Saturday, May 28, 2022

श्रीमती उज्ज्वला रांजणे मॅडम यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *श्रीमती उज्ज्वला रांजणे मॅडम यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने...*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*




प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरकाचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते. त्याच्या जोरावरच व्यक्ती यशाची शिखरं सर करत असतो. माझ्या अन् माझ्या पत्नीसाठी नेहमी प्रेरकाची भूमिका बजावणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय उज्ज्वला रांजणे मॅडम. दिनांक 31 मे 2022 रोजी त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने आजचा लेखन प्रपंच...

रांजणे मॅडम यांचे वडील सैन्यात सुभेदार, तर आई गृहिणी. त्यांना चार भावंडं. तीन भाऊ अन् एक बहिण. त्या सर्वात थोरल्या. त्यांचं मूळगाव भिलवडी पण, त्याच्या कुटुंबाचा बराचसा काळ आजोळी म्हणजेच वाळव्यात गेला. त्यामुळे वडिलांनी सेवानिवृत्ती नंतर वाळव्यातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 

रांजणे मॅडम यांचं दहावी पर्यंतचं शिक्षण वाळव्यातच झालं. पुढं काय करायचं ? हे निश्चित नव्हतं. परंतु, मामानं दिलेला सल्ला प्रमाण मानून, त्यांनी डी.एड. करण्याचा निर्णय घेतला. आष्टा येथील लठ्ठे अध्यापक विद्यालयात यशस्वीरित्या डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले आणि सुरुवातीला कराड येथील एका खाजगी संस्थेत नोकरीस सुरुवात केली. 

7/02/1984 हा त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. कारण, याच दिवशी त्यांना जि.प.शाळा गुळवंची ता. जत येथे नेमणूक मिळाली. खानापूर तालुक्यातील मोहिते वडगाव, वाळवा तालुक्यातील नवेखेड, शिरगाव, वाळवा नं. 4 या शाळेत त्यांनी उपशिक्षिका म्हणून कार्य केले. आष्टा नं. 17 या शाळेत तब्बल 10 वर्षे वरिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून कामकाज पाहिले. नंतर वाळवा पंचायत समिती, इस्लामपूर येथे शिक्षणविस्तार अधिकारीपदी  बढती मिळाली. 

आमची पहिली भेट झाली, तो दिवस म्हणजे 7 ऑक्टोंबर 2020. सौ. राजश्रीला जि.प.शाळा आष्टा नं.17 या शाळेत पदस्थापना मिळाली होती. आम्ही हजर होण्यासाठी गेलो होतो. मॅडम येथे वरिष्ठ मुख्याध्यापिका होत्या. त्यांना आमचा परिचय सांगितला. यावर मॅडम म्हणाल्या, "ते 'यशवंत' चे लेखक तुम्हीच काय ?" मी होय म्हणालो. त्यांनी लेखनाचं कौतुक केलं. हा आमच्या पहिल्या भेटीतला लक्षात राहणारा संवाद. पुढे सौ. राजश्री च्या निमित्ताने मॅडमचा आमच्या कुटुंबाशी स्नेह वृद्धिंगत होत गेला. यानिमित्ताने मॅडमच्या स्वभावाचे अनेक पैलू जवळून अनुभवता आले.

सौ.राजश्रीसाठी रांजणे मॅडम यांनी सदैव प्रेरकाची भूमिका बजावली. शाळेत, वर्गात विविध उपक्रम राबवत असताना प्रेरणा अन् पाठबळ देण्याचं मोलाचं काम त्यांनी केलं. यामुळेच, राजश्रीने राबविलेल्या उपक्रमाला राज्यात प्रथम क्रमांक मिळू शकला. 

मॅडमना शिक्षणविस्तार अधिकारीपदी बढती मिळाली. याकाळात त्या जशा होत्या, तशाच राहिल्या. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अधिकारीपदाचा रुबाब कधीच जाणवला नाही. सौ. राजश्रीचा राज्यात प्रथम क्रमांक आल्यानंतर सत्कार करण्यासाठी खास त्या घरी आल्या. याचं मोठं अप्रूप माझ्या आई-वडिलांना वाटलं. अनेकदा त्यांनी माझ्या बागणी नं.2 शाळेला भेटी दिल्या. येथे त्यांच्या डी.एड.च्या सहकारी असलेल्या श्रीमती शोभाराणी लोखंडे मॅडम माझ्या वरिष्ठ मुख्याध्यापक होत्या. शाळेत भेट दिल्यानंतर दोघींच्या मैत्रीत अधिकारीपद आडवं आल्याचं, कधीच जाणवलं नाही. शाळेने राबविलेल्या उपक्रमांना प्रेरणा देण्याचं मोलाचं काम त्यांनी केलं आहे.  


जितक्या प्रेमळ, तितक्याच कणखर असणाऱ्या, सर्वांना सहकार्य करणं हा  स्थायीभाव असणाऱ्या, "जो जसा वागतो, त्याला तशीच फळं मिळतात." या तत्वावर त्याचा प्रचंड विश्वास असणारं, प्रामाणिक अन् कार्यतत्पर व्यक्तिमत्व श्रीमती उज्ज्वला रांजणे मॅडम दिनांक 31 मे 2022 नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि आरोग्यदायी जीवनासाठी आमच्या कुटुंबाकडून मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

No comments: