Sunday, February 4, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 205

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 205*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*




"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा होण्याच्या पूर्वसंध्येला देशाने पद्म पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. एकूण 132 जणांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले. पुरस्कार विजेत्यांच्या या लांबलचक यादीत, रूढींपरंपरावर मात करून पशुसंवर्धन आणि पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःचे एक स्थान निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान म्हणून एका महिलेला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ती महिला कोण? आणि काय आहे तिचा प्रेरणादायी जीवन प्रवास? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...


ती आसाममधील गौरीपूरच्या रहिवासी. एका सधन कुटुंबात तिचा जन्म झाला. हत्ती पकडून विकणे हा त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय. पण, सरकारने हत्ती विक्री वर बंदी घातल्याने त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. पण, तरीही हत्तींबाबत असलेले कुटुंबाचे आकर्षण काही कमी झाले नाही. तिचे वडील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हत्ती तज्ज्ञ होते. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच तिला हत्तींबरोबर खेळायची आणि बागडायची आवड निर्माण झाली. वडीलाप्रमाणे तिलाही हत्तींशी जिव्हाळा निर्माण झाला. 


वयाच्या 14 व्या वर्षी तिला पहिला पकडण्यात यश मिळालं. तेंव्हापासून तिने हत्तींना स्वतःच्या तालावर नाचवायला सुरुवात केली. शिवाय तिने हत्तीसंवर्धनाची कामेही सुरू केली. मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी तिने स्वतःला झोकून दिले.


"माणसांना हत्तींपासून आणि हत्तींना माणसापासून वाचवणे." हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ती काम करू लागली. चहाच्या मळ्यात घुसलेला असो की, वाट चुकलेला हत्ती असो, त्याचा किंवा माणसाचा जीव जाण्यापूर्वी हत्तीला सुखरूप पुन्हा जंगलात पाठविण्यासाठी केवळ ती सदैव तत्पर असे. आजवर हजारो हत्तींचे आणि त्याहून अधिक माणसांचे प्राण तिने वाचविले आहेत. 


आजवर तीन राज्य सरकारांना जंगली हत्ती शोधणे आणि पकडणे, यासाठी तिने मदत केली आहे. जिथे सर्व प्रयत्न थकतात, तिथे ती भक्कमपणे उभी असते. 


महाकाय हत्तीसमोर उभं राहताना जिथे पुरुषांना घाम फुटतो, तिथं ती अगदी भक्कमपणे उभी असते. तिच्या या प्रेरणादायी प्रवासाने प्रभावित होऊन, बीबीसीने तिच्या जीवनावर “क्वीन ऑफ एलिफंट” नावाचा माहितीपट बनविला. तर कोलकाता आंतरराष्ट्रीय वन्यजीव आणि पर्यावरण चित्रपट महोत्सवाने तिला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. ती "हस्ती कन्या" म्हणूनही ख्यात आहे. ती “क्वीन ऑफ एलिफंट”, '‘हस्ती कन्या’' म्हणजेच पार्बती बरुआ होय. 


मानवी जीवनात मुंगी एवढ्या समस्येसमोर नांगी टाकणारी अनेक माणसं आपणांस अवतीभवती पाहायला मिळतात. पण, हत्तीसारख्या भीमकाय समस्येसमोरही हात न टेकता, हार न मानता उभं राहणारी माणसाचं यशाचं शिखर गाठू शकतात. 


पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात, चालत आलेल्या रूढीपरंपरांना फाट्यावर मारून, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या पार्बती बरुआ या भारतातील पहिल्या महिला माहूत आहेत. 


त्यांनी हत्तींसाठी आणि मानव जातीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना "पद्मश्री" पुरस्काराने सन्मानित केले आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.


"यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेख मालिकेचे प्रसारण दर रविवारी करतो आहे. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. तो पर्यंत नमस्कार..!

मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

भाग - 201

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/01/201.html

भाग - 202

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/01/202.html

भाग - 203

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/01/203.html


भाग - 204

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/01/204.html


धन्यवाद...!

No comments: