Monday, June 8, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 172

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग- 172
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.


वडिलोपार्जित व्यवसायात आलेल्या नुकसानीमुळे डोक्यावर लाखों रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसायात उतरलेल्या एका तरुणाने अब्जावधी डॉलर्स चा व्यवसाय उभा केला. त्याला हे कसे जमले ? काय आहे त्याच्या यशाचं रहस्य ? कोण ही व्यक्ती ? काय त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

हरियाणा मधील हिसार शहरामध्ये बऱ्यापैकी श्रीमंत असलेल्या मारवाडी व्यावसायिक कुटुंबात, 30 नोव्हेंबर 1950 रोजी त्याचा जन्म झाला. पिठाची गिरण आणि कापसाची दलाली हा त्यांचा व्यवसाय. व्यवसायाचे बाळकडू त्याला अगदी बालपणापासूनच मिळाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.

1962 साली भारत आणि पाकिस्तानचे युद्ध झाले आणि याचा परिणाम त्याच्या वडिलांच्या व्यवसायावर झाला. वडिलांचे अतोनात नुकसान झाले. क्षणार्धात होत्याचे, नव्हते झाले. एकेकाळचे श्रीमंत कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी, त्याने शिक्षणाला राम राम ठोकला आणि तो व्यवसायात उतरला. त्यावेळी तो एकोणीस वर्षांचा होता आणि त्याच्या डोक्यावर लाखों रुपयांचे कर्ज होते. अशा परिस्थितीत एखाद्याने पळ काढला असता. पण, त्याने लढण्याचा निर्णय घेतला. चिकाटीने व्यवसाय केला. कर्ज फेडले. त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढीस लागला. त्याने मोठं पाऊल टाकायचे ठरवले. तो थेट दिल्लीत आला. धान्याच्या व्यवसायात जम बसविला. पुढे एका पॉलिथीन बनविणाऱ्या कंपनीची स्थापना केली. याचा कंपनीतून देशातील पहिली प्लॅस्टिक लॅमिनेटेड ट्यूब बनविली. आयात निर्यातीतही बक्कळ पैसा मिळविला.

त्याने मुंबईत एस्सेल वर्ल्ड ची निर्मिती केली. पण, म्हणावा तितका नफा त्याला मिळत नव्हता. त्याने कारण शोधले. भारतीयांना मनोरंजन घराबाहेर नव्हे तर, घरातच हवे असते. त्याने घरातच मनोरंजन द्यायचा निर्णय घेतला आणि 1991 साली भारतातील पहिल्या खाजगी टी.व्ही. चॅनेल ची निर्मिती केली. अल्पावधीतच चॅनल लोकप्रिय झाले.. भारतातील ते पहिले खाजगी टी. व्ही. चॅनेल म्हणजे झी आणि त्याचा जनक म्हणजेच डॉ. सुभाष चंद्रा होय. 

डॉ. सुभाष चंद्रा यांचा हा प्रवास एखाद्या चित्रपटातील कथानकासारखा वाटत असला तरी, तो सत्य आहे. धाडस, चिकाटी, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावरच त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं आहे. 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एकदा तरी नुकसान आणि कर्ज यासारखी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असतेच. अशा परिस्थितीला अनेक लोकं शरण जातात. पण, अशा परिस्थितीशी दोन हात करणारी लोकंच यशाच्या शिखरावर पोहोचतात. डॉ. चंद्रा यांच्या जीवनात देखील कित्येकदा कर्जाची, नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली. त्यासोबत त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच ते भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मानाच्या स्थानी विराजमान आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..


🎯 *भाग - 171* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/171.html

No comments: