Saturday, June 8, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 222

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 भाग - 222

🎯 श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.




https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/222.html

"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"

दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/222.html

ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय जिम्नॅस्ट महिलेचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत चला तर मग...

तिचा जन्म 9 ऑगस्ट 1993 रोजी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे झाला. तिचे वडिल स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे अर्थात SAI कडे प्रशिक्षक होते. त्यामुळे क्रीडाक्षेत्राचा वारसा घरातच होता. 


"माझ्या मुलीने जिम्नॅस्टिकमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने चमकावे." असे वडिलांचे स्वप्न. यासाठी त्यांनी तिला प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्याकडे सोपवले. तेव्हा तिचे वय होते अवघे सहा वर्षे. जिम्नॅस्टिकमधील कारकीर्दीच्या प्रारंभीच प्रशिक्षकांना एक मोठा अडथळा जाणवला. तो म्हणजे तिच्या पायाचे तळवे सपाट होते. अशा पायांमुळे ॲथलिटला संतुलन राखणे, धावणे किंवा उडी मारणे अडचणीचे ठरते. त्यामुळे जिम्नॅस्टिकमध्ये तिचा निभाव कसा लागणार ? असाच प्रश्न तिच्या प्रशिक्षकांना पडला. पण, तिने कठोर मेहनतीच्या बळावर या वैगुण्यावर मात केली.


सुरुवातीला भारी अपयश पदरी पडलं. पण, ती डगमगली नाही. सतत सराव करत राहिली. विविध स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केले. जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीयस्तरापर्यंत सर्व स्पर्धांमध्ये तिने स्वतःचा दबदबा निर्माण केला. तिच्या दमदार कामगिरीमुळे 2014 साली राष्ट्रकुल स्पर्धा क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली. जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धात तिने ब्राँझ पदक मिळविले. असे पदक मिळवणारी पहिलीच भारतीय महिला होती. 


दमदार कामगिरीच्या जोरावर सन 2016 साली रियो येथे संपन्न झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी तिची निवड झाली. ती ऑलम्पिकमध्ये सामील होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. या स्पर्धेत ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती. अगदी थोडक्यात तिचे पदक हुकले असले तरी तिच्या या कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली होती. ऑलम्पिकमध्ये सामील होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट महिला म्हणजेच दीपा कर्माकर होय.


सन 2018 साली एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी दीपा ही पहिलीच भारतीय होती. याबरोबरच नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीवाहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे.


भारतात जिम्नॅस्टिक्समध्ये असलेले कमी महत्त्व, राज्यसरकारकडून होणारी जिम्नॅस्टिक्सची उपेक्षा, शारीरिक वैगुण्य, गुडघ्यांच्या दोन शस्त्रक्रिया आणि डोपिंग उल्लंघन प्रकरणी एकवीस महिन्यांचे निलंबन या साऱ्या संकटांवर मात करत दीपाने मिळवलेले यश निश्चितच स्पृहावह आहे. 


जिम्नॅस्टिक्स मध्ये दीपाने देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने तिला "पद्मश्री" हा मानाचा किताब देऊन देऊन सन्मानित केले आहे. याचबरोबर 2017 साली फोर्ब्स ने 30 वर्षांखालील आशियातील "सुपर अचिव्हर्स"च्या यादीत तिला स्थान देऊन तिच्या कार्याचा गौरव केला आहे. म्हणूनच, ती एक यशवंत आहे.

मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/221.html

धन्यवाद...!

No comments: