Sunday, February 25, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 208

यशवंत - एक प्रेरणास्रोत

भाग - 208

श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.



ऐन तारुण्यात एखाद्या पराभवाने नैरश्याकडे झुकणारे आणि किरकोळ कारणाने मृत्यूला जवळ करणारे अनेक तरुण-तरुणी आपण आजूबाजूला पाहत असतो. पण, या तरुणांना आपल्या अवतीभवती असलेले आदर्श डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळेच ते चुकीची पाऊल चालतात. आयुष्यात कितीही संकट आली तरी यशाचे शिखर गाठता येतं. हे त्यांना ठाऊकच नसतं.कदाचित, 


"लहरों से डरकर नौका पार नहीं होती, 

कोशिश करने वालों की हार नहीं होती !" 


कवी सोहन लाल द्विवेदी यांच्या ऊर्जा देणाऱ्या या कवितेतल्या ओळीं त्यांनी वाचल्याचं नसाव्यात. आयुष्यातल्या लाटांना न घाबरता, अडचणींनी भरलेली खाडी वयाच्या 19 व्या वर्षीच पार करून, स्वतःचे अस्तित्व निर्माण करून, भारतीय तरुण-तरुणींसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या, एका महिलेचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ आजच्या भागात... चला तर मग...


24 सप्टेंबर 1940 रोजी एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात तिचा जन्म झाला. तिला दोन मोठ्या बहिणी व एक मोठा भाऊ होता वडील भारतीय सैन्यात एक सामान्य कर्मचारी होते. अगदी कोवळ्या वयात म्हणजे अडीच वर्षांची असतानाच तिच्या आईचे निधन झाले. आईच्या मायेला ती पोरकी झाली. 


अगदी लहान वयातच तिचे वडिलांसोबत नदी घाटावर जाणे झाले. निम्मित होते आंघोळीचे. नियमित जाण्याने अगदी पाच वर्षाची असतानाच, तिने पोहण्याची कला हस्तगत केली. 


वयाच्या पाचव्या वर्षी तिने प्राप्त केलेल्या कौशल्याने वडील फारच प्रभावित झाले आणि त्यांनी तिचे करिअर पोहण्यातच करण्याचे निश्चित केले. यासाठी वडिलांनी तिला एका स्विमिंग क्लब मध्ये दाखल केले. आशियाई गेम्समध्ये पोहण्यातील पहिले सुवर्णपदक विजेते सचिन नाग तिच्या पोहण्याचे कौशल्य पाहून फारच प्रभावित झाले.


नाग यांनी तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. नाग यांच्या मार्गदर्शनाखाली तिने जलतरणाचे धडे गिरवले. 


वयाच्या पाचव्या वर्षीपासून तिने स्पर्धात सहभागी व्हायला सुरुवात केली. शालेय जीवनातच 100 मी. व 200 मी. फ्री स्टाईल, 100 मी. व 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक यासारख्या जलतरण प्रकारात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने स्वतः चा दबदबा निर्माण केला. वयाच्या नवव्या वर्षीच तिने पोहण्यात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 


जलतरणातील तिची दमदार कामगिरी पाहून, 1952 साली हेलसिकी येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी तिची निवड झाली. या स्पर्धेत भारताकडून सहभागी झालेली, ती सर्वात तरुण खेळाडू ठरली. 


याच दरम्यान तिची भेट इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय पुरुष ब्रोजेन दास यांचेशी झाली. दास यांच्या कामगिरीने ती अधिकच प्रभावित झाली आणि तिने इंग्लिश खाडी पार करण्याचा निर्धार केला. पण, इंग्लंडला जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. या कठीण काळात तिच्या सोबत्यांनी तिला मदत केली आणि इंग्लंडला पाठवले. 


27 ऑगस्ट 1959 रोजी फ्रान्सच्या केप ग्रिस नेझ ते इंग्लंडमधील सँडगेट या दरम्यानची इंग्लिश खाडी पोहण्याच्या स्पर्धेत तिने सहभाग घेतला. पण, दुर्दैवाने तिची पायलट बोट वेळेवर उपलब्ध झाली नाही. यामुळे स्पर्धेतील तिची सुरुवात 40 मिनिटे उशीरा झाली. असे असले तरीही स्पर्धेत सहभाग घेतला. पोहण्यासाठीच्या अनुकूल स्थितीत बदल झाला. पाण्याचा प्रवाह उलट्या दिशेने वाहू लागला. तरीही ते जिद्दीने पुढे जात होती. परंतु बोट पायलटचा दबाव वाढल्याने, तिला स्पर्धेतून माघार घेतली. हा पराभव तिच्या जिव्हारी लागला. पण, पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा तिने निर्णय घेतला. जिद्दीने अन् त्वेषाने ती सराव करू लागली. 


29 सप्टेंबर 1959 रोजी फ्रान्सच्या केप ग्रिस नेझपासून तिने इंग्लिश खाडी पोहायला सुरूवात केली. जलद गतीच्या लाटांचा सामना करत, 42 मैलांचा प्रवास करत ती इंग्लंडच्या सँडगेटला पोहचली. धैर्य, चिकाटी आणि सहनशीलतेच्या बळावर हे अंतर तिने केवळ 16 तास 20 मिनिटांत पार केले. 


संपूर्ण भारतभर तिच्या कर्तुत्वाचा डंका वाजला. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. कारण, तिने एक विक्रम प्रस्थापित केला होता. इंग्लिश खाडी पोहून जाणारी ती पहिली भारतीय आणि आशियाई महिला ठरली होती. इंग्लिश खाडी पोहून जाणारी, ती पहिली भारतीय महिला म्हणजेच आरती साहा होय.


आरती साहा यांनी इंग्लिश खाडी पोहून पार केले, त्यावेळी त्यांचे वय केवळ 19 वर्षे होते. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी एक पराभवही सहन केला होता. खरंतर आज कालच्या तरुण-तरुणी या वयात "नको ते उद्योग" करण्यात व्यस्त असतात. त्या तरुण - तरुणींसाठी आरती साहा यांचा हा प्रवास आदर्शवत आहे. आपले आदर्श कोण असायला हवेत ? याची जाण आजच्या बहुसंख्य तरुण - तरुणींना बिलकुल नसते. यामुळेच ते पहिल्या पराभवाने निराश होतात, मृत्यूला जवळ करतात. साहा यांच्या या प्रवासातून त्यांना आणखी एकदा प्रयत्न करण्याचा बोध मिळतो. 


आरती साहा यांच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन, भारत सरकारने 1960 साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. पद्मश्री पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.


धन्यवाद...!

No comments: