🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *श्री. सुनील शेडगे (आप्पा) लिखित 'वाटा तंत्रस्नेहींच्या' निमित्ताने...*
🎯 *श्री.संदिप पाटील, दुधगाव.9096320023.*
यशवंत एक प्रेरणास्रोत या प्रेरणादायी लेखमालेच्या लेखनामागील प्रेरणा असलेलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. सुनील शेडगे (आप्पा) होय. आज त्यांनी शब्दबद्ध केलेल्या "दै. सकाळ सातारा आवृत्ती" मधील "वाटा तंत्रस्नेहींच्या" या सदराच्या समारोपाच्या निमित्ताने...
श्री. शेडगे सर हे साताऱ्यातील सुपरिचित शिक्षक. ते आप्पा या नावाने सर्वश्रुत. आप्पांचे नाव माहित नसलेली, साताऱ्याच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. इतकं हे व्यक्तिमत्त्व प्राथमिक शिक्षकांत लोकप्रिय आहे.
आप्पांचे मूळ गाव भरतगाव ता. जि. सातारा. वडील प्राथमिक शिक्षक. वडिलांमुळेच त्यांना वाचनाची गोडी लागली. अनेक कथा, कादंबऱ्या अगदी बालवयातच त्यांनी वाचून हातावेगळ्या केल्या. पुस्तकामुळे मस्तक सुधारते आणि जगण्याला दिशा आणि ध्येय प्राप्त होते. अगदी तसेच आप्पांच्या बाबतीत घडले. वाचनामुळेच लेखनाची गोडी लागली. वृत्तपत्रात लिखाणाला सुरुवातही केली. तब्बल पाव शतकाची त्यांची सेवा पूर्ण झाली आहे.
" साताऱ्याच्या सहवासात " हे आप्पांचं पहिलं पुस्तक म्हणजे साताऱ्यातील शेकडो ज्ञात-अज्ञात स्थळांची इतंभुत माहिती देणारा एक विकिपीडयाच होय. अगदी वेचक आणि मोजकं लिहिण्याची त्यांची हातोटी. सुसंगती, सुसूत्रता, सातत्य आणि शिस्त हे आप्पांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. त्यांचं लेखन अनेकांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असतं. त्यामुळे त्यांना लाखोंचा वाचकवर्ग लाभला आहे. मी एक त्या वाचकांपैकीच एक.
2017 साली माझी आणि आप्पांची ओळख एका व्हॉट्सअँप समुहाद्वारे झाली. या समूहावर त्यांचे लेख प्रसारित व्हायचे. त्यांचे लेखन कौशल्य इतके जबरदस्त असायचे की, समूहातील प्रत्येक जण त्यांच्या लेखनाचे कौतुक केल्याखेरीज राहायचा नाही. त्यांचे लेख वाचून मीही प्रभावित झालो. खरंतर आप्पांच्या लेखनाच्या प्रेरणेतूनच "यशवंत - एक प्रेरणास्रोत" चा जन्म झाला आहे. सरांनी फोन करून केलेलं कौतुक आजही आठवतं आणि उर अभिमानाने भरून येतो.
5 सप्टेंबर 2019 साली "दैनिक सकाळ" ने "उपक्रमशील शिक्षक" या सदराची जबाबदारी आप्पांवर टाकली. आप्पांनी सलग 100 दिवस, तब्बल 99 शिक्षकांच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. प्राथमिक शिक्षणात होत असलेल्या नवनवीन उपक्रमांची, शिक्षकांच्या उपक्रमशीलतेची आणि त्यांच्या धडापडीची माहिती या सदरातून साताऱ्यासह राज्यभरातील लाखो वाचकांसमोर मांडली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शिक्षकांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मतप्रवाह निर्माण झाला. प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेल्या शिक्षकांच्या कामाची दखल प्रशासनाने घेतली. त्यांचे कौतुक केले आणि सन्मानित ही केले. 'उपक्रमशील शिक्षक' या सदरात माझ्या आजवरच्या वाटचालीवरही प्रकाश टाकला. माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला प्रसिद्धीच्या झोतात आणले. 'उपक्रमशील शिक्षक' हे दुसरे पुस्तक देखील अनेक मान्यवर अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले आहे.
सध्या जग फार जवळ येत चाललं आहे. संगणक, स्मार्टफोन आदींचे मानवी जीवनातील स्थान अधिकाधिक घट्ट होत चालले आहे. सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत तर ते अधिकच बळकट झाले आहे. Work From Home प्रमाणेच Teaching From Home and Learning From Home या नव्या Online शिक्षणाच्या संकल्पना देखील जन्मास आल्या आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुरू झाली. "ऑनलाईन शिक्षण" ही एक नवी संधीच अनेक गुरुजनांसमोर आली. या संधीचं सोनं करण्यात अनेक यशस्वी झाले. गुरुजी करत असलेल्या या धडपडीला पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी "दै. सकाळ सातारा आवृत्ती" ने "वाटा तंत्रस्नेहींच्या" हे सदर सुरू केले आणि याची जबाबदारी नेहमीप्रमाणेच आप्पांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी हे शिवधनुष्य अगदी लिलया पेललं.
सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत प्राथमिक शिक्षक अनेक आघाड्यांवर काम करत आहेत. एकीकडे कोरोना ड्युटी आणि दुसरीकडे ऑनलाइन शिक्षण. कोरोनाजन्य परिस्थितीत, विद्यार्थी शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षक करत असलेलं कार्य, या सदरातून लाखों लोकांपर्यंत पोहचवले. या सदरातून आजवर तब्बल 75 प्राथमिक शिक्षक शिक्षिकां च्या लॉकडाऊन मधील कार्याला प्रसिध्दी दिली आहे.
आज " वाटा तंत्रस्नेहींच्या " या सदराचा समारोप होत आहे. या सदराच्या निमित्ताने अनेक अपरिचित, प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेल्या शिक्षकांना आणि त्यांच्या कार्याला समाजमान्यता मिळवून दिलं आहे. त्यांना प्रेरित करून दुप्पट वेगाने काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. सरांच्या लेखनामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. ते प्रेरणे मागची प्रेरणा आहेत.
आज " वाटा तंत्रस्नेहींच्या " या सदराचा प्रवास थांबत असला, तरी श्री. शेडगे सर आणि त्यांची लेखणी कधीच थांबणार नाही. लवकरच एका नव्या विषयासह ते आपल्या भेटीला येतील. यात शंका नाही. " वाटा तंत्रस्नेहींच्या " या सदराचे रूपांतर एका सुंदर पुस्तकात व्हावे. यासाठी शुभेच्छा. " वाटा तंत्रस्नेहींच्या " या सदरात समाविष्ट झालेल्या सर्व 75 शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन... आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....
धन्यवाद...
2 comments:
I was regularly reading this inspirational stories through Whatsup media I was surprised toread these stories I learned alot from all these stories. Thank you very much
अप्रतिम शब्दात लेखनाचा गौरव
Post a Comment