Sunday, August 25, 2024

गुरूंचा महिमा - भाग - 6

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *गुरूंचा महिमा - भाग - 6*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*




https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/08/6.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/08/6.html



खेळाडू असताना अपूर्ण राहिलेलं स्वप्नं पूर्ण करण्याची संधी प्रशिक्षक म्हणून लाभली. जबाबदारी स्वीकारून स्वप्नपूर्ती करणाऱ्या प्रशिक्षकाची ही प्रेरणादायी कथा...


11 जानेवारी 1973 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर येथे त्याचा जन्म झाला. परंतु, त्याची संपूर्ण जडणघडण बेंगलोर येथे झाली. त्याची आई प्राध्यापिका होती, तर वडील किसान या जाम बनवणाऱ्या कंपनीसाठी काम करायचे. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याचे नाव " जॅमी " ठेवले. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 


जॅमी ची क्रिकेट मधील आवड लक्षात घेऊन आई-वडिलांनी त्याला उत्तम प्रशिक्षण दिले. 15, 17 आणि 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धात त्याने कर्नाटकचे नेतृत्व केले. क्रिकेटमधील त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे लवकरच रणजी क्रिकेटसाठी त्याची निवड झाली. 


1996 साली जॅमीची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. पण, आपले स्थान पक्के करण्यासाठी त्याला प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. स्वतःला सिद्ध करावे लागले. प्रयत्न, सातत्य, जिद्द आणि संयमाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं. 


1999 च्या विश्वचषक स्पर्धेत जॅमीने सर्वाधिक धावा केल्या. परंतु, भारतीय संघ उपांत्य फेरी पूर्वीच गारद झाला. 2003 साली भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाने भारतीय संघाचा त्रिफळा उडवला. विश्वचषक जिंकण्याचा संघाचं, देशाचं अन् जॅमीचं स्वप्नं अधुरं राहिलं. 


2007 साली जॅमीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला. परंतु, खराब प्रदर्शनामुळे संघ "बाद फेरीतच बाद" झाला. आपण देशाला विश्वचषक जिंकू देऊ शकलो नाही. याचे शल्य जॅमी सदैव टोचत राहिले. अशातच मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीच्या वेळी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार पेक्षा अधिक धावा करणारा तो केवळ तिसराच खेळाडू होता. 


2015 साली जॅमीने 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली. एक खेळाडू म्हणून अखेरपर्यंत हार न मानण्याची त्याची वृत्ती प्रशिक्षणामध्येही उतरली. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावीच लागते. हे त्याला माहिती होते. त्यामुळेच टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून, कामावर लक्ष केंद्रित केले. यास कालावधीत "भारत अ" संघाच्या प्रशिक्षकपदाची देखील त्याने जबाबदारी स्वीकारली. त्याने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडली होती. म्हणूनच, 2021 साली त्याची निवड मुख्य संघाच्या प्रशिक्षकपदी झाली. त्यावेळी भारतीय क्रिकेट संघात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती.


2013 नंतर भारतीय संघाने एकही आयसीसी चषक जिंकला नव्हता. त्यामुळे कामाचे मोठे दडपण जॅमी वर होते. पण, दडपणाशी कसा सामना करायचा ? हे तो कोळून प्याला होता.


2024 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेवर त्यांने नजरकेंद्रित केली. "खेळाडू म्हणून जे यश मला मिळत आले नाही, ते प्रशिक्षक म्हणून मिळवायचेच." हे स्वप्न उराशी घेऊन तो झटू लागला. कठोर संयम, उत्तम नियोजन, अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण कामगिरीवर जॅमीने भर दिला. संघाची बांधणी केली.


तो सुदिन उगवला. 30 जून ची ती रात्र. स्वप्नपूर्ती करणारी ती रात्र. त्या रात्री भारतीय क्रिकेट संघाने T-20 विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले. या यशात खेळाडूंचा जितका वाटा आहे, तितकाच वाटा प्रशिक्षकाचा देखील आहे. ज्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारताने विश्वचषक जिंकला प्रशिक्षक जॅमी म्हणजेच राहुल द्रविड होईल. 


शांत आणि संयमी स्वभाव, कठोर मेहनत, टीकाकारांकडे दुर्लक्ष आणि कामगिरीवर लक्ष या गुणांमुळे अनेक आव्हानात्मक आणि कठीण परिस्थितीतही ते भक्कम भिंतीसारखे उभे राहायचे. म्हणूनच, त्यांना "द वॉल, द ग्रेट वॉल, मिस्टर डिपेंडेबल" सारख्या टोपण नावाने ओळखले जाते. 


संयम हा प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा गुण. कितीही कठोर परिस्थिती असली तरी, संयम राखणे आणि काम करत राहणे केवळ याच बाबी यशाच्या शिखरावर घेऊन जातात. द्रविड यांना खेळाडू असताना अपूर्ण राहिलेलं स्वप्नं पूर्ण करण्याची संधी प्रशिक्षक म्हणून लाभली. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून स्वप्नपूर्ती केली 

म्ह

णूनच, ते एक यशवंत आहेत.


धन्यवाद...!

No comments: