Sunday, July 21, 2024

गुरूंचा महिमा - भाग - 1

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *गुरूंचा महिमा - भाग - 1*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/07/1.html

"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"

दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/07/1.html

मित्रहो नमस्कार, सर्वप्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा...! माझ्या जीवनात यशाचा मार्ग दाखवणाऱ्या माझ्या सर्व गुरूंना विनम्र वंदन...! 

मित्रहो, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे महत्व अनन्यसाधारण असते. शिष्याला यशाच्या अतिउच्च शिखरावर पाहण्याचं स्वप्नं केवळ गुरुच पाहत असतात. शिष्याला घडवण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत असतात. म्हणून गुरूंचे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. हे कोणीही नाकारू शकणार नाही. मित्रांनो, आज रविवार आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा/व्यासपौर्णिमा. या निमित्ताने दर रविवारी जगविख्यात विद्यार्थी घडवणाऱ्या गुरूंच्या जीवनावर आधारित असलेली लेखमाला सुरू करत आहे. गुरूंचा महिमा...! इतर सर्व पर्वांप्रमाणे गुरूंचा महिमा हे पर्वदेखील आपणांस नक्की आवडेल. असा आशावाद आहे. 

"इतरांसाठी टाळ्या वाजवणे बंद कर. स्वतः असे काही कर की, लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील." असा मोलाचा संदेश देऊन विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणाऱ्या क्रिकेटच्या द्रोणाचार्यची ही प्रेरणादायी कथा....

सन 1932 चा काळ. भारत अद्याप पारतंत्र्यात होता. अशातच भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स मैदानावर आपला पहिला-वहिला कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध खेळला आणि त्याच वर्षी 5 डिसेंबरला कोकणातील मालवण येथे एका सर्वसामान्य कुटुंबात क्रिकेटचा द्रोणाचार्य जन्माला आला. त्याला प्रेमाने सर्व जण बाबा म्हणायचे. 

वयाच्या अकराव्या वर्षी बाबा आई-वडिलांसोबत मुंबईला आला. दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये त्यांने प्रवेश घेतला. इथेच त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली. तो उत्तम क्रिकेट खेळायचा. त्यामुळे मुंबईतील अनेक नामांकित क्लब च्या संघात त्याने सहजरित्या स्थान मिळविले. पण, प्रत्यक्ष भारतीय क्रिकेट संघात स्थान निर्माण करण्यात तो अपयशी ठरला. सन 1963 साली बाबाने हैद्राबाद विरुद्ध पहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला. तो सामना अंतिम ठरला. 

प्रत्यक्ष क्रिकेट खेळणे थांबले असले तरी, प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्रिकेटवरचे प्रेम बाबाने कायम जपले. बाबाने शारदाश्रम शाळेत क्रिकेट प्रशिक्षकाचे काम स्वीकारले. 

बाबाचा स्वभाव अत्यंत कडक शिस्तीचा. त्याला सरावात हयगय अजिबात खपायची नाही. त्याने घालून दिलेले नियम शिष्यांनी पाळायलाच हवेत, असा त्याचा शिरस्ता होता. तो शिष्यांनी केलेल्या कामगिरीवर कधीच आनंद व्यक्त करायचा नाही. "चांगला खेळलास.(Well played)" हे दोन शब्द तो एकाही शिष्यासाठी वापरायचा नाही. त्यामुळे बाबाचे शिष्य उत्तरोत्तर उत्तम कामगिरी करण्यासाठी कष्ट घ्यायचे. "चांगला खेळलास" हे दोन शब्द ऐकण्यासाठी ते जीवापाड मेहनत करायचे. मुंबईतील वेगवेगळ्या मैदानावर आपल्या शिष्यांना खेळण्याची संधी मिळावी, त्यांना सवय व्हावी, अनुभव मिळावा यासाठी तो शिष्यांना स्कूटरवर बसवून दिवस-दिवस फिरायचा. 

"जे मी करू शकलो नाही, ते माझ्या शिष्यांनी करावे." असे स्वप्नं उराशी बाळगून तो प्रचंड खस्ता खायचा. दिवसभर शिष्यांकडून मैदानावर सराव करून घायचा. त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी कधी रागवायचा, कधी कठोर शिक्षा करायचा, तर कधी बक्षीस द्यायचा. 

त्याच्या कष्टाला यश आलं. त्याच्या मेहनतीचं चीज झालं. जेंव्हा भारताने 1983 सालचा विश्वचषक जिंकला. त्याचा शिष्य बलविंदर सिंग संधू या विजयी संघाचा भाग होता. विश्वचषक जिंकल्यानंतर बाबाचे दिवस पालटले. त्याच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या. पण, बाबाची नजर अत्यंत करडी होती. त्याच्या नजरेच्या चौकटीत बसणारा शिष्यच तो निवडायचा. 

अशातच एक अकरा वर्षाचा कुरळ्या केसांचा मुलगा बाबाकडे क्रिकेट प्रशिक्षण घेण्यासाठी आला. सुरुवातीला बाबाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण, नेट मधील त्याच्या जबरदस्त फटकेबाजीने तो प्रचंड प्रभावित झाला. 

त्या अकरा वर्षाच्या मातीच्या गोळ्याला बाबाने आकार द्यायला सुरुवात केली. कधी मायेचा हात, तर कधी हलकेच फटके देऊन त्या मातीच्या गोळ्याला आकार दिला. त्याचा नैसर्गिक खेळ कसा बहरेल ? यावरही लक्ष केंद्रित केले. त्याच्याकडून कसून सराव करून घेतला. त्याला संयमाचे, शिस्तीचे धडे दिले. त्याची निवड भारतीय क्रिकेट संघात झाली. त्याने आपले कर्तुत्व सिद्ध केले. उत्तरोत्तर बहारदार कामगिरी केली. बाबाचा तो शिष्य लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. लोक त्याला "क्रिकेटचा देव" म्हणू लागले. तो क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि त्याला घडवणारे क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणजेच श्री. रमाकांत आचरेकर सर होय.

बलविंदर सिंग संधू , सचिन तेंडुलकर यांचे सोबतच अजित आगरकर, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, आणि समीर दिघे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंनी आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. 

क्रिकेटमधील आचरेकर सरांच्या योगदानासाठी त्यांना 1990 मध्ये 'द्रोणाचार्य पुरस्कार' तर 2010 मध्ये 'पद्मश्री' हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. क्रिकेटमधील योगदानासाठी कृतज्ञ राहून संपूर्ण क्रिकेट विश्वातर्फे 'जीवन गौरव' पुरस्काराने देखील ते सन्मानित झाले आहेत. म्हणूनच, ते एक यशवंत आहेत. 

गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या जीवनात आहे. ते कदम विसरता येणार नाही...! विद्यार्थ्याचे जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा उजेड पडणाऱ्या सर्व गुरूंना, गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

धन्यवाद...!





No comments: