Sunday, March 10, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 210

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯  भाग - 210

🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.



"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/210.html


अंतराळाचं आकर्षण अनेकांना असतं. तिथं जाण्याचं स्वप्नं अनेकजण पाहत असतात. आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि अशा व्यक्ती एकमेवाद्वितीय बनतात. अशा व्यक्ती समाजातील अनेकांसाठी आदर्श बनतात. समाजासाठी आदर्श असणाऱ्या अंतराळवीर ‘मोन्टो’ नावाच्या एका तरुणीची ही प्रेरणादायी कथा...


17 मार्च 1962 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात ‘मोन्टो’ चा जन्म झाला. तिला एक भाऊ व एक बहिण होती. मोन्टो सर्वात लहान. त्यामुळे ती सर्वांच्या लाडाची बनली. 


मोन्टोचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. शाळेत ती अतिशय हुशार. त्यामुळे शिक्षकांची लाडकी. ती अतिशय साहसी. कराटे सारख्या खेळात तिने नैपुण्य प्राप्त केले. याचबरोबर भरतनाट्यम या नृत्य प्रकारातही तिने कौशल्य संपादन केले. 


"तिला डॉक्टर बनवायचं." ही वडीलांची इच्छा. पण, तिने भावाकडून प्रेरणा घेऊन, वैमानिक होऊन अंतराळात जायचे स्वप्नं उराशी बाळगले. वडिलांनी तिच्या स्वप्नांचा आदर केला. 


जेंव्हा तिचा थोरला भाऊ फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा मोन्टो लाही तेथे जावे, असे वाटायचे. वडिलांनी तिचा नोंदणी अर्ज दिला. तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी, "मोन्टो स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही." असे सांगितले. तसेच, त्यांनी तिला या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. 


घडल्या प्रकाराने मोन्टो आणि तिचे वडील नाउमेद झाले नाहीत. उलट, वैमानिक होण्याची तिची इच्छा अधिक दृढ झाली. तिने एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी आणि अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळवली.


या काळात मोन्टो ची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. त्यांनी तिला विमान चालवायचे प्रशिक्षण दिले. 


अथक मेहनतीच्या बळावर मोन्टोची निवड अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं झाली. नासा मध्ये निवड झाल्यानंतर, तिच्या स्वप्नांच्या कक्षा रुंदावल्या. तिला आता अंतराळ खुणावू लागले होते. यासाठी ती जीवाचे रान करू लागली. सहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मार्च 1996 मध्ये नासा च्या एका अंतराळ मोहिमेसाठी तिची निवड झाली.


मोन्टोची पहिली अंतराळ मोहीम 19 नोव्हेंबर 1997 रोजी सुरू झाली. तिने अंतराळात 10.67 दशलक्ष किमी प्रवास केला. हे अंतर 252 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याएवढे होते.


जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये मोन्टोची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक झाली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे तिच्याच नेतृत्वाखाली करण्यात आले होते. जिच्या नेतृत्वाखाली हे मिशन यशस्वी झाले, ती मोन्टो म्हणजेच भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला होय.


1 फेब्रुवारी 2003 रोजी मोहीम फत्ते करून कल्पना यांनी आपल्या सदस्यांसह पृथ्वीकडं येण्यासाठी झेप घेतली. पण, यानात बिघाड झाला आणि यानाने पेट घेतला. या अपघातात कल्पना चावला यांच्यासह सर्वच अंतराळवीरांचा मृत्यू झाला. 


कल्पना चावला यांचा जन्म हरियाणातील कर्नाल या एका छोट्याशा शहरात झाला. असं असलं तरी, त्यांच्या स्वप्नांची झेप अवकाशात गेली. तुम्ही कुठे जन्माला आला ? हे तुमच्या यशाचं कारण होऊ शकत नाही. तुमचं स्वप्न किती मोठा आहे ? हे तुमच्या यशाचं खरं कारण होऊ शकतं. 


धैर्य, चिकाटी, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कल्पना चावला यांनी स्वतःचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. काही लोक मृत्यूनंतरही आठवणीत सदैव जिवंत राहतात. कल्पना चावला यांच्या बाबतीतही असेच घडले. दोन दशकांनंतरही त्यांची आठवण काढली जाते. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/209.html


धन्यवाद...!

No comments: