Sunday, January 7, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 201

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 201*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


2023 सालातील एक महत्वाची घटना म्हणजे चंद्रयान-3. इस्रो'ने चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नेऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याची वाचक मित्रांना माहिती असेलच. चंद्रयान 3 मोहीम यशस्वी करणं हे एकट्या व्यक्तीचं काम नाही. यामागे हजारो लोकांची बुध्दी आणि हात लागले आहेत. असे असले तरी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका "रॉकेट वुमन" चा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागातून जाणून घेणार आहोत. चला तर मग... 



13 एप्रिल 1975 साली उत्तर प्रदेशातील लखनऊ या शहरात एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. आई-वडील, दोन भाऊ व दोन बहिणी असा मोठा परिवार. त्यामुळे मोठ्या आर्थिक समस्यांना तिच्या कुटुंबीयांना तोंड द्यावे लागले. शिक्षण घेतानाही तिला बऱ्याच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.


ती एक हुशार विद्यार्थिनी होती. शालेय जीवनातच तिने आपले ध्येय निश्चित केले होते. विज्ञान विषयाची तिला विशेष आवड होती. एका विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाली. प्रदर्शनातून चंद्र, सूर्य आणि अंतराळ बाबत रोचक आणि रंजक माहिती ऐकून ती प्रभावित झाली. तेंव्हापासून तिने अंतराळाविषयी कात्रणे जमा करायचा छंद जडला. तिच्या या छंदाचे रूपांतर ध्येयात झाले. अंतराळ शास्त्रज्ञ होण्याचं तिनं पक्क केलं.


ध्येयाच्या दिशेने तिची वाटचाल सुरू झाली. भौतिकशास्त्र विषयात तिने पदवी संपादन केले. कष्टाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर वयाच्या 20 व्या वर्षी तिने भारतीय अवकाश संशोधन केंद्र अर्थात इसरो मध्ये नोकरी मिळवली. 


2003 साली चांद्रयान-1 मोहिमेवर काम करण्याची तिला संधी मिळाली. या मोहिमेत तिने दिलेल्या योगदान पाहून, मिशन मंगलयानसाठी तिला उपसंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली. 2013 साली मंगळयान मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली. या कार्यात तिने फार महत्त्वाची भूमिका पार पाडली.


तिच्या कामाचा आवाका पाहून 2014 चांद्रयान-2 मिशनमध्ये संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली. 2019 मध्ये चांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु लँडर पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करू शकला नाही. 


चांद्रयान-2 चे अपयश सर्वांसह तिच्या खूपच जिव्हारी लागला. जेंव्हा चांद्रयान-3 चे काम हाती घेण्यात आले, तेंव्हा प्रकल्प संचालक म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली. तिने हे शिवधनुष्य उचलले. यावेळी मात्र तिने डोळ्यात तेल घालून काम केले. 


जेंव्हा तुमचं यश बोलतं, तेंव्हाच जग तुमच्याकडे बघतं आणि तुमचं ऐकतं. चांद्रयान-3 च्या यशाने ती प्रसिद्धी झोतात आली. साऱ्या जगाचे लक्ष तिने वेधून घेतले. चांद्रयान-3 साठी अपार कष्ट करणारी, ती भारताची "रॉकेट वूमन" म्हणून नावारूपाला आली. ती "रॉकेट वूमन" म्हणजेच डॉ.रितू करिधल श्रीवास्तव होय. 


"यशाच्या प्रवासात 'ध्येयनिश्चिती' हा महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही तुमचे ध्येय कधी निश्चित करता ? यावर यशाचा कालावधी अवलंबून असतो." जितक्या लवकर तुम्ही आपलं ध्येय निश्चित करता, तितक्याच लवकर तुम्हाला यश प्राप्त होतं. शालेय जीवनात शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्नं पाहणाऱ्या डॉ. रितू करिधल यांना वयाच्या 22 व्या वर्षीच स्वप्नपूर्तीचा अनुभव मिळाला. परंतु "रॉकेट वूमन" होणं हेच खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वप्नपूर्तीचा अंतिम टप्पा आहे, असं मला वाटतं.


भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO साठी डॉ.रितू करिधल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते 'इस्रो यंग सायंटिस्ट अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजीज अँड इंडस्ट्रीज (SIATI) द्वारे 'ISRO टीम अवॉर्ड फॉर एमओएम (2015)', 'ASI टीम अवॉर्ड', 'वुमन अचिव्हर्स इन एरोस्पेस' (2017) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.रितू करिधल यांचा प्रेरणादायी प्रवास

म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.


"यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेखमालेवर वाचक मित्रांचे जीवापाड प्रेम आहे. लेखमालेला मिळणारा प्रतिसाद याचे द्योतक आहे. मध्यंतरी या लेखमालेत मोठा खंड पडला होता. त्यामुळे "सर यशवंत कधी सुरू करताय ?" अशी विचारणा वाचक मित्रांनी अनेकदा केली. त्यामुळे लेखनाला प्रेरणा मिळाली. त्यामुळे या नव्या वर्षात प्रत्येक रविवारी एक भाग प्रसारित करण्याचा माझा प्रयत्न असेल. तेंव्हा इथेच थांबतो. पुढच्या रविवारी पुन्हा भेटू.

तोपर्यं

त नमस्कार.


धन्यवाद...!

No comments: