Sunday, March 17, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 211

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 211*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/211.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/211.html



गायनाच्या दुनियेत तब्बल सहा दशकं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या, 36 भाषांत गाणी गाऊन, सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या एका "क्वीन ऑफ मेलेडी" चा हा प्रेरणादायी प्रवास...


तिचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये मध्यप्रदेश मधील इंदुर येथे एका गायक परिवारात झाला. पाच भावंडात ती सर्वात थोरली. म्हणून, घरातील सर्वजण तिला प्रेमाने दिदी म्हणायचे. तिचे वडील मराठी रंभूमीवरील प्रसिद्ध गायक व नट होते. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच तिला गायनाचे आणि अभिनयाचे धडे मिळाले. 


वयाच्या पाचव्या वर्षी तिने वडिलांच्या नाटकात बाल कलाकाराची भूमिका निभावली आणि वयाच्या 9 व्या वर्षातच त्यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपलं प्रभुत्व प्रस्तापित केलं. 


तिचं हे कौशल्य पाहून, "मोठेपणी माझी ही मुलगी एक प्रसिद्ध गायिका होणार." अशी भविष्यवाणी वडिलांनी केली. पुढे वडिलांची ही भविष्यवाणी खरी ठरली. पण, मुलीचे यश पाहण्यासाठी ते जिवंत राहिले नाहीत. 


दिदी तेरा वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वात थोरली असल्याने वयाच्या तेराव्या वर्षीच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. त्यामुळे तिचे शिक्षण ही जेमतेमच झाले. 


वयाच्या तेराव्या वर्षापासूनच दिदीने चित्रपटांमध्ये भूमिका करायला आणि गाणी गायला सुरुवात केली. आपलं नशीब आजमावण्यासाठी ती मुंबईत आली. कामासाठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, नट यांच्या तिने भेटी घेतल्या. अनेकांनी तिला बारीक आवाजाची म्हणून नाकारलं, थट्टा केली. पण, ती नाव नाउमेद झाली नाही. 


"येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक तुझे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील." असा विश्वास एका मार्गदर्शकाने तिला दिला. तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. तिने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे आणि उर्दू भाषेचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सोबतच छोट्या - छोट्या चित्रपटांसाठी गाणी गायला सुरुवात केली. 


1949 साल तिच्यासाठी "टर्निंग पॉईंट" ठरलं. "महल" या चित्रपटातील तिने गायलेल्या "आयेगा आनेवाला" या गीताने चित्रपटसृष्टी मध्ये धुमाकूळ घातला. यामुळे तिचे गायन सृष्टीतील तिचे स्थान भक्कम झाले. मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. 


दिदीच्या गायन क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी भारत सरकारने "भारतरत्न" हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. हा पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील ती पहिलीच महिला ठरली आणि ती दिदी म्हणजेच भारताची "गानकोकिळा, क्वीन ऑफ मेलेडी" लता मंगेशकर होय.


प्रत्येक व्यक्तीला जन्मतः एक वरदान लाभलेलं असतं. यश मिळविण्यासाठी त्या वरदानाचा शोध घेणं, त्यावर काम करणं फार महत्त्वाचं असतं. ज्या व्यक्तीला आपल्यातील 'बेस्ट'चा लवकर शोध लागतो, तीच व्यक्ती यशाच्या शिखरावर लवकर पोहोचते. 


लतादिदींच्या बाबतीत असंच घडलं. त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा शोध लवकर लागला. म्हणून, त्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकल्या. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत. 


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/210.html


धन्यवाद...!

No comments: