Sunday, December 4, 2022

असे हे कर्मवीर - कथा क्र.2 एक दृढनिश्चयी व्यक्तिमत्व : कथा क्र.2

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯असे हे कर्मवीर - कथा क्र. 2 एक दृढनिश्चयी व्यक्तिमत्व : कथा क्र.2

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.




दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकवटला आहे. देणगी गोळा केली जात आहे. विविध बैठकांच्या माध्यामातून कर्मवीर आण्णांच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. यानिमित्ताने दर रविवारी आण्णांच्या जीवनातील कथा, प्रसंग, घटना "असा हा कर्मवीर" या सदराखाली "यशवंत - एक प्रेरणास्रोत" या माझ्या ब्लॉग वर प्रसारित करत आहे. आपणांस तो नक्की आवडेल. अशी आशा आहे. 

1909 साली कर्मवीरांचा विवाह वयाच्या बाविसाव्या वर्षी, 12 वर्षाच्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला.

शिक्षण सोडल्यानंतर कर्मवीर वडिलांकडे कोरेगावला आले. कर्मवीरांच्या हाती काम नव्हते. ते बेरोजगार होते. याचकाळात कर्मवीरांच्या जीवनाला कलाटणी मिळणारी घटना घडली. 

एकदा घरी पाहुणेमंडळी आली. वडिलांनी पाहुण्यांसाठी जेवणाचा बेत केला होता. पाहुणे मंडळी जेवायला बसली होती. लक्ष्मीबाई जेवण वाढत होत्या. गप्पा सुरु होत्या. 

एका पाहुण्याने विचारले, "आपले चिरंजीव काय काम करतात ?"  

"काही काम करत नाही. तो एकच काम करतो, दोनवेळ जेवणाचं व गावभर फिरण्याचं." कर्मवीरांचे वडील उत्तरले.

बायको देखत झालेला अपमान जसा कर्मवीरांच्या जिव्हारी लागला, तसा तो लक्ष्मीबाईच्या काळजात घाव करून गेला. झाल्या जखमेने लक्ष्मीबाईंचे डोळे पाणावले. त्या कर्मवीरांना वाढत होत्या. त्यांच्या डोळ्यातले थेंब कर्मवीरांच्या ताटात पडले.


कर्मवीरांनी वर पाहिले. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वडिलांकडून झालेला अपमान, पत्नीला झालेल्या वेदना कर्मवीरांना सहन झाल्या नाहीत. ते जेवत्या ताटावरुन उठले. 

"काहीतरी करुन दाखवलेच पाहिजे." असा मनाचा ठाम निर्धार करुन त्यांनी सातारा गाठले. शिकवण्या सुरू केल्या. हळूहळू मुले वाढू लागली. बोलता-बोलता मासिक उत्पन्न 90-95 रुपयांपर्यंत गेले आणि शिकवणी घेणारे कर्मवीर "पाटील मास्तर" या नावाने संपूर्ण साताऱ्यात ओळखले जाऊ लागले.

जीवनात अनेकदा अपमानास्पद वागणूकीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शांत राहून, संयमाने अन् दृढनिश्चयाने निर्णय घेऊन, मार्गक्रमण करणे महत्त्वाचे ठरते. कर्मवीर असे एक दृढनिश्चयी व्यक्तिमत्व होते. एखादी गोष्ट मनावर घेतली की, त्या गोष्टीचा फपिच्छा पुरवायचे. मग कितीही कष्ट करावे लागले तरी ते मागे हटत नव्हते. या दृढनिश्चयातून कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची बाग फुलवली आहे.

असाच एक दृढनिश्चय दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणासाठी दुधगांवकरांनी केला आहे. यासाठी पंधरा लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुधगावकरांनी हाती घेतलेल्या या सामाजिक कार्यात सर्वांनी सहभागी होऊन, सढळ हाताने देणगी द्यावी. असे आवाहन "कर्मवीर पुतळा सुशोभीकरण समिती" च्या वतीने करण्यात येत आहे. 


* संपर्क *

श्री. दिपक अथने - 8857 03 61 08

श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76

श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41


धन्यवाद...!

No comments: