Sunday, January 21, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत- भाग 203

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 203*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*






एका दुष्काळी तालुक्यात, अपंग पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीनं महाराष्ट्राचे नाव देशाबरोबरच आशिया खंडात उज्वल केलं. त्या सुवर्णकन्येचा हा प्रेरणादायी प्रवास...

धाराशिव तालुक्यातल्या रुईभर या गावात तिचा जन्म झाला. अपंग वडील, पाचवीला पुजलेला दुष्काळ, अशिक्षित कुटुंब अन् नाजूक आर्थिकस्थिती अशा दैनंनीय परिस्थितीत तिचा जन्म झाला. 

आई अन् आजी दुसऱ्याच्या शेतात राब-राब राबायचे. त्यांच्या मेहनतीच्या बळावर कुटुंबाची गुजराण व्हायची. तिला आपल्या परिस्थितीची जाण होती. तिला हे सगळं बदलायचं होतं. त्यामुळे ती मन शिकू लागली. 

पाचवीत असताना तिला खो-खो खेळ आवडू लागला. ती खेळात रममाण होऊ लागली. या खेळात ती अगदी पारंगत झाली. पण, तिचं खो-खो खेळणं वडिलांना आवडत नव्हतं. वडिलांनी तिच्याशी बोलणं बंद केलं. या बिकट परिस्थितीत आई अन् आजीने तिला बळ दिले. 

तिने अनेक स्पर्धांत यश संपादन केले. तिची मेहनत फळाला आली अन् तिची महाराष्ट्राच्या खो-खो संघात निवड झाली. हा तिच्यासाठी सोनेरी क्षण होता. पण, असे अनेक सोनेरी क्षण तिची वाट पाहत उभे होते. 

मिळालेल्या संधीचं तिनं सोनं केलं. प्रयत्न, चिकाटी, सातत्य अन् मेहनतीच्या बळावर अल्पावधीतच संघाच्या कर्णधारपदापर्यंत ती पोहोचली. 

तिचा खेळ अन् सातत्य पाहून तिची भारतीय खो-खो संघात निवड झाली. अथक परिश्रम घेत तिने संघाला अनेक सुवर्णपदकं मिळवून दिली. तिने आपल्या कौशल्याच्या बळावर भारतीय संघाच्या कर्णधारपदाला गवसणी घातली. तिच्या कारकीर्दीत भारतीय संघाने आशियायी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

खो-खो खेळातील तिच्या योगदानाबद्दल 2020 साली भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन तिला गौरविले. खो-खो खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळविणारी पहिलीच खेळाडू ठरली, असा पराक्रम करणारी, ती सुवर्णकन्या म्हणजेच सारिका काळे होय. 

सातत्य, चिकाटी अन् मेहनतीच्या बळावर हवं ते यश मिळवता येतं. मग तुमची आर्थिक, कौटुंबिक अन् सामाजिक परिस्थिती कसलीही असो. बिकट परिस्थितीत सारिका काळे यांनी मिळविले यश हे अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत. 

"यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेख मालिकेचे प्रसारण दर रविवारी करतो आहे. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. तो पर्यंत नमस्कार..!
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग - 201
भाग - 202

धन्यवाद...!


No comments: