Sunday, May 19, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 220

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 भाग - 220

🎯 श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.



https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/220.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/220.html



`"तुझ्या आईप्रमाणे तुलाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो."` असं डॉक्टरांनी तिला सांगितलं, तेव्हा ती घाबरली. कर्करोग होण्याचे मूळ तिने शोधले. अभ्यास केला. संशोधन केलं आणि तिला कर्करोगाचे ते "मूळ", "समूळ" नष्ट करण्याचा मार्ग सापडला. तो मार्ग कोणता ? ती मुलगी कोण ? काय तिचा प्रवास ? जाणून घेऊ आजच्या भागात चला तर मग...


तिचा जन्म दिल्लीतील एका सधन जैन मारवाडी कुटुंबात झाला. दिल्लीतील नामांकित शाळांमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले. 


तिच्या आयुष्यात सारं काही छान सुरू होतं. ती शालेय जीवनात असतानाच, आईला स्तनाचा कर्करोग झाला आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने तिला सांगितलं की, `"तुझ्या आईप्रमाणे तुलाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो."` हे ऐकून ती गांगारून गेली, घाबरली. तिच नव्हे, तिच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर, तिची अवस्था देखील अशीच झाली असती. त्यावेळी ती एक शाळकरी मुलगी होती. 


मित्रांनो, समस्या या नेहमी घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना घाबरलं कि, त्या अधिकच घाबरवतात. पाठ सोडत नाहीत. पण, या समस्यांसमोर धाडसानं उभं राहिलं, त्या समस्यादेखील पळ काढतात. ती या समस्येसमोर धाडसाने उभे राहिली.


तिने कर्करोगाचे कारण शोधायला सुरुवात केली. संशोधनाअंती तिच्या लक्षात आले कि, कर्करोग "मायक्रोप्लास्टिक" मुळेही होतो आहे. कारण, समजल्यानंतर देशातून प्लास्टिक कचरा नष्ट करण्याचा तिने निर्धार केला आणि बारावीपासून तिने कामाला सुरुवात केली. ज्या वयात मुलं आयुष्याचा आनंद लुटत असतात, त्या वयात तिने प्लास्टिक निर्मूलन करण्याचा, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन आणि त्याच्या पुनर्वापर करण्यावर लक्ष केंद्रित केलं. 


2020 साली तिचं लग्न झालं आणि ती जयपूरला स्थलांतरित झाली. याचवेळी कोरोनासारख्या परिस्थितीने जगभर थैमान घातलं. अशातच जयपूरमधील काही सेवाभावी संस्थांशी तिचा संपर्क झाला. या संस्थांच्या मदतीने तिने प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या एका कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून दरमहा 45 हजार किलो प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यायोग्य बनवू लागली. प्लास्टिकवर प्रक्रिया करणारी ती कंपनी म्हणजे `'द डिस्पोजल कंपनी'` होय आणि त्या कंपनीची संस्थापक म्हणजेच भाग्‍यश्री भन्साली जैन होय. 


एका समस्येपासून सुरू झालेला प्रवास भाग्यश्री यांना एका कंपनीच्या स्थापनेपर्यंत घेऊन गेला. आईला झालेल्या कर्करोगामुळे त्यांच्या विचारांची प्रक्रिया गतिमान झाली. समस्येचे रूपांतर स्वप्नामध्ये झाले आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली.  


समस्यांबाबत तक्रार करण्याऐवजी उपायांवरही काम केले पाहिजे. आपण मात्र समस्येवर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळे समस्या आपल्याला दीर्घकाळ सतावत राहतात. या जगात अशी एकही समस्या नाही की, ज्यावर समाधान नाही. `त्यामुळे जीवनातील कोणत्याही समस्येबाबत तक्रार न करता उपाय शोधा. समस्यांचे लवकर निवारण होईल.`


भाग्यश्री यांच्या या कार्याची दखल घेऊन फोर्ब्स 

या आघाडीच्या संस्थेने आशिया खंडातील तीस वर्षापेक्षा कमी वय असलेल्या, प्रभावी व्यक्तींच्या "30 अंडर 30" या यादीत समावेश करून, त्यांच्या कार्याचा गौरव केला. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://sandeepbalgondapatil.blogspot.com


धन्यवाद...!

No comments: