Sunday, February 11, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 206

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 206*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

वडीलांच्या इच्छेखातर आवडीचे क्षेत्र सोडणाऱ्या अन् वडीलांच्या स्वप्नांची पूर्ती करण्याऱ्या एका मुस्लिम महिलेचा हा प्रेरणादायी प्रवास चला तर मग...


तिचा जन्म 30 एप्रिल 1927 रोजी त्रावणकोर (सध्याच्या भारतातील केरळ राज्यात) पठाणमथिट्टा येथे झाला. तिचे वडिल एक सरकारी कर्मचारी होते. आठ भावंडात ती सर्वात थोरली. मोठं कुटुंब असूनही पित्याने मुलींच्या शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. आपल्या सहाही मुलींना त्यांनी शिक्षण घेण्यासाठी पूर्ण प्रोत्साहन दिले. हा स्वातंत्र्य पूर्व काळ होता. 

शालेय शिक्षण पूर्ण करून तिने रसायनशास्त्रात पदवी घेतली. हा तो काळ होता जेव्हा मुस्लिम मुली उच्च शिक्षणापासून दूर होत्या. असे असूनही तिला केवळ रसायनशास्त्रात पदवी संपादन करायची होती. पण, तिचे वडील अण्णा चंडी या तत्कालीन त्रावणकोर राज्यातील पहिल्या महिला न्यायिक अधिकाऱ्याच्या कथेने प्रेरित झाले होते. म्हणून, त्यांनी तिला कायद्याचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. 

वडीलांच्या इच्छेखातर तिने आपल्या आवडीच्या क्षेत्राचा त्याग करत, कायद्याचे शिक्षण घेतले. तिने कायद्याची विद्यार्थिनी म्हणून पदवी प्राप्त केली. 

त्याकाळी वकिलात प्रवेश घेण्यासाठी बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. 1950 मध्ये तिने कौन्सिलकडून सुवर्णपदक मिळविले. असा पराक्रम करणारी पहिली महिला कायदा पदवीधर ठरली.

तिने कोल्लम जिल्हा न्यायालयात कनिष्ठ वकील म्हणून प्रवेश घेतला. ती हिजाब घालून कोर्टात जायची. मुस्लीम समाजातील परंपरावाद्यांना मुस्लीम महिला न्यायालयात जाणे पसंत करत नव्हते. यामुळे तिला अनेकदा विरोध सहन करावा लागला. पण, ती डगमगली नाही. तिने आपले काम सुरूच ठेवले.

वकिली सुरू करून आठ वर्षे झाली होती. अशातच एक नामी संधी तिच्यापुढे उभी राहिली. शासकीय सेवेत दाखल होण्याची ती संधी होती. शासनाने घेतलेली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, ती जिल्हा न्यायाधीश झाली अन् वडिलांची इच्छा पूर्ण झाली. 

तिच्या या धाडसाने तिच्यासमोर अनेक नवीन संधी उपलब्ध होत गेल्या. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत, ती पुढे जात राहिली. यशाची शिडी सर करत राहिली.

1989 हे साल तिच्यासाठी सर्वोच्च संधी घेऊन आलं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून तिची निवड झाली. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड होणारी, ती पहिलीच भारतीय महिला ठरली. असा पराक्रम करणारी ती महिला म्हणजेच न्यायमूर्ती फातिमा बीवी होय. 

एका मुलाखतीत बोलताना फातिमा बीवी त्याच्या यशाबद्दल म्हणाल्या होत्या कि, "मी देशातील इतर महिलांसाठी मार्ग खुला केला आहे." त्यांचं म्हणणं अगदी खरंच आहे. त्यांच्यामुळेच पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या न्यायिक क्षेत्रात, महिलांनी पाऊल ठेवत, ही मक्तेदारी मोडीत काढत, स्वतः चे वेगळे स्थान निर्माण करत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.

न्यायमूर्ती फातिमा बीवी यांनी अशा काळात मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला, ज्या काळात भारतात महिलांच्या अधिकारावर बंधनं होती. तेंव्हा ती बंधनं झुगारत, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले समाजाची बंधनं झुगारत, समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण करत, नवी क्रांती घडविली. 

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केरळ सरकारने केरळ प्रभा तर भारत सरकारने मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

"यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेख मालिकेचे प्रसारण दर रविवारी करतो आहे. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. तो पर्यंत नमस्कार..!

मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

धन्यवाद...!


No comments: