Sunday, August 4, 2024

गुरूंचा महिमा भाग 3

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *गुरूंचा महिमा - भाग - 3*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/08/3.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/08/3.html



गरीब मुलांची स्वप्ने पूर्ण करण्याचे स्वप्नं उराशी बाळगलेल्या एका शिक्षकाची ही प्रेरणादायी कथा...


त्याचा जन्म 1 जानेवारी 1973 रोजी बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील पोस्टात कारकून होते. एका सरकारी शाळेत, मातृभाषेतून त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. गणित हा त्याचा आवडीचा विषय. 


पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्याला केंब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली. परंतु वडिलांचे निधन झाल्याने, तसेच घरची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याने तो केंब्रिज विद्यापीठात गेला नाही. याच काळात संख्या सिद्धांतावर त्याने लिहिलेले पेपर मॅथेमॅटिकल स्पेक्ट्रम आणि मॅथेमॅटिकल गॅझेट नावाच्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले.


त्याला शिक्षक बनायचं होतं. पण, घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. पण, त्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे थांबवले नाही.


त्याला गणिताचे प्रचंड आवड. त्याने गणित विषयाची शिकवणी घ्यायला सुरू केली. ते वर्ष होतं सन 1992. केवळ दोन विद्यार्थ्यांना घेऊन त्याने स्वतःची खाजगी शिकवणी सुरू केली. वर्षाखेरीस ती संख्या 36 पर्यंत येऊन पोहोचली आणि पुढच्या तीनच वर्षात ही संख्या 500 झाली. स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची जाण असल्याने विद्यार्थ्यांकडून अगदी माफक मोबदला घ्यायचा. संघर्षातून स्वतःचे विश्व उभं करणाऱ्या व्यक्तींला इतरांच्या संघर्षाची जाणीव असते.


सन 2000 साल हे वर्ष त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष ठरलं. IIT-JEE ची तयारी करणारा एक गरीब विद्यार्थी त्याच्याकडे शिकवणीची विचारणा करण्यासाठी आला. खाजगी शिकवणीची भरमसाठ फी देण्याची त्याची कुवत नव्हती. त्याच्या विचाराची चक्र गतिमान झाली. 


"गरीब, गरजू आणि प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करायला हवं." या विचाराने त्याला प्रेरणा मिळाली. समोर उभा असलेल्या विद्यार्थ्यासारखे आणखी विद्यार्थ्यांचा शोध घेतला आणि त्याने तीस विद्यार्थ्यांची एक तुकडी तयार केली. त्यांना सर्व सोयीसुविधा देत IIT-JEE परीक्षेची तयारी करून घेऊ लागला.  


आपले विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी व्हावेत. यासाठी तो प्रचंड मेहनत करू लागला. 2008 ते 2012 या वर्षात त्याच्या सुपर थर्टी मधील सर्व 30 विद्यार्थी IIT-JEE परीक्षा पास झाले. असा पराक्रम करणारा तो एकमेव ठरला. तो पराक्रमी शिक्षक म्हणजेच आनंदकुमार होय. 


2018 सालच्या आकडेवारीनुसार आनंदकुमार यांचे 450 पैकी 422 विद्यार्थी आयआयटी सारख्या नामांकित संस्थेत प्रवेशित झाले आहेत. हा एक जागतिक रेकॉर्ड आहे. 


IIT-JEE सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब, पण प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी आनंदकुमार म्हणजे एक देवदूतच आहेत.


आनंदकुमार यांना स्वतःचं स्वप्नं पूर्ण करताना कौटुंबिक परिस्थिती आणि आर्थिक तणाव या गोष्टी अडथळा ठरल्या. परंतु, याच गोष्टीसाठी IIT-JEE सारख्या परीक्षा देऊन नामांकित विद्यालयात प्रवेश घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे स्वप्नं आनंदकुमार यांनी पूर्ण केले आहे.  


आनंद कुमार यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच, ते यशवंत आहेत.


धन्यवाद...!

No comments: