Sunday, July 14, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 225

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯  भाग - 225

🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.




https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/07/225.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/07/225.html


घरातील स्वयंपाकघरातून सुरुवात केलेला व्यवसाय परिश्रम, समर्पण आणि कौशल्याच्या जोरावर, 7 हजार कोटींहून अधिक बाजार भांडवल असणारी कंपनी निर्माण करणाऱ्या एका उद्योजक महिलेची ही प्रेरणादायी कथा...


तिचा जन्म 1940 मध्ये कराचीमधील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. तिचे वडील लाहोरमध्ये काम करायचे. त्यामुळे बालपण लाहोरमध्ये गेले. 1947 मध्ये देशाच्या फाळणीच्या वेळी तिचे कुटुंब दिल्लीत आले. फाळणीचा एक खूप संघर्ष तिने व तिच्या कुटुंबाने अनुभवला. या काळात कडवा संघर्ष त्यांना सहन करावा लागला. 


वयाच्या 17 व्या वर्षी लुधियाना येथील रहिवासी धरमवीर शी तिचे लग्न झाले. धरमवीर एक व्यावसायिक होते. लग्नानंतर तिने शिक्षण पूर्ण केले. तिचे आयुष्य अगदी स्थिर झाले होते. ती सुगरण होती. तिच्या हाताला चव होती. तिने बनविलेला कोणताही पदार्थ स्वादिष्ट असायचा. स्वयंपाक घरात विविध पदार्थ बनवणे व शेजाऱ्यांना खाऊ घालणे हा तिचा आवडीचा छंद. 


तिला तीन मुलगे झाले. जेव्हा तिची मुले शाळेत जाऊ लागली, तेव्हा तिला घरी एकट्याने वेळ घालवणे कठीण होऊ लागले. त्यामुळे तिने संपूर्ण लक्ष आपल्या छंदावर केंद्रित केले. 


तिने आईस्क्रीम, केक आणि कुकीज बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. हे पदार्थ स्वयंपाक घरात बनवून शेजाऱ्यांना चवीसाठी देऊ लागली. शेजाऱ्यांना, परिचितांना तिने बनविलेले पदार्थ आवडू लागले. यातील त्याच्या काही परिचितांनी तिला व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. तिनेही हा सल्ला मानला आणि कामाला सुरुवात केली. 


सन 1970 मध्ये केवळ तीनशे रुपये घेऊन घरी आईस्क्रीम बनवून विकायला तिने सुरुवात केली. अशा प्रकारे तिची व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली. 1978 मध्ये तिने बिस्किटे, कुकीज आणि केक तयार करण्यास सुरुवात केली. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने "क्रिमिका" या नावाने उत्पादने विकायला सुरुवात केली. नंतर कंपनीचे नाव बदलून "मिसेस बेक्टर फूड स्पेशालिटी" असे करण्यात आले. मेहनत, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर घरच्या स्वयंपाक घरातून सुरू झालेला हा प्रवास 7 हजार कोटी रुपयांच्या कंपनीपर्यंत येऊन थांबला. जिच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले ती या कंपनीची मालकीण म्हणजेच रजनी बेक्टर होय. 


रजनी बेक्टर यांच्या कंपनीची बिस्किटे, ब्रेड आणि आईस्क्रीमची 60 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. त्यांची कंपनी मॅकडोनाल्ड आणि बर्गर किंग या फास्ट फूड चेन्सना ब्रेडचा पुरवठा करते. आज मिसेस बेक्टर फूड स्पेशालिटीजचे बाजार भांडवल 7 हजार कोटींहून अधिक आहे.  


जर तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द आणि कठोर मेहनत करण्याची तयारी असेल तर, तुम्हांला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. रजनी बेक्टर यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने सन 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव केला आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत. 


🎯 मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/223.html


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/222.html


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/06/221.html


धन्यवाद...!

No comments: