Sunday, March 3, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 209

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 209*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


कुटुंबाचा स्थिर असलेला व्यवसाय पुढे नेणं, त्यामध्ये भरघोस वाढ करणं. ही येणाऱ्या पिढीची जबाबदारी असते. पण, व्यवसाय वाढवणं, पुढे नेणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. अनिल अंबानी यांचे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहेच. जिथे भले-भले सपशेल अपयशी होतात. तिथे मद्रासच्या एका महिलेने भीमपराक्रम करून दाखवला आहे. ट्रॅक्टर निर्मितीच्या क्षेत्रात तिने अद्वितीय कामगिरी केली आहे. चाळीस वर्षांच्या अथक परिश्रमानंतर साडेबारा हजार कोटी रुपयांपर्यंत कंपनीची उलाढाल नेऊन ठेवली. यामुळे तिला भारताची "ट्रॅक्टर क्वीन" म्हणून ओळखले जाते. त्या "ट्रॅक्टर क्वीन" चा हा प्रेरणादायी प्रवास...


तिचा जन्म 19 नोव्हेंबर 1959 रोजी मद्रास येथील एका श्रीमंत कुटुंबात झाला. मद्रास युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने व्हॉर्टन स्कूल पेनसिल्व्हेनिया येथून एम.बी.ए. पूर्ण केलं आणि ती भारतात परतली. 


यानंतर तिने वडीलांच्या इच्छेखातर आजोबांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर निर्मिती आणि विक्री व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. दूरदृष्टी, व्यवसायातील संधी, कार्यक्षमता, चिकाटी, अभ्यास या गुणांच्या जोरावर ट्रॅक्टर निर्मिती आणि विक्री क्षेत्रात तिने कंपनीला अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवलं. 


तिच्या मेहनतीच्या बळावर कंपनीची उलाढाल साडेबारा हजार कोटींच्या घरात पोहचली. तिने कंपनीला भारतातील दुसरी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी ट्रॅक्टर निर्यात करणारी कंपनी बनविले. ती कंपनी म्हणजे TAFE - Tractors and Farm Equipment Limited आणि त्या कंपनीची प्रमुख अध्यक्ष म्हणजे मल्लिका श्रीनिवासन होय. 


व्यवसायातील धाडस आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या बळावर मल्लिका श्रीनिवासन या ट्रॅक्टर व्यवसायातील "मल्लिका" बनल्या आहेत.


कुटुंबाचा व्यवसाय पुढे घेऊन जाताना तो वाढवण्यापेक्षा तो टिकवण्याचा फार मोठा दबाव पिढीवर असतो. पिढी कार्यक्षम असेल तर व्यवसाय यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो. मल्लिका श्रीनिवासन या कार्यक्षम, कर्तृत्ववान आहेत. म्हणूनच, त्यांच्या कारकीर्दीत कुटुंबाच्या व्यवसायाने यशाचे शिखर गाठले आहे. 


मल्लिका श्रीनिवासन यांच्या या कामगिरीची दखल घेऊन फोर्ब्स इंडिया ने "वुमन लीडर ऑफ द इयर" या पुरस्काराने त्यांना सन्मानित करून “ट्रॅक्टर क्वीन ” म्हणून गौरव केला आहे. फोर्ब्स अशियाने "टॉप 50 अशिया पॉवर बिझनेसवुमन" म्हणून त्यांचा गौरव केला गेला आहे. तर, भारत सरकारकडून 2014 मध्ये त्यांना पद्मश्री हा मनाचा पुरस्कार मिळाला. म्हणूनच, त्या एक "यशवंत" आहेत.


धन्यवाद...!


No comments: