🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 1 गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी रायफल उचलणारे कर्मवीर
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.
दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकवटला आहे. देणगी गोळा केली जात आहे. विविध बैठकांच्या माध्यामातून कर्मवीर आण्णांच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. यानिमित्ताने आजपासून दर रविवारी आण्णांच्या जीवनातील कथा, प्रसंग, घटना "असा हा कर्मवीर" या सदराखाली "यशवंत - एक प्रेरणास्रोत" या माझ्या ब्लॉग वर प्रसारित करणार आहे. आपणांस तो नक्की आवडेल. अशी आशा आहे.
“शिक्षण वगैरे गोष्टी आमच्या क्षेत्रात येणार नाहीत, तुम्ही पाहिजे तर पगार वाढवून मागा.” लक्ष्मणराव किर्लोस्कर सेल्स ऑर्गनायझर म्हणून काम करत असलेल्या कर्मवीरांना म्हणाले.
यावर कर्मवीर म्हणाले, "गरीब मुलांचे शिक्षण व्हावे. अशी माझी मनोमन इच्छा आहे. जर आपण कारखान्याच्या नफ्यातील काही भाग कामगारांच्या व इतर मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यास तयार नसाल तर, मी तुमच्याकडे काम करू शकणार नाही.” असे सांगून कर्मवीरांनी किर्लोस्कर कारखाना सोडला.
पुढे कर्मवीरांनी सातारच्या सर धनजीशा कूपर यांच्यासोबत लोखंडी नांगराचा कारखाना सुरू केला. कर्मवीरांनी कूपर यांना विनंती केली की, “नफा झाला तर, त्यातील एक आणा गोरगरीब कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा.”
" नफा झाल्यावर पाहू.” कूपर म्हणाले.
परंतु, प्रत्यक्ष फायदा होऊ लागला तेंव्हा कर्मवीरांनी पुन्हा शिक्षणासाठी पैसे देण्याचा विषय काढला. यावर कूपर कर्मवीरांनी म्हणाले की, “तुमची दोन, आण्याची वाटणी पाहिजे तर आणखी एक आण्याने वाढवा. पण, शिक्षणासाठी पैसे देण्याचा उद्योग मला सांगू नका, ते मी करणार नाही.”
कूपर यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे कर्मवीरांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. कर्मवीर कूपर यांच्यावर रायफल घेऊन धावले. त्यावेळी शेजारी असलेल्या व्यक्तींनी त्यांना अडविले. त्यांची समजूत काढली. तेंव्हा ते शांत झाले.
किर्लोस्करांनी पगारवाढीचा आणि कूपर यांनी नफ्याचा वाटणी वाढवून देण्याचा प्रस्ताव आण्णांच्या समोर ठेवला होता. परंतु, गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी "मनी" तळमळ असणाऱ्या कर्मवीरांना पगारवाढीपेक्षा मुलांचे शिक्षण महत्त्वाचे वाटत होते. म्हणूनच, त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी रायफल हाती घेतली.
ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती प्रलोभनांना बळी पडत नाहीत. म्हणूनच, ते ध्येय गाठतात. कर्मवीर देखील पगारवाढ, नफ्याचा वाटणी वाढ अशा प्रलोभनांना बळी पडले नाहीत. म्हणूनच, त्यांना "रयत शिक्षण संस्था" उभी करता आली.
दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यासाठी पंधरा लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुधगावकरांनी हाती घेतलेल्या या सामाजिक कार्यात सर्वांनी सहभागी होऊन सढळ हाताने देणगी द्यावी. असे आवाहन "कर्मवीर पुतळा सुशोभीकरण समिती" च्या वतीने करण्यात येत आहे.
* संपर्क *
श्री. दिपक अथने - 8857 03 61 08
श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76
श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41
धन्यवाद...!
No comments:
Post a Comment