Monday, June 27, 2022

दुधगांवचे शिल्पकार

दुधगांव चे शिल्पकार - भाऊसाहेब कुदळे 


भविष्याचा वेध घेणाऱ्या, गावाला प्रगतीपथावर नेऊन ठेवणाऱ्या, नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला 'नेता' म्हणतात. या नेत्यांमुळेच गावची ओळख निर्माण होते. हा नेताच गावचा चेहरा बनतो. गावच्या जडणघडणीमध्ये नेत्याचा मोठा वाटा असतो. खऱ्या अर्थाने तो गावचा "शिल्पकार" असतो. दुधगांवचं नाव केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पटलावर नेणाऱ्या, दुधगांवच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या एका थोर व्यक्तिमत्वाची ही कहाणी...

28 जून 1889 रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात, आई आऊबाई आणि वडील दादा यांच्या पोटी, त्या थोर व्यक्तिमत्वाचा जन्म झाला. घरी चांगली सुबत्ता होती. ते सातवीपर्यंत शिकले. त्यावेळी गावात किंवा परिसरात सातवीनंतर पुढील शिक्षणाची कसलीच सोय नव्हती. त्यामुळे त्यांचं पुढचं शिक्षणच थांबलं. अर्धवट शिक्षण सोडावे लागल्याचा मोठा परिणाम त्यांच्या मनावर झाला. यामुळे ते गंभीर झाले. "जे आपल्या बाबतीत घडलं, ते इतरांच्या बाबतीत घडू नये. यासाठी आपण काहीतरी करायला हवं." असे विचार त्यांच्या मनात वारंवार येऊ लागले. जवळच्या मित्रमंडळीत याबद्दल चर्चा देखील घडू लागल्या. समविचारी तरुणांनी एकत्र येऊन 1906 साली गावात वाचनालयाची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने गावच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी 'ते' केवळ सोळा-सतरा वर्षांचे होते. या वयात काहींची पाऊलं वेडीवाकडी पडतात. पण, त्यांचं पाऊल समाजसेवेकडं पडलं. 

1909 साल उजाडलं. त्यांचा विचार, त्यांचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणारं हे वर्ष. हे एक क्रांतिकारी वर्ष असंच म्हणावं लागेल. कारण, हे वर्ष केवळ दुधगांवच नव्हे, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर सकारात्मक परिणाम करणारं होतं. याच वर्षात दुधगांवमध्ये एका शैक्षणिक चळवळीला सुरुवात झाली आणि ही चळवळ पुढे 'रयत' च्या रूपानं महाराष्ट्रात, गावोगावी पोहोचली. 1909 साली गावात "दुधगांव शिक्षण प्रसारक मंडळ" ची स्थापना झाली. 'ते व्यक्तिमत्व' या मंडळाच्या या स्थापनेतील महत्वाचा केंद्रबिंदू होते आणि 'ते' केंद्रबिंदू म्हणजेच भाऊसाहेब दादा कुदळे होय. 

कर्मवीर भाऊराव पाटील हे भाऊसाहेबांचे जिवलग मित्र. वरचेवर या दोघांच्या भेटी व्हायच्या. "दुधगांव शिक्षण प्रसारक मंडळ" या दोघांच्या भेटीत मधला मुख्य दुवा. कर्मवीर आण्णा भाऊसाहेबांच्या या कृतीमुळे प्रचंड प्रभावित झाले आणि पुढे जाऊन कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. अनेकदा कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमागचं मूळ "दुधगांव आणि दुधगांव शिक्षण प्रसारक मंडळ" असल्याचं मान्य केलं आहे. 

भाऊसाहेबांच्या या शैक्षणिक कार्यांमुळे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई सारख्या मात्तबार नेत्यांशी स्नेह जुळला. यामुळेच, ते राजकारणात उतरले. सातारा जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं. पुढे 1928 ते 1931 या कालावधीत सातारा जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष देखील झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सातारा जिल्ह्यात शिक्षणाचं, शाळांचं मोठं जाळं विणण्यात त्यांना यश आले. शिवाय, त्यांनी सातवी पास झालेल्या अनेक तरुण - तरुणींना आपल्या कार्यकाळात नोकरी दिली. दुधगांव सुद्धा यापासून वंचित राहिला नाही. गावातील शेकडो तरुण - तरुणींना त्यांच्या कार्यकाळात शिक्षकाची नोकरी मिळाली. उत्तरोत्तर ही संख्या वाढतच गेली. केवळ सांगली जिल्ह्यातील नव्हे तर, महाराष्ट्रातील सर्वाधिक 'शिक्षकांचं गाव' म्हणून दुधगांव ओळखलं जाऊ लागलं. 


माझं गाव 'शिक्षकांचं गाव' म्हणून प्रसिद्ध आहे. याचा प्रत्यय मला 2005 साली आला. मी डी.एड. प्रवेशासाठी कोल्हापूर येथे गेलो होतो. तेथे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने मला माझ्या गावाचं नाव विचारलं. "मी दुधगांव चा आहे." असं सांगितलं. त्या अधिकाऱ्याने आपल्या शेजारी बसलेल्या मित्राला सांगितले कि," दुधगांव हे सर्वाधिक शिक्षकांचे गाव आहे." तेव्हा मला मनोमन गावचा खूप अभिमान वाटला. दुधगांव च्या आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी मूळ भाऊसाहेबच आहेत. हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही.


भाऊसाहेब शैक्षणिक अन् राजकीय कार्याबरोबरच धार्मिक कार्यातही हिरीरीने सहभागी व्हायचे. दक्षिण भारत जैन सभेचे कार्यकारी सदस्य म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली. आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर ते महामंत्री बनले आणि नंतर 1932 साली त्यांनी दक्षिण भारत जैन सभेचं अध्यक्षपद भूषवलं.


1935 चा प्रांतिक स्वायत्तता हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामुळेच भारतात सत्तेच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. भाऊसाहेबांचा सारखा समाजसेवेचा पिंड असणाऱ्या माणसाने दुधगांवात ग्रामपंचायत स्थापन केली. गावाने त्यांना पहिला संस्थापक सरपंच होण्याचा मान दिला. ग्रामपंचायत स्थापना केल्यामुळे दुधगांवच्या विकासात भर पडली. शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक सुधारणांना वेग आला. गाव प्रगतीपथावर आलं.


शैक्षणिक, सामाजिक अन् राजकीय कार्याबरोबरच भाऊसाहेब स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत देखील सहभागी झाले. देशासाठी प्राण देण्याच्या प्रतिज्ञापत्रावर अंगठ्याच्या रक्ताचा ठसा उमटवून, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. पुढे घेतले 1942 च्या चले जाव आंदोलनात त्यांना सक्रिय सहभाग घेतला. परिणामी, 1943 साली इंग्रजांकडून त्यांना अटक झाली. सात महिन्यांचा कारावास सहन करावा लागला. परंतु, हा कारावास त्यांच्या जीवनात सकारात्मक परिणामकारक ठरला. या दरम्यान एस.एम. जोशी, साने गुरुजीं सारख्या दिग्गज मंडळींचा सहवास लाभला. यामुळे त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली.  


गांधीजींच्या हत्येनंतर भारत पेटला, तसा दुधगांवही. दुधगावातील सरदेशमुखांचा वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या संपूर्ण प्रकारास भाऊसाहेब जबाबदार आहेत. अशी टीका त्यांच्या हितशत्रूंनी, विरोधकांनी केली. परंतु, दुधगांवमधील ही जाळपोळ ज्यांच्या मुळे रोखली गेली असेल, तो माणूस म्हणजे भाऊसाहेब कुदळे होते. असे तत्कालीन ब्राह्मण नेत्यांनी कबूल केले आहे.


अशा थोर देशभक्त, व्याख्याता, नेता, लेखक, गांधीवादी समाजसेवकाचे देहावसान 21 मे 1952 रोजी झाले. खऱ्या अर्थाने याच दिवशी दुधगांव एका थोर व्यक्तिमत्व पोरका झाला. 


भाऊसाहेबांनी आपल्या कार्यामुळे दुधगांवलाच नव्हे तर, जैन धर्मालाही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. भाऊसाहेब सातारा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष असताना, त्यांना समाजातील मान्यवरांनी एकत्र येऊन, वर्गणी काढून "पर्स प्रदान" करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गांधीवादी विचाराच्या या नेत्याने पदावर असेपर्यंत पर्स स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. यातच त्यांच्या मनाचा अन् कार्याचा मोठेपणा लक्षात येतो. भाऊसाहेब पदावरून दूर झाल्यानंतर समाजातील मान्यवरांनी पुन्हा एकत्र येऊन वर्गणी काढून, त्यांना दोनदा "पर्स प्रदान" केली.


"दुधगांवमध्ये भाऊसाहेबांचे स्मारक व्हावे." अशी कर्मवीरांची इच्छा. परंतु, ते शक्य झाले नाही म्हणून, कर्मवीरांनी दुधगांव मध्ये सुरू केलेल्या हायस्कूलचे "भाऊसाहेब कुदळे विद्यालय" असे नामकरण करून मैत्री जपली.


भाऊसाहेबांनी आयुष्यभर गांधीवादी विचारांची जपणूक केली. आपल्या सामाजिक,शैक्षणिक राजकीय, धार्मिक कार्यामुळे वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीत त्यांनी किंचित ही वाढ करता आली नाही. परंतु, त्यांनी ती कमीही होऊ दिली नाही. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी मिळवलेला नावलौकिक, एखाद्या धनाढ्यालाही मागे टाकेल असा आहे.

दुधगांव च्या आजवरच्या वाटचालीत "दुधगांव शिक्षण प्रसारक मंडळ" मैलाचा दगड ठरला आहे. कारण, गावातील असंख्य गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाची दारे भाऊसाहेबांनी खुली करून दिली. शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक, राजकीय,धार्मिक क्षेत्रात गावाने केलेल्या प्रगतीचा सर्वस्वी श्रेय भाऊसाहेब कुदळे यांनांच जातं. म्हणुनच ते खऱ्या अर्थाने दुधगांवचे शिल्पकार आहेत. 

उद्या 28 जून भाऊसाहेब कुदळे यांची जयंती त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन....


धन्यवाद....



No comments: