Sunday, November 13, 2022

माजी विद्यार्थ्यांकडून श्रमदानातून शालेय रंगकाम

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *माजी विद्यार्थ्यांकडून श्रमदानातून शालेय रंगकाम*

🎯 *श्री.संदिप पाटील,दुधगाव. 9096320023.*




काल रविवार. रयत शिक्षण संस्थेचे, भाऊसाहेब कुदळे विद्यालय, दुधगांव येथे श्रमदानातून शालेय रंगकाम पार पडले. खरंतर एक वेगळाच आनंद आणि समाधान या श्रमदानाच्या निमित्ताने लाभले. 

मी या विद्यालयाचा "माजी विद्यार्थी". या विद्यालयाने माझ्या आजवरच्या वाटचालीत खूप मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे विद्यालयाच्या रंग कामासाठी हातभार लावण्याचे परमभाग्य लाभले. याचा मला सार्थ अभिमान आहे.

काही दिवसांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभीकरणाच्या निमित्ताने विद्यालयात जाणं झालं. यावेळी चर्चेदरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.चौगुले सर 

यांनी रंगविण्यासाठी वेळेत कामगार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. "तुमच्या पाहण्यात कोणी असेल तर बघा." अशी विनंतीही केली. आपण दहावीचे वर्गमित्र एकत्र येऊन श्रमदानातून हे काम नक्की करू शकतो. असा विचार त्याचवेळी मनात चमकला. मनातला विचार, ओठावर आला आणि पटकन सरांना सांगितला. "चालतंय की !" सर म्हणाले. 

संध्याकाळी ग्रुप वर पोस्ट टाकली. सर्वच वर्गमित्रांनी चांगला प्रतिसाद दिला. एक-दोन वेळा विद्यासागर विद्यालयात जाऊन आला. नियोजन केलं. रविवारी रंगकाम करायचं ठरलं. त्याप्रमाणे मी, विद्यासागर पाटील, रविकांत कोळी, संदीप कोले, माझा बेंच पार्टनर संतोष कोळेकर आणि विपुल पाटील ठीक दहा वाजता एकत्र आलो. मुख्याध्यापक चौगुले सरांनी रंगाचे साहित्य आणले होतेच. श्री. संदीप कुंभार आणि वर्गमित्र संदीप गुरव यांनी रंगाचे शेड तयार करून दिले आणि कशाप्रकारे रंगवायचं ? याचं प्रात्यक्षिकही दिले. श्री. डी.जे. पाटील सर यांनीही देखील यावेळी मार्गदर्शन केले.

शाळेचे शिक्षक श्री.कर्वे सर आणि श्री.बागाराव सर यांनी दिवसभर सोबत राहून, हातात ब्रश अन् रोलर घेऊन रंगकाम पूर्णत्वास नेण्यास मोठं सहकार्य केले. यासोबतच अवधूत कोळी, स्वराज मोरे, अथर्व कुंभार आणि सुतार या दहावीच्या चार विद्यार्थ्यांनी बहुमोल साथ दिली. विद्यार्थी, माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक यांच्या सहकार्याने हॉलच्या व्हरांड्याचे पहिल्या टप्प्यातील रंगकाम आज संपन्न झाले. कधी पाच वाजले हे समजलेच नाही. पुढच्या रविवारी पुन्हा एकत्र येऊन उर्वरित रंगकाम पूर्णत्वास नेण्याचे ठरले. 

खरंतर शाळा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेला एक वेगळं स्थान असतं. खूप साऱ्या आठवणी अन् भावना शाळेशी जोडलेल्या असतात. याच आठवणींना उजाळा देणं, एकत्र येणं, हसणं, खिदळणं, आनंद घेणं याच उद्देशाने रंगकाम हाती घेतलं. आज हा उद्देश काही अंशी का होईना, पण सफल झाला असं वाटतं. पुढच्या रविवारी हा उद्देश व्हरांड्याच्या रंगकामासोबतच पूर्ण होईल. अशी आशा आहे.

रंगकामाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/6eSfX2ePkFo


धन्यवाद...!

No comments: