Sunday, May 26, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 221

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 221*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/221.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/220.html


मानसिक विकलांग असलेल्या वेडी, माकड म्हणून हिणविले गेलेल्या एका तरुणीची ही प्रेरणादायी कथा...


27 सप्टेंबर 2003 रोजी तेलंगणातील कालेडा गावात, एका गरीब कुटुंबात वडील यादगिरी आणि आई धनलक्ष्मी यांच्या पोटी तिचा जन्म झाला. तिचे आईवडील मजुरी करायचे. ती जन्मतः मानसिकदृष्ट्या विकलांग होती. 


तिची वाढ होऊ लागली, तसे तिला अनेक समस्यांना तोंड देऊ द्यावे लागले. शेजारचे लोक तिला "वेडी" आणि "माकड" म्हणून हिणवायचे. त्यामुळे तिला खूप वाईट वाटायचे. ती घरी येऊन रडत बसायची. तिच्या आई-वडिलांनाही टोमणे ऐकावे लागायचे. तिला एखाद्या अनाथाश्रमात सोडून द्यावे. असा सल्ला अनेक नातेवाईकांनी दिला. पण,आई-वडिलांनी तिचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला. 


तिचे शालेय शिक्षण गावातीलच शाळेत झाले. सन 2010 साली वयाच्या सातव्या वर्षी तिच्यातील प्रतिभेचा शोध शाळेतील शारीरिक शिक्षण प्रशिक्षक व्यंकटेश्वरलू यांना लागला. तिची ताकद आणि नैसर्गिकरित्या धावण्याची क्षमता पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी तिला 100 मीटर आणि 200 मीटर धावणे क्रीडा प्रकारात सामील करून घेतले. तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. ती मानसिकदृष्ट्या विकलांग होती. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान तिला अन् प्रशिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. प्रचंड कष्ट करावे लागले. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही तिने राज्यस्तरावर आपली छान सोडली. 


सन 2019 हे वर्ष तिच्यासाठी अगदी खास वर्ष. खम्मम येथे झालेल्या राज्य क्रीडासंमेलनादरम्यान भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक एन. रमेश यांचे लक्ष तिने वेधून घेतले. ते तिच्या घरी गेले आणि तिच्या पालकांना समजावून सांगून तिला हैदराबाद येथील SAI सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यास तयार केले. 


तिच्या घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, तिला हैदराबादला पाठवण्यासाठी बसचे भाडे देण्यासाठी लागणारे पैसे आई-वडिलांकडे नव्हते.


एखाद्या लहान मुलाप्रमाणे तिला हैदराबादमध्ये प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. प्रशिक्षक रमेश यांचे अथक प्रयत्न आणि तिची प्रचंड मेहनत फळाला येऊ लागली. 400 मीटर टी-20 शर्यतीत भाग घेत तिने अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले. 


सन 2023 च्या हांग्जो येथील आशियाई पॅरा गेम्स मध्ये तिने नवा आशियाई पॅरा रेकॉर्ड बनवत पहिल्यांदाच सुवर्णपदकावर कब्जा केला. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. 2024 मध्ये कोबे येथील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावत, पॅरिस येथील पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी एकमेव भारतीय महिला आहे. ती महिला म्हणजेच दिप्ती जीवनजी होय. 


तुम्हांला कोणी "वेडं" म्हटलं तरी हरकत नाही. तुम्हांला कोणी "माकड" म्हटलं तरी हरकत नाही. इतिहास साक्षी आहे कि, वेडी लोकंच इतिहास घडवितात आणि शहाणी लोकं तो इतिहास पुस्तकांतून वाचतात. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी समजत नाही, तोपर्यंत तुम्हांला कोणीही हरवू शकत नाही. आपल्या यशात सर्वात मोठा अडथळा आपला अन् आपल्या विचारांचा असतो. आपण आपल्या विचारांची दिशा बदलली, तर जीवनाची दशा बदलायला वेळ लागत नाही.


जी लोकं दिप्तीला "वेडी" म्हणायची "माकड" मग हिनवायची तिचं लोकं तिने मिळवलेल्या यशानंतर कौतुकासाठी सर्वात पुढे येत आहेत. मानसिक अपंगत्व, समाजाचे टोमणे आणि अत्यंत दारिद्र्यावर मात करत दिप्ती जीवनजी हिने मिळवलेले यश संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच, ती एक यशवंत आहेत. 


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/220.html


धन्यवाद...!





No comments: