Sunday, February 18, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत - भाग - 207

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 207*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*




कुणीतरी बरोबरच म्हटलंय की, "काहीतरी वेगळं करायचं असेल, तर गर्दीपासून दूर जा. गर्दी हिंमत तर देते. पण, ओळख हिरावून घेते."

स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या, केवळ सहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि वयाच्या 69 व्या वर्षी पद्मश्री पुरस्कारापर्यंत मजल मारणाऱ्या एका शेतकरी महिलेची ही प्रेरणादायी कथा...


भारताच्या आग्नेयस असलेला, पाचशे एकाहत्तर बेटांचा केंद्रशासित प्रदेश म्हणजेच अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह होय. याच द्वीपसमूहाच्या दक्षिण अंदमानमधील रंगाचंग इथली ती रहिवाशी. अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तिचा जन्म. जेमतेम सहावीपर्यंत शिक्षण तिने घेतलं. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे पुढचं शिक्षण घेणे तिला जमलं नाही. "अम्मा" या टोपण नावानं रंगाचंग भागात ती प्रसिद्ध आहे. 


एका शेतकरी कुटुंबात तिचा विवाह झाला. पतीची 10 एकर शेती असल्यामुळे पतीबरोबर शेतीची कामे करणे, तिची दिनचर्या बनली. 


भागातील असंख्य शेतकऱ्यांचा रासायनिक खतांच्या आधारे शेती करण्यावर भर होता. 

मात्र पारंपारिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा मार्ग निवडला. सेंद्रिय शेतीतून ती लवंग, आले, अननस आणि केळीची लागवड करायची. त्यातून भरपूर उत्पन्न घ्यायची. 


शेतीत अधिक राबण्यापेक्षा कष्ट कसे कमी करता येतील ? जमिनीची सुपीकता कशी वाढवता येईल ? खर्च कसा कमी करता येईल ? आणि उत्पन्न कसे वाढवता येईल ? या बाबींवर तिचा भर असायचा. 


तिच्या या प्रयोगशील वृत्तीमुळेच शेतीसाठी फायदेशीर ठरणारे अनेक शोध तिने लावले. नारळ, खजुर आणि ताडाच्या झाडांचे नुकसान नियंत्रित करण्यासाठी तिने काही उपाय शोधले. तिच्या या उपायांचा फायदा भागातील शेकडो शेतकऱ्यांना झाला आणि हे शेतकरी रासायनिक शेती सोडून पारंपरिक शेतीकडे वळले. 


नारळ पिकासाठी तिने सुचवलेल्या उपायांमुळे भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आणि "नारियल अम्मा" या नावाने प्रसिद्धीस आली. ती नारियल अम्मा म्हणजेच के. चेलम्मल होय. 


केवळ सहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या "नारियल अम्मा" मुळे 150 हून अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले. अंदमान सारख्या प्रतिकूल परिस्थिती असलेल्या प्रदेशात ही खूपच मोठी उपलब्धी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. "नारियल अम्मा" याच कार्याची दखल घेऊन भारत सरकारने 2024 सालचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. 


जास्त पुस्तकं शिकलेल्यांना प्रश्न पडला असेल की, केवळ सहावी शिकणारी महिला जर पद्मश्री पुरस्कार मिळवत असेल तर आमच्या शिकण्याचा उपयोग काय ? खरंतर पुस्तके ज्ञानापेक्षा व्यवहारी ज्ञान फार महत्त्वाचं असतं.


ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात, त्या क्षेत्रात तुम्ही संशोधने केली नाहीत, तर तुमची प्रगती होणार नाही. व्यवसाय असो अथवा नोकरी पुढे जाण्यासाठी संशोधनांशिवाय पर्याय नाही. 


सध्याच्या घडीला कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या शेतीसारख्या व्यवसायातही संशोधनाची कास धरून, नारियल अम्मां यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत. 


धन्यवाद...! धन्यवाद...! धन्यवाद...!

No comments: