Sunday, January 28, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 204

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 204*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका *यशवंत - एक प्रेरणास्रोत*



काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने केलेल्या भीमपराक्रमाने माझं लक्ष आकर्षित केलं. तिच्या प्रेरणादायी प्रवासाने मी प्रभावित झालो. त्या महिला सैन्य अधिकाऱ्याचा हा प्रेरणादायी प्रवास....


राजस्थान मधील उदयपूर येथे 18 जुलै 1997 रोजी राजेंद्र आणि अंजली यांच्या पोटी तिचा जन्म झाला. तिचं नाव शिवा ठेवलं गेलं. ती अकरा वर्षांची असतानाच, तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी आईवर येऊन पडली. तिच्या शिक्षणाकडे आईने जातीने लक्ष दिले. 


अगदी लहानपणापासूनच शिवाला खाकी वर्दीचं विशेष आकर्षण होतं. खाकीचे आकर्षण तिचं स्वप्न बनलं. सिविल इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण करून स्वप्नपूर्तीच्या मार्गाकडे तिने वाटचाल सुरू केली. प्रचंड जिद्द अन् कठोर मेहनतीच्या बळावर मे 2021 मध्ये भारतीय सैन्यातील इंजीनियर रेजीमेंट मध्ये स्वतःचे स्थान तिनं पक्क केलं. शिवाचं स्वप्नं पूर्ण झालं. 


चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) येथे शिवाचं प्रशिक्षण पूर्ण झालं. प्रशिक्षण कालावधीत तिनं दाखविलेलं धाडस, अधिकाऱ्यांच्या चर्चेचा अन् कौतुकाचा विषय बनलं.


जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धक्षेत्रात पुरुष इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व करण्याचे आव्हान तिच्या समोर उभे राहिले. खरंतर हे आव्हान नव्हते, तर एक नामी संधी होती, जी तिने वर्षभराच्या कामगिरीच्या बळावर मिळवली होती. 


खडतर प्रशिक्षणातून तिने स्वतःला सिद्ध केले. उत्तम कामगिरीच्या आधारावर जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमीवर म्हणजेच सियाचीन येथे तिला तैनात करण्यात आले. भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याला जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमीवर तैनात करण्यात आले होते. असा विक्रम जिच्या नावावर नोंदवला गेला, ती शिवा म्हणजेच कॅप्टन शिवा चौहान होय. 


काराकोरम रेंजमध्ये सुमारे 20 हजार फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशिअर हे जगातील सर्वोच्च उंचीवरील युद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते. उणे 40 ते उणे 60 अंश सेल्सिअस तापमान, जोरदार हिमवृष्टी आणि बोचरे वारे यांचा सामना तिथल्या सैनिकांना करावा लागतो. 


जिथे पुरुषांचा निभाव लागणे मुश्कील आहे, अशा प्रतिकूल ठिकाणी कॅप्टन शिवा यांनी सेवा बजावणे म्हणजे जीवावर उदार होण्यासारखे आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत कॅप्टन शिवाय यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. 


मी महिला आहे, मी हे आव्हान पेलू शकणार नाही, माझी अडचण आहे यासारखी असंख्य कारणे सांगून आलेल्या संधीला कॅप्टन शिवा यांना नाकारता आलं असतं, पळ काढता आला असता. परंतु, समोर आलेल्या आव्हानात्मक परिस्थितीतही संधी शोधून, नेतृत्व आणि कर्तृत्वातून समस्त भारतीय महिलांसमोर धैर्याचा अन् शौर्याचा एक आदर्श निर्माण केला आहे. म्हणूनच, कॅप्टन शिवा या एक यशवंत आहेत. 


"यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेख मालिकेचे प्रसारण दर रविवारी करतो आहे. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. तो पर्यंत नमस्कार..!

मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

भाग - 201

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/01/201.html

भाग - 202

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/01/202.html

भाग - 203

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/01/203.html


धन्यवाद...!

No comments: