Sunday, June 16, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 223

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 223*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/223.html

"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"

दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/223.html




जर तुमच्यात धैर्य आणि ध्येय साध्य करण्याची इच्छा असेल तर, कोणतीही गोष्ट तुमचा मार्ग रोखू शकत नाही. तीच गोष्ट तामिळनाडूतील एका 23 वर्षीय आदिवासी तरुणीने साध्य केली. तिच्या नेत्रदीपक यशाची ही प्रेरणादायी कथा...

तिचा जन्म तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगम शहराजवळील थुविनजीकुप्पम या दुर्गम गावात झाला. जंगलाने वेढलेल्या या गावात ना शाळा, ना चांगले रस्ते. गावात मूलभूत सुविधांचा तीव्र अभाव. सर्वात जवळचे बसस्थानक सुमारे 15 किलोमीटर अंतरावर. त्यामुळे चांगल्या राहणीमानाच्या शोधात तिच्या आई वडिलांनी गाव सोडले.

तीन भावंडांमध्ये ती सर्वात मोठी. तिचे सुरुवातीचे आयुष्य खूप कठीण आणि संघर्षांनी भरलेले होते. वडील शेती करायचे. तर, आई इतरांच्या घरी धुणे-भांडी आणि अन्न शिजवण्याचे काम करायची. अनंत अडचणींचा सामना करूनही आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कसलीही कसर सोडली नाही. 12 वी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण करून तिने पुढील शिक्षणासाठी डॉ. आंबेडकर शासकीय विधी महाविद्यालय, चेन्नई येथे प्रवेश घेतला.

अशातच रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या तरुणासोबत तिचा विवाह झाला. पण, त्या जिद्दी तरुणीने लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवले. शिक्षणाशिवाय कुटुंबाची परिस्थिती बदलू शकणार नाही. यावर तिचा ठाम विश्वास होता. त्यामुळे लग्नानंतरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत, तिने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.

कायद्याचे शिक्षण घेत असतानाच तिने न्यायिक सेवा परीक्षेची तयारी सुरू केली होती. अशातच ती गरोदर राहिली. घरातील काम, अभ्यास आणि पोटात वाढणाऱ्या बाळाची काळजी यात समतोल राखत जिद्दीने तिने अभ्यास सुरू ठेवला. गर्भातील बाळासोबत तिचा अभ्यासही वाढत गेला. 

प्रसूतीची तारीख आणि न्यायिक सेवा परीक्षेची तारीख एकाच दिवशी आली. मोठा यक्ष प्रश्न तिच्या समोर उभा राहिला. असे असतानाही तिने अभ्यास कायम ठेवला. सुदैवाने परीक्षेच्या दोन दिवस आधीच तिची प्रसूती झाली. तिला मुलगा झाला. दोन दिवसांवर परीक्षा होती. डॉक्टरने विश्रांतीचा सल्ला दिला होता. म्हणून, तिने परीक्षेला जाऊ नये. असे कुटुंबीयांना वाटत होते. पण, ती फार निश्चयी होती. तिला ही संधी हातची जाऊ द्यायची नव्हती. तिच्या दृढनिश्चयापुढे कुटुंबीयांनी हात टेकले. परीक्षेसाठी ती 200 किलोमीटरचा प्रवास करून, नवजात शिशू सोबत घेऊन चेन्नईला पोहोचली. तिने परीक्षा दिली. 

निकाल लागला. तिच्या मेहनतीचे चीज झाले. ती परीक्षा उत्तीर्ण झाली. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी न्यायाधीश बनली. तामिळनाडू राज्यातील पहिली आदिवासी महिला न्यायाधीश होण्याचा किताब तिने पटकाविला. ती महिला म्हणजेच व्ही. श्रीपती होय.

व्ही. श्रीपती यांचा प्रवास खडतर आणि प्रेरणादायी आहे. कौटुंबिक बांधिलकी अन् सामाजिक अपेक्षा यांचा समतोल साधत, स्वतःचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झटत असताना अनेक आव्हाने श्रीपती यांच्या समोर आली. त्यांनी आपल्या समर्पण अन् जिद्दीने मोठे यश मिळवले आहे. 

जन्माला आलेल्या प्रत्येकाचे स्वप्नं पूर्ण होऊ शकते. फक्त त्यासाठी समर्पण, जिद्द आणि कष्ट करण्याची मानसिकता हवी. समर्पण, जिद्द आणि कष्टाच्या बळावर व्ही. श्रीपती यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. समाजातील सर्व तरुण-तरुणींसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

🎯 मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/223.html

धन्यवाद...!

No comments: