Saturday, December 10, 2022

असे हे कर्मवीर - कथा क्र.3 कर्मवीर जेव्हा आईकडून फुंकणीने मार खातात

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असा हा कर्मवीर - कथा क्र.3 - कर्मवीर जेव्हा आईकडून फुंकणीने मार खातात
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.







दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकवटला आहे. देणगी गोळा केली जात आहे. विविध बैठकांच्या माध्यामातून कर्मवीर आण्णांच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. यानिमित्ताने दर रविवारी आण्णांच्या जीवनातील कथा, प्रसंग, घटना "असा हा कर्मवीर" या सदराखाली "यशवंत - एक प्रेरणास्रोत" या माझ्या ब्लॉग वर प्रसारित करत आहे. आपणांस तो नक्की आवडेल. अशी आशा आहे. 

कर्मवीरांचे आई-वडील इस्लामपुरास राहत होते. पावसाळ्याचे दिवस होते. सुट्टीत कर्मवीर इस्लामपुरास आले. रिकाम्या वेळेत ते इस्लामपुरातील शाळेकडे गेले. हवेत गारठा सुटलेला होता. वर्गात सारी मुले बसलेली होती. पण, एक मुलगा मात्र वर्गाबाहेर गारठ्यात कुड-कुडत बसलेला त्यांना दिसला.

कर्मवीरांनी त्या मुलाची विचारपूस केली. तो मुलगा दलित होता म्हणून, त्याला वर्गाबाहेर बसविण्यात आले होते. याचा त्यांना राग आला आणि त्यांनी शिक्षकांना दोष दिला.

त्या काळात अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात पाळली जायची. तरीही, कर्मवीर त्या मुलाला सोबत घेऊन घरी आले. जेवण केले व घरातच गप्पा मारीत बसले. थोड्या वेळाने शाळेतील मुले कर्मवीरांच्या घरी आली. समोरचे दृश्य पाहून मुलेही आश्चर्यचकित झाली.

ही गोष्ट कुणीतरी कर्मवीरांच्या आई गंगुबाई यांना सांगितली. आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. "आपल्या दिवट्या पोराने सारे घर विटाळले." असे त्यांना वाटले. म्हणून रागाच्या भरात त्यांनी चुलीजवळची फुंकणी घेतली आणि कर्मवीरांना बदडून काढले.

आईच्या माराने थांबणाऱ्यातले, कर्मवीर मुळीच नव्हते. दुसऱ्या दिवशी ते त्या दलित मुलाच्या घरी गेले. त्या मुलाला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्याला घेऊन तडक कोल्हापूरला आले. ‘मिस क्लार्क होस्टेल' मध्ये त्या मुलाला ठेवले. 

मुलगा हुशार होता. शिकण्याची जिद्द होती. शिकायला मिळतंय म्हणून त्यालाही आनंद झाला. मन लावून शिकला आणि मुंबई विधिमंडळाचा सभासद झाला. 

त्या मुलाला अस्पृश्यांची दुःखे त्याला माहिती होती. अस्पृश्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याकरिता 'मूकनायक' नावाचे एक नियतकालिक त्याने सुरू केले. तो कर्तबगार दलित मुलगा म्हणजेच श्री. ज्ञानदेव घोलप होय. 

कर्मवीरांच्या वसतिगृहास ज्यावेळी म. गांधींनी भेट दिली होती. त्यावेळी कर्मवीरांच्या संस्थेचा अहवाल श्री.घोलप यांनीच वाचलेला होता.

ज्याच्यासाठी कर्मवीरांनी फुंकणीने मार खाल्ला कुमार त्या मुलाने वाया जाऊ दिला नाही. शिक्षणातून त्या मुलाने स्वतःचे कर्तुत्व सिद्ध केले. 

खरंतर कर्मवीरांनी ज्ञानदेव घोलपांसारख्या लाखो विद्यार्थ्यांसाठी खस्ता खाल्ल्या आहेत. म्हणूनच, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आज शिक्षणाची गोड फळे चाखत आहेत. 

परंतु, कर्मवीरांनी केलेल्या या महान कार्याची कदर आजकालच्या राजकारण्यांना मुळीच वाटत नाही. याचे मोठे विशन्न वाटते. त्यांनी थोडसं विचारपूर्वक बोलावं. हीच अपेक्षा.

कर्मवीरांच्या महान कार्याची दखल घेऊन, त्यांच्या कार्याविषयीची कृतज्ञता मनी बाळगून, दुधगांव ता.मिरज, जि.सांगली येथे कर्मवीर अण्णांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण लोकसहभागातून सुरू आहे. या सुशोभीकरणाच्या आपण खारीचा वाटा उचलावा. हीच विनंती. आपली देणगी खालील खात्यावर पाठवू शकता.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली. शाखा-दुधगाव

ACCOUNT HOLDER NAME:
KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON
IFSCCODE:
ICIC0000104
ACCOUNT NO:
KBNP33UV3RH52219

*संपर्क*
श्री. दिपक अथने - 8857 03 61 08
श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76
श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41

धन्यवाद...!!!

No comments: