Sunday, January 14, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 202


🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 202*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


"कॉलेज क्वीन ते सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती" पदापर्यंत मजल मारणाऱ्या एका महिलेचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.चला तर मग...



19 डिसेंबर 1934 रोजी आई गंगाबाई आणि वडिल यांच्या नानासाहेब उर्फ नारायणराव यांच्या पोटी तिचा जन्म झाला. पाच भावांत ती एकटीच. त्यामुळे सर्वजण तिला प्रेमाने ताई म्हणायचे. 


ताईचे वडील सरकारी वकील होते. शिवाय समाजकारणात अन् राजकारणात त्यांना विशेष रस होता. सुरुवातीची दहा वर्षे आईच्या छत्रछायेखाली अतिशय सुखात गेली. नंतर अघटीत घडले अन् ताईच्या आईने जगाचा निरोप घेतला. ती पोरकी झाली. त्यानंतर ताईची आणि सर्व भावंडांची देखभाल मावशीने केली. 


आईच्या पश्चात मावशीने ताईला उत्तम संस्कार दिले. मावशीच्या शिकवणीचा मोठा परिणाम तिच्यावर झाला. ती कणखर बनली. वडिलांची वैचारिक शिस्त तिने अंगी बाणविली.


वडिलांनी तिला उत्तम शिक्षण दिले. ताईने राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत पदवी संपादन केली. महाविद्यालयात असताना ताईच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडले. तिच्यातील क्षमतांची जाणीव तिला झाली. टेबल-टेनिस, वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धेमध्ये तिने यश संपादन केले. "कॉलेज क्वीन" म्हणून तिची निवड झाली.


सामाजिक कार्याचा वारसा ताईला वडिलांकडून मिळाला. तिने सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. एका सामाजिक मेळाव्याप्रसंगी तिने पहिले भाषण दिले. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. ते देखील ताईच्या भाषणाने अन् तिच्या संवाद कौशल्याने प्रभावित झाले आणि तिला राजकारणात येण्याचे संधी दिली. तिला विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट दिले.


ताई 1962 साली वयाच्या 28 व्या वर्षी विधानसभेची आमदार बनली. सर्वात महिला तरुण महिला आमदार म्हणून त्या ओळखली जाऊ लागली. 


कर्तृत्वाच्या जोरावर ताई सलग पाच वेळा आमदार बनली. सलग वीस वर्षे तिने निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली. ती राज्यसभेवर निवडून गेली, राज्यसभेची उपाध्यक्ष झाली. 


कार्यकुशलता, चारित्र्यसंपन्नता, जनसामान्यांशी नाळ, प्रशासनावर वचक, कामाचा उरक आदी गुणांच्या बळावर ताईने पक्षश्रेष्ठींच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. यातूनच ताईला 2007 साली राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. 


2007 पर्यंतच्या राजकीय जीवनात ताई कधीही निवडणूक हरली नव्हती. त्यामुळे "राष्ट्रपतीपदाची निवडणूक आपण जिंकणारच." असा विश्वास ताईसोबत पक्षश्रेष्ठींनाही होता. ताईचा जबर विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती फळाला आली अन् ताई जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाची पहिली महिला राष्ट्रपती बनली. ती ताई म्हणजेच प्रतिभाताई पाटील होय.


देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 1962 ची पहिली निवडणूक लढविली होती. आमदार ते राष्ट्रपती असा त्यांचा सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय प्रवास हा थक्क करणारा आहे. आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात प्रतिभाताईंनी डोक्यावरचा पदर कधी ढळू दिला नाही. राजकारण आणि परंपरा यांची उत्तम सांगड त्यांनी घातली आहे. राजकारणात प्रवेश करणाऱ्या आणि निवडणूक लढविणाऱ्या महिलांसाठी प्रतिभाताई यांची कारकीर्द ही सदैव प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत. 


"यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेखमालेवर वाचक मित्रांचे जीवापाड प्रेम आहे. लेखमालेला मिळणारा प्रतिसाद याचे द्योतक आहे. मध्यंतरी या लेखमालेत मोठा खंड पडला होता. त्यामुळे "सर यशवंत कधी सुरू करताय ?" अशी विचारणा वाचक मित्रांनी अनेकदा केली. त्यामुळे लेखनाला प्रेरणा मिळाली. त्यामुळे या नव्या वर्षात प्रत्येक रविवारी एक भाग प्रसारित करण्याचा माझा प्रयत्न असेल. तेंव्हा इथेच थांबतो. पुढच्या रविवारी पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


धन्यवाद...!

No comments: