Sunday, July 28, 2024

गुरूंचा महिमा - भाग - 2

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *गुरूंचा महिमा - भाग - 2*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/07/1.html

"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"



दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/07/2.html


कुस्ती सारख्या खेळात मुलींनी उतरण हे समाजाला न रुचणारी बाब. पण हरियाणातील एका महावीराने तब्बल सहा मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देऊन, यशाच्या शिखरावर पोहोचवले. त्या कुस्तीच्या प्रशिक्षकाचे ही प्रेरणादायी कथा...


हरियाणातील, भिवानी जिल्ह्यातील बिलाली या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले महावीर. त्याला आणखी चार भाऊ होते. त्याचे वडील एक उत्तम कुस्तीपटू होते. त्यांनी हरियाणातील दंगल कुस्ती प्रकारात कुस्ती खेळून नावलौकिक प्राप्त केला होता. वडिलांची खेळाडूवृत्ती आणि आईची शिस्त त्याच्या अंगी भिनले. 


वडील कुस्तीपटू असले तरी महावीरला कुस्तीत जराही रस नव्हता. तो कबड्डी खेळायचा. शालेय कबड्डी स्पर्धांमध्ये त्याने जिल्हास्तरापर्यंत शाळेचे नेतृत्व केले. अभ्यासातील प्रगती मात्र मंदावली. तो कसाबसा सातवी पास झाला. तेव्हा महावीरच्या भविष्याची चिंता आई-वडिलांना सतावू लागली. तेंव्हा त्यांनी महावीरला राजस्थानला त्याच्या मोठ्या भावाकडे पाठविले. तो शिक्षक होता. राजस्थानला भावाकडे आल्यानंतर महावीरच्या शिक्षणात फारशी प्रगती झाली नाही. पण त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. तो दंगल कुस्तीचा गांभीर्याने विचार करू लागला.


दहावीची परीक्षा तो नापास झाला. पण, पुन्हा परीक्षा देऊन खेळाडू कोट्यातून सरकारी नोकरी मिळविण्याचा विचार त्याने पक्का केला. दिल्लीला जाऊन दंगल कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. विविध स्पर्धांमध्ये तो सहभागी होऊ लागला, त्याला यश मिळू लागले. अशातच त्याला हरियाणा विद्युत महामंडळात नोकरी मिळाली. परंतु दंगल मध्ये झालेल्या एका पराभवाने खचून जाऊन, त्याने नोकरीला रामराम ठोकला. पण, अल्पावधीतच त्याला खेळाडू कोट्यातून बीएसएफ मध्येही त्याला नोकरी मिळाली. परंतु त्याने तीही नोकरी सोडली. 


वडिलांकडून पैसे घेऊन त्याने दिल्लीमध्ये रियल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसाय त्याचा जम बसला. अशातच त्याचे लग्न झाले. पहिल्या मुलीचा जन्म झाला आणि दिल्लीला कायमस्वरुपी रामराम ठोकून, त्याने घर गाठले. त्याने गावच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. पत्नीला व भावाला त्याने सरपंच बनवले. 


सन 2000 उजाडलं. सिडनी ऑलम्पिक स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरीने कास्यपदक जिंकून इतिहास रचला. ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. मल्लेश्वरीच्या या यशाने महावीर प्रभावित झाला. "जर मल्लेश्वरी ऑलम्पिक मध्ये पदक मिळू शकते, तर माझ्या मुलीदेखील पदक मिळवतील." या विचाराने त्याच्यातील प्रशिक्षक जागा झाला. त्याने आपल्या मुलींना स्वतः च कुस्तीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. 


हरियाणासारख्या स्त्री भ्रूणहत्येत आघाडीवर असलेल्या राज्यात, महावीरने मुलींना कुस्तीपटू बनवायचं स्वप्नं उराशी बाळगलं होतं. त्यामुळे गावातील लोक त्याला "वेडा" म्हणू लागले होते. त्याच्यावर टीका करू लागले त्याची चेष्टा करू लागले. इतकंच नव्हे तर, महावीरच्या वडिलांनीही त्याची साथ सोडून, त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली.


ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती असंख्य अडचणी आल्या, तरी मागे हटत नाहीत. महावीरदेखील समाज आणि घरच्यांच्या टीकांना, शरण न जाता मुलींना कुस्तीचे धडे देऊ लागला. त्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं. महावीरच्या चारही लेकी आणि दोन्ही पुतणींनी राष्ट्रकुल, कॉमनवेल्थ, राष्ट्रीय चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप आणि आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धात सुवर्णपदकांची कमाई करून टीकाकारांचे तोंड बंद केले. आपल्या कृतीने आपल्या टीकाकारांना उत्तर देणार तो महावीर म्हणजेच महावीर फोगट होय. 


विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती असंख्य अडथळे, समस्या अन् अडचणी उद्भवल्या तरीही मार्गक्रमण करणे थांबवत नाहीत. ते थांबत नाहीत म्हणूनच, ते यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतात. 


महावीर फोगट यांनी आपल्या मुलींकडून कठोर मेहनत करून घेतली आहे. प्रसंगी त्यांना कठोर शिक्षाही केली आहे. आपल्या हातून उत्तम शिष्य घडावा, यासाठी प्रशिक्षक कठोर मेहनत घेऊन घेत असतो. यामागे विद्यार्थ्याला यशाच्या शिखरावर पोहोचवणं, हे एकमेव ध्येय प्रशिक्षकाचं असतं. महावीर फोगट कुस्तीपटू म्हणून जरी अपयशी ठरले असले, तरी ते कुस्तीचे प्रशिक्षक म्हणून यशस्वी झाले आहेत.


एकाच कुटुंबातील सहा मुलींनी कुस्तीसारख्या मर्दानी खेळात यश संपादन केल्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष फोगट कुटुंबीयांकडे आकर्षित झाले. यामुळे अनेक मुली कुस्तीकडे वळल्या आहेत. शिवाय मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन देखील बदलला आहे.


भारत सरकारने 2016 साली महावीर फोगट यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शिवाय त्यांच्या जीवनावर "दंगल" नावाचा चित्रपट देखील बनविण्यात आला आहे. एखाद्याच्या आयुष्यावर चित्रपट निर्माण होणं, यासारखं मोठे यश कोणतंच नाही. म्हणूनच, ते एक यशवंत आहेत. 

No comments: