Tuesday, June 9, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 173

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 173
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._


एकेकाळी बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गाव सोडावे लागलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या आणि याच जाचक परिस्थितीमुळे अर्धपोटी राहावे लागलेल्या एका व्यक्तीने जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले. त्याला हे यश कसे मिळाले ? काय आहे त्याचा संघर्ष ? कोणी ही व्यक्ती ? जाणून घेऊन आजच्या भागात.. चला तर मग...


15 जून 1950 रोजी राजस्थान मधील सादुलपुर या खेड्यात एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर केवळ दोनच वर्षात बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्या वडिलांनी गाव सोडले आणि ते कोलकाता शहरात स्थायिक झाले. सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याच्या वडिलांनी एका कारखान्यात नोकरी स्वीकारली. अथक परिश्रमाच्या जोरावर त्याच्या वडिलांनी आपली आर्थिक स्थिती सुधारली आणि स्वतःचा एक कारखाना सुरु केला.

वडिलांचे कष्ट, मेहनत, जिद्द, समर्पण इत्यादी तो डोळ्याने पाहत मोठा झाला. व्यवसायाचा संस्कार बालवयातच त्याच्यावर होत गेला. त्याचे संपूर्ण शिक्षण कोलकाता येथेच झाले. त्याने वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला. वडिलांचा व्यवसाय जोमात सुरू होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तो आपल्या वडिलांना त्याच्या व्यवसायात मदत करायचा. व्यवसायातील बारकावे त्याने आत्मसात केले.

एक दिवस वडिलांनी त्याला इंडोनेशिया देशात व्यवसायाच्या निमित्ताने खरेदी केलेली जमीन विकण्यासाठी पाठविले. तो गेला आणि त्याने तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. या देशात आपण व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकतो. असे त्याच्या लक्षात आले आणि त्याने वडिलांना स्टील कंपनी उभी करण्याचे सुचवले. 1976 साली म्हणजेच वयाच्या 26 व्या वर्षी त्याने आपला पहिला कारखाना उभा केला. अथक परिश्रम करून त्याने ही कंपनी नफ्यात आणली. आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली.  कंपनी उभी करताना त्याच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे, 'एखादी कंपनी उभी करण्यासाठी एक आयुष्य कमी पडतं. कंपनी उभी करण्यापेक्षा कारखाना किंवा कंपनी विकत घेणंच अधिक फायदेशीर ठरतं.' त्याने याच पद्धतीचा अवलंब केला. जगभरातील नुकसानीत असलेल्या स्टील कंपन्या ताब्यात घेऊ लागला. आपल्या, बुद्धीच्या आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर तो नफ्यात आणू लागला. 30 वर्षे झटून जगातील एकूण स्टील उत्पादना मधील आपला वाटा 10 टक्के इतका केला आणि यामुळेच जगभरात त्याची ओळख 'स्टील किंग' म्हणून निर्माण झाली. तो 'स्टील किंग' म्हणजेच 'लक्ष्मीनिवास मित्तल' होय.

"जी माणसे पायाने चालतात, ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात, ती निश्चितच ध्येय गाठतात." हे विधान मित्तल यांना अगदी तंतोतंत लागू पडतं. 

एकेकाळी अत्यंतिक दरिद्र्याला सामोरे गेलेल्या, कुटुंबात जन्माला आलेले लक्ष्मीनिवास मित्तल यांनी आपल्या वडिलांकडून व्यावसायिक कौशल्य आत्मसात केली. आपल्या बुद्धीच्या आणि व्यावसायिक कौशल्यांचा वापर करून, वडिलांनी निर्माण केलेल्या साम्राज्याचा मोठा विस्तार करून जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळेच ते 2005 साली जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचू शकले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 172* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/172.html

No comments: