनेक शिखरं "रेडिओ शुगर" नं पदाक्रांत केली. नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपुर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून तब्बल 196 देशातील सहा लाख लोकांशी "रेडिओ शुगर" जोडलं गेलं आहे. इतकचं नव्हे तर 'कायदा फायद्याचा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती केली, म्हणून RIT ला AICT चा "लिलावती पुरस्कार" मिळाला आहे.

"जिंदगी स्वीट हो जाये" या Tagline च्या माध्यमातून इस्लामपूर व परिसरातील लोकांचे लोकांचे जीवन जीवनमान उंचावण्याचे, त्यांच्या आयुष्यात आनंद भरण्याचे काम "रेडिओ शुगर" च्या माध्यमातून केलं जाते आहे. 

रेडिओ शुगरच्या प्रोग्रॅम मॅनेजर सौ.अर्चना थोरात मॅडम "दीपस्तंभ" या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत. त्यांच्या मधुर आवाजात "यशवंत" ऐकल्यानं रसिक श्रोत्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. असा विश्वास आहे. 

या पोस्ट च्या माध्यमातून माझी सर्व वाचक मित्रांना विनंती आहे की, आपण https://play.google.com/store/apps/details?id=com.fd.music या दिलेल्या लिंकवर क्लिक करून, हे "रेडिओ शुगर" चं ॲप डाऊनलोड करून घ्यावं आणि "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" सोबतच "रेडिओ शुगर 90.8" मनमुराद चा आस्वाद घ्यावा.

धन्यवाद...!!!

No comments: