Saturday, June 22, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 224

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 भाग - 224

🎯 श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.



https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/224.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/224.html


बारावीत शिकत असलेल्या एका 

विद्यार्थिनीने नुकतेच जगातले सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करत एक विक्रम प्रस्थापित केला. तिच्या या पराक्रमाने केवळ भारतातच नव्हे जगभर तिचे कौतुक होत आहे. कोण ती मुलगी ? तिने नेमका कोणता विक्रम केला ? काय तिचा संघर्ष? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...



सन 2008 साली तिचा जन्म मुंबईतील एका सधन कुटुंबात झाला. वडील नौसेना अधिकारी, तर आई एका खाजगी शाळेत शिक्षिका होती. तिच्या वडिलांना गिर्यारोहणाची फार आवड. सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांनी अनेकदा पदाक्रांत केल्या होत्या. वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तिने ट्रेकिंगला सुरुवात केली. 


सन 2015 साली वयाच्या सातव्या वर्षी तिच्या हिमालयातील ट्रेकिंगची सुरुवात झाली. वयाच्या सातव्या वर्षी चंद्रशिला शिखर तर नवव्या वर्षी स्टोक कांगरी पर्वताची यशस्वी मोहीम तिने पूर्ण केली. छोट्या छोट्या मोहिमांनी तिच्यातील धाडस वाढले, ती धीट झाली, तिच्यातील संयम आणि आत्मविश्वास वृध्दींगत होऊ लागला. तिच्या स्वप्नांच्या कक्षा रुंदावू लागल्या. जगातील सर्व शिखरं तिला खुणावू लागली. 



सातही खंडातील सर्वात उंच शिखरे सर करण्याचे स्वप्नं तिने पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी ती जोमाने कामाला लागली. सराव अन् अभ्यासावर तिने भर दिला. अथक मेहनतीच्या जोरावर तिने पाच खंडातील सर्वोच्च शिखर पदाक्रांत केली. आता माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखराचा क्रमांक होता. 


दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी तिने वडिलांसोबत माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची मोहीम सुरू केली. अथक मेहनत, जबरदस्त इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविशवास आणि जिद्दीच्या जोरावर 20 मे 2024 रोजी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. असा पराक्रम करणारी ती जगातील दुसरी आणि भारतातील पहिली सर्वात तरुण विद्यार्थिनी (मुलगी) ठरली आहे. ती विद्यार्थिनी म्हणजेच काम्या कार्तिकेयन होय.


वयाच्या सोळाव्या वर्षी इंस्टाग्राम, फेसबुक वर रिल्स बनविण्यात धन्यता मानणाऱ्या आजच्या तरुण पिढीसाठी काम्याचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. जर तुमच्यात एखादी गोष्ट पूर्ण करण्याची ओढ असेल, तर ती तुम्ही नक्कीच पूर्णत्वास आणता. पण, यासाठी फक्त जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची मानसिकता हवी असते.


काम्याच्या या पराक्रमाची दखल भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या "मन की बात" या लोकप्रिय कार्यक्रमात घेतली आहे. तसेच, भारत सरकारने तिला प्रतिष्ठित प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे. म्हणूनच ती एक यशवंत आहे.


🎯 मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/223.html


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/222.html


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/221.html


धन्यवाद...!

No comments: