🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *फक्त आशीर्वाद द्या... (प्रासंगिक)*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
*आज शाळेमध्ये मैदानाच्या भोवतीने रिप लावण्याचे काम सुरू होते. सोबतच फुलांची अन् शोभेची रोपे लावण्याचेही काम सुरू होते. मुख्याध्यापक श्री. यटम सर यांनी परसबागेची संकल्पना मांडली. मुळातच सरांना शेतीची प्रचंड आवड. त्यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर हिरवागार करण्याचा त्यांचा संकल्प आहे.*
यटम सर म्हणाले, "संदीप सर, आपल्याला परसबाग करण्यासाठी ही जमीन नांगरून घ्यायला छोटा ट्रॅक्टर पाहिजे. कोण आहे का ? बघा." मी क्षणाचाही विलंब न लावता, शाळेचे पालक *श्री. संतोष पंडित* यांना फोन केला. त्यांना म्हणालो, "दादा शाळेमध्ये परसबाग करायची आहे आणि जमीन नांगरून हवी आहे. आज काम होईल का ?"
"सर आलोच." दादा म्हणाले.
पुढच्या पाचच मिनिटांत ते टू व्हीलरने शाळेत आले. कामाचं स्वरूप पाहून निघून गेले.
पावसाळ्यात शेतीची कामे फार कमी असतात. त्यामुळे ट्रॅक्टरची बॅटरी डाऊन झाली होती. खरंतर, बॅटरी डाऊन झाली आहे. असे सांगून त्यांना काम टाळता आले असते. मात्र, शाळेचे काम आहे. केलेच पाहिजे. म्हणून, मित्राकडे जाऊन बॅटरीला जंप मारून घेतला. ट्रॅक्टर सुरू केला अन् अवघ्या वीस मिनिटांत ते शाळेत आले आणि पुढच्या अर्धा तासात परसबागेची जमीन नांगरून दिली.
काम झाल्यानंतर मी त्यांना, "पैसे किती झाले ?" असे विचारले.
त्यावर ते म्हणाले, *"पैसे नकोत सर, फक्त आशीर्वाद द्या."*
कोळी मॅडमनी, "निदान डिझेलचा खर्च तरी सांगा." असे विचारले. तेव्हा त्यांनी गंमतीने "लाख रुपये द्या." असे म्हणत पैसे घेण्यास नम्रपणे नकार दिला.
तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा सुट्टी झाली अन् ते निघून गेले. ट्रॅक्टर शाळेतून बाहेर पडला.
परसबागेच्या नांगरलेल्या जमिनीत काय पेरायचं ? असा प्रश्न यटम सरांना विचारला. तेंव्हा *"फक्त आशीर्वाद द्या."* या तीन शब्दांची माझ्या मनात कायमची पेरणी केल्याचे मला जाणवले.
*धन्यवाद...!*
No comments:
Post a Comment