Sunday, May 12, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 219

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 219*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/219.html



"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/219.html



भारतीय पारतंत्र्याच्या काळात न्यायालयात एखाद्या महिलेने अंगावर काळा कोट घालून उभं राहणं शक्यच नव्हतं. त्याकाळी महिलांना कायद्याची प्रॅक्टिस करण्याची परवानगी नव्हती. पण, अशा आव्हानात्मक परिस्थितीत एका भारतीय महिलाने बंड केले आणि ती भारतातील पहिली महिला वकील बनली. तिच्या प्रेरणादायी प्रवासाची ही प्रेरणादायी कथा...


तिचा जन्म महाराष्ट्रातील नाशिकमधील देवळाली येथे 15 नोव्हेंबर 1866 रोजी एका सधन पारशी कुटुंबात झाला. वडील मिशनरी होते तर, आई सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध होती. तिला पाच भावंडे होती.


ज्या काळात महिलांना घरातून एक पाऊलही बाहेर पडू दिले जात नव्हते, अशा काळात तिने घराबाहेरच नव्हे तर, देशाबाहेरही पंख पसरले. मुंबई विद्यापीठातून पदवीधर होणारी ती पहिलीच महिला ठरली. पुढे ती कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेली. ऑक्सफर्ड विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. तसेच, भारत आणि ब्रिटनमध्ये कायद्याचा सराव करणारीही ती पहिली भारतीय महिला होती.


स्वातंत्र्यापूर्वी, भारतात महिलांना उच्चशिक्षण घेणे फार आव्हानात्मक होते. असे असूनही तिने सर्व अडथळे मोडून काढले. सन 1892 साली ती बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली भारतीय महिला बनली. परंतु, कॉलेजने तिला पदवी देण्यास नकार दिला. त्याकाळी महिलांना नोंदणी आणि कायद्याचा सराव करण्याची परवानगी नव्हती.


ऑक्सफर्ड विद्यापीठात वकिलीचे शिक्षण घेऊन सुद्धा तिला भारतात वकीली करण्यासाठी एलएलबी चे शिक्षण घेणे गरजेचे होते. म्हणून सन 1897 मध्ये तिने मुंबई विद्यापीठातून एलएलबी केली. परंतु, त्याकाळी भारतामध्ये महिलांना वकिली करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे तिला वकिली करता येत नव्हती. यासाठी तिने लढायचे ठरवले. 


तत्कालीन इंग्रज सरकारबरोबर तिने तब्बल 25 वर्षे अथक लढा दिला. परिणामी भारतामध्ये महिलांना वकिली करण्याची परवानगी सरकारने दिली. लंडन बारने शेवटी 1922 साली महिलांना भारतात कायद्याचा सराव करण्याची परवानगी दिली आणि 1923 साली कलकत्ता उच्च न्यायालयात बॅरिस्टर पदी तिची नियुक्ती करण्यात आली. भारतात कायद्याचा सराव करणारी ती पहिली महिला वकील बनली. ती महिला म्हणजेच कार्नेलिया सोराबजी होय. 


ध्येयाच्या प्रवासाची सुरुवात एका पावलाने होत असते. फक्त सुरुवातीला असणारा उत्साह शेवटपर्यंत टिकायला हवा. कार्नेलिया यांनी भारतात महिलांना कायद्याचा सराव करण्याची संधी मिळावी. यासाठी तब्बल 25 वर्षे संघर्ष केला आहे. या काळात त्या आपल्या ध्येयापासून जराही परावृत्त झाल्या नाहीत. उलट प्रत्येक पावलागणिक त्यांचा उत्साह वाढत गेला. कार्नेलिया यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी असा आहे. त्यांच्या प्रवासाचे बारकाईने निरीक्षण केले, तर लक्षात येते की, पाहिलेलं कोणतंही स्वप्नं पूर्ण होतंच. यासाठी अखंड संघर्ष आणि अथक प्रयत्न करण्याची आपली मानसिकता असायला हवी.


सन 1909 साली सरकारने ‘कैसर ए हिंद' या सुवर्णपदकाने कार्नेलिया यांना सन्मानित केले आहे. तसेच, सन 2012 मध्ये लंडनच्या हायकोर्ट संकुलात त्यांच्या कांस्य पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत. 


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/218.html


धन्यवाद...!

No comments: